आरोग्यम् धनसंपदा - आदर्श दिनचर्या

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशनम् च ||

स्वस्थ म्हणजे निरोगी माणसाच्या आरोग्याचं रक्षण आणि आतुर म्हणजे रोगी व्यक्तीच्या रोगाचा नाश करून त्याला पुन्हा आरोग्य प्राप्त करून देणे हे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे.

आता आपण स्वस्थ किंवा निरोगी आहोत हे कसं ओळखावं? तर आयुर्वेदात आरोग्याची सर्वसामान्य व्यक्तीला ओळखता येतील अशी काही लक्षणे सांगितली आहेत.
१) योग्य वेळी उत्तम भूक लागून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे
२) काहीही त्रास न होता मल, मूत्र आणि घाम याचे योग्य प्रमाणात निःसरण होणे
३) योग्य वेळी शांत आणि गाढ झोप लागून उठल्यावर प्रसन्न वाटणे
४) आळस किंवा सुस्ती न राहता, उत्साह व हलकेपणा वाटणे
५) मनामध्ये वाईट विचार न येता मन प्रसन्न असणे
असं स्वास्थ्य किंवा आरोग्य लाभण्यासाठी आयुर्वेदाने आदर्श दिनचर्येचा (Ideal daily routine) आग्रह धरला आहे.

निसर्गामध्ये आढळणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला लयबद्धता दिसते. तीच गोष्ट दिवसाची वेळ आणि आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ दोषांच्या अधिक्याच्या बाबतीतही दिसून येते. सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा कफाचा, दुपारी व मध्यरात्री १० ते २ हा पित्ताचा व पहाटे व दुपारी २ ते ६ हा वात दोषाचा काळ असतो. आपली दिनचर्या ह्या निसर्गाच्या चक्राशी (दोषांच्या काळानुसार) जितकी जुळवता येईल तितका मनुष्य आरोग्यसंपन्न होतो. व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आचरावयाचे काही नियम दिनचर्या ह्या स्वरूपात सांगितले आहेत.

  • ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठं - रात्री लवकर झोपून सकाळी सूर्योदयापूर्वी किमान १ ते १.५ तास लवकर उठावे. हा वात दोषाचा काळ असल्यामुळे सहज उठता येते. एकदा का ६ वाजून कफ दोषाचा काळ सुरु झाला की उठणे अधिकाधिक अवघड होते.
  • सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. वात दोषाच्या काळात ते सहजच होते. तसे होत नसल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून त्यामध्ये ५/६ दुर्वांचे अंकुर टाकून ठेवावेत व सकाळी उठल्यावर हे पाणी प्यावे.
  • दातांचे स्वास्थ्य नीट राहण्यासाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी तसेच प्रत्येक वेळी जेवल्यावर दात घासून चूळ भरण्याची सवय लावावी. हल्ली टिशू पेपर च्या सर्रास वापरामुळे जेवल्यावर हात व तोंड धुण्याची सवय जवळजवळ संपुष्टात आली आहे. खास करून लहान मुलांची.
  • हल्ली इंटरनेट वर ' oil pulling' ह्या नावाने प्रसिद्ध असलेले गंडूष / कवल हाही आयुर्वेदिक दिनचर्येचाच भाग. कफ काळात म्हणजे सकाळी ६ नंतर गंडूष वा कवल करणे सर्वोत्तम. १५ ml खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंड फुगवून तोंडात धरून ठेवणे म्हणजे गंडूष आणि ते तोंडातल्या तोंडात खुळखुळवणे म्हणजे कवल होय. जोपर्यंत नाक व डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत ते धरून ठेवायचे असते. ह्याचे अनेक फायदे आहेत - चेहऱ्याची त्वचा सुंदर बनते, अन्नाची रुची वाढते, घसा कोरडा पडत नाही, ओठ फुटत नाहीत, दात व हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
  • कफ दोषाच्या काळात मन एकाग्र व्हायला मदत होते. तेंव्हा सकाळी किमान ५ मिनिटे तरी आपल्या इष्टदेवतेचे स्मरण, ध्यान, आत्म चिंतन जरूर करावे. हल्लीच्या स्ट्रेसफुल आयुष्यात तर याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.
  • नस्य - साजूक तूप, तिळाचे तेल किंवा अणुतेल कोमट करून २/२ थेंब दोन्ही नाकपुड्यात घालावेत. त्यामुळे झोप चांगली लागते, केस गळत वा पांढरे होत नाहीत. कान - नाक - घसा व डोळे यांचे स्वास्थ्य लाभते. सायनस चा त्रास होणाऱ्यांनी हे जरूर करावे.
  • अभ्यंग - अंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल लावावे. विशेषतः डोक्यावर, कानात व तळपायांना अवश्य तेल लावावे. त्यामुळे त्वचेतील रुक्षता कमी होऊन वात दोषाचे शमन होते. शरीरातील रक्ताभिसरण चांगले होऊन आरोग्य लाभते. मध्यवयीन स्त्री-पुरुषांनी हे जरूर करावे. हिवाळ्यात तीळतेल व उन्हाळ्यात चंदनादि तेलाचा वापर करावा.
  • व्यायाम - योग, प्राणायाम, चालणे, पळणे, पोहणे असा आपल्या कुवतीप्रमाणे कमीतकमी ३० मिनिटे व्यायाम दररोज करावा.
  • स्नान - अंघोळीसाठी फार गरम किंवा फार थंड पाणी वापरू नये. तसेच डोक्यावर फार गरम पाणी घेऊ नये. त्यामुळे केस गळणे, पांढरे होणे, कोंडा होणे या समस्या उद्भवतात.
  • आहार - सकाळी नाश्ता जरूर करावा. नेहमी ताजे, पौष्टिक, गरम अन्न घ्यावे. दुपारचे जेवण हे १२ ते १ च्या दरम्यान करावे तेंव्हा पित्त दोषाचे अधिक्य असल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. रात्रीचे जेवण ७.३० - ८ च्या दरम्यान तसेच दुपारच्या जेवणाच्या कमी मात्रेत व पचायला हलके असावे. रात्री दही अजिबात खाऊ नये. फलाहार सकाळी १० ते संध्याकाळी ७ च्या दरम्यान करावा.
  • निद्रा - दुपारची वामकुक्षी शक्यतो टाळावी. तसेच रात्री जेवल्यावर लगेच झोपू नये त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. रात्री जेवल्यावर शतपावली जरूर करावी. रात्री १० पर्यंत कफाचा काळ असतो त्यामुळे या वेळेत झोपल्यास झोप लगेच व शांत लागते.
यातल्या काही गोष्टी आपल्याला सहज करता येण्यासारख्या आहेत आणि काही प्रयत्नपूर्वक करता येतील. कारण शेवटी आपलं आरोग्य हे आपल्याच हाती असतं.


पुन्हा भेटू पुढच्या भागात - 'दोषानुरूप आहारविचार '

- डॉ रुपाली गोंधळेकर

M.D (A.M.), B.A.M.S.


४ टिप्पण्या:

  1. डाॅक्टर ; रूपाली अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे , आजकाल आपण नेमकं विरूद्ध वागतो, दिवसभर कामाच्या गडबडीत व्यापात उपाशी रहाणे सहज जमते ;मग संध्याकाळी आपल्याला भूक जाणवते , रात्री भरपेट जेवतो झोपायला उशीर त्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवतात , आपला लेख खरच विचार करून दिनक्रमात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडणारा आहे , एक शंका होती गंडूश करताना फक्त तेल वापरायचे का पाण्यात घालून वापरायचे

    उत्तर द्याहटवा
  2. डाॅक्टर ; रूपाली अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे , आजकाल आपण नेमकं विरूद्ध वागतो, दिवसभर कामाच्या गडबडीत व्यापात उपाशी रहाणे सहज जमते ;मग संध्याकाळी आपल्याला भूक जाणवते , रात्री भरपेट जेवतो झोपायला उशीर त्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवतात , आपला लेख खरच विचार करून दिनक्रमात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडणारा आहे , एक शंका होती गंडूश करताना फक्त तेल वापरायचे का पाण्यात घालून वापरायचे

    उत्तर द्याहटवा