तमसो मा ज्योतिर्गमय

भारतापासून कोसो दूर असलेल्या सिंगापूर नामक विदेशातील एका मासिकासाठी "तमसो मा ज्योतिर्गमय" हा विषय मांडला जावा अशी अपेक्षा दोन गोष्टी सुचवते: (१) त्या विषयाचे चिरंजीवित्व आणि (२) शाश्वत महत्त्वाचा हा विषय काळाच्या किंवा विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ नये यासाठी मानवी मनात असलेली तळमळ! म्हणूनच हा विषय निवडल्याबद्दल संपादक मंडळाचे प्रथम कौतुक करते. दीपावलीच्या स्वागतासाठी हा विषय निवडला गेला असणार ही ही कल्पना आहेच.

बृहदारण्य कोपनिषदात खालील शांतीमंत्र आहे. शतपथब्राह्मणातही आहे.

असतो मा सद्गमय I तमसो मा ज्योतिर्गमय II

मृत्योर्मामृतम् गमय I ओम् शान्ति: शान्ति: शान्ति: II

असत्याकडे नव्हे सत्याकडे जा, अंधाराकडे नव्हे ज्योतीकडे जा, मृत्युकडून अमरत्वाकडे जा. मग आध्यात्मिक, आत्मिक आणि आधिभौतिक शांती प्राप्त होईल, असा विश्वास खंबीरपणे व्यक्त केला गेला आहे. मानवी जीवनासाठी मार्गदर्शक चिरंतन सत्य सांगितले गेले आहे व हे सत्य अथर्वशीर्षात उल्लेखल्याप्रमाणे नुसते "सत्य" नसून "ऋतं" आहे. आधिभौतिक शांतीसाठी "तमसो" मंत्र, आत्मिक शांतीसाठी "असतो" मंत्र तर आध्यात्मिक शांतीसाठी अमरत्वाकडे वाटचाल आवश्यकच आहे.

पृथ्वीच्या जलव्याप्त भागातून पृथ्वीच्या पोटातील घडामोडींमुळे जमीन वर येऊ लागली, जंगले निर्माण झाली, कीटक, लहान मोठे पशुपक्षी व नंतर मानव निर्माण झाला. जमिनीचे क्षेत्र वाढू लागले. पशू नि मानवांची संख्याही वाढू लागली. हळूहळू टोळी, समूह, गावे, शहरे अशी प्रगती झाली. त्याच बरोबर सुष्ट दुष्ट प्रवृत्तीही वाढीस लागल्या. शेती कसली जाऊ लागली. हळूहळू व्यापार सुरु झाला. विविध उद्योग व कला निर्माण झाल्या, विविध शोध लागले. त्याचबरोबर संरक्षण सिद्धतेची आवश्यकता भासू लागली. (रुद्राध्यायात याचे वर्णन आढळते.) या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर नव्हे तर पावलागणिक वरील शांतीमंत्राचा उद्घोष व आचरण अनिवार्य झाले व अंधाराकडून प्रकाशाकडेची वाटचाल चालू राहिली, आजही चालू आहे, भविष्यातही चालू राहणारच आहे. कारण मानवाच्या बुद्धीची, आत्म्याची झेप नवनवीन क्षितिजे धुंडाळून तेथे स्थिर व्हावे, पाऊल रोवावे व नवे पाऊल उचलावे यासाठी सदैव उत्सुक व तत्पर असते. हीच या विषयाची चिरंतनता होय.

येथे अंधाराकडून प्रकाशाकडे असे न म्हणता ज्योतीकडे जावे असे म्हंटले आहे. प्रकाश त्याला मिळेल तेवढी जागा व्यापतो, परावर्तित झाल्यानंतर अन्य ठिकाणी पसरतो पण नवीन प्रकाश निर्माण करू शकत नाही परावर्तित होण्यासही त्याला दुसऱ्या कशाचे तरी साहाय्य लागते. पण एक ज्योत दुसरी ज्योत पेटवू शकते आणि ज्योतींची अखंड मालिका तयार करू शकते. आवश्यकता असते ती "ज्योत से ज्योत जलाते चलो" ची! व मानवाकडून हीच अपेक्षा आहे.

शिवाय एखादी ज्योत विझली तरी दुसरी प्रकाश देत राहते. लाईट बल्बच्या माळेप्रमाणे 'लागले तर सगळे, नाही तर पूर्ण अंधार' असे होत नाही.

"केला जरी पोत बळेचि खाली, तरी तो "वरती उफाळे"' हा ज्योतीचा आणखी एक गुण आहे. जोराचा वारा आला तरी ती त्याचा जास्तीत जास्त प्रतिकार करते, जोरजोराने फडफडते. तिची प्रतिकारशक्तीही कौतुकास्पद वाटते. "ज्योत जळे पण तेज पाजळे" असे एका कवीने म्हंटले आहे. ती स्वत: कण कण झिजत असते पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रकाश पसरवण्याचे आपले काम चालूच ठेवते. आपले कर्तव्य करतच रहा, असा संदेश देते. स्वतःचे हे कार्य सातत्याने चालू ठेवण्यासाठी ती तेल, तूप यांची मदत घेते. स्वतः क्षणाक्षणाला कणाकणाने नाहीसे होणार आहोत हे माहीत असूनही ते तिला मदत करतात कारण त्यांना ज्योतीच्या कार्याचे महत्त्व पटलेले असते. "एकमेकां साह्य करू I अवघे धरू सुपंथ II " हे तुकोबांचे उद्गार ते प्रत्यक्षात उतरवतात.

आपले जीवनकार्य यशस्वीपणे पार पाडायचे असेल तर स्वतःवर काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे हे जाणवले तेव्हा ज्योतीने त्यालाही संमती दिली - पणती, समई यासारखे बंदिस्त क्षेत्र तिने स्वीकारले.

एकाच बाबतीत मात्र ती हतबल, परवश आहे. तिला धारण करणारा हात. त्याच्यापुढे तिचे काहीच चालत नाही. ज्योतीने ज्योत लावायची की शत्रूचे घर जाळायचे हे तोच ठरवतो. अशा वेळी आपण मरावे असे वाटूनही तिला मरण येत नाही.

मानवाचा हा स्वभाव लक्षात घेऊनच त्यावर मर्यादा घालण्यासाठी या मंत्राच्या सतत पठणाची आवश्यकता जाणवते. अणुविस्फोतातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा अणुबॉम्ब बनवून हिरोशिमा, नागासाकी सारखा विध्वंस घडवून आणायचा का? भारताचे माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुविस्फोट घडवून आणताना जगाला वचन दिले होते, "या उर्जेचा उपयोग मानव कल्याणाकरताच होईल" व तसेच झालेही. तरीही त्यांना तो विस्फोट आवश्यक वाटला. इतर अणुशक्तीसमर्थ देशांना "हम भी कुछ कम नहीं" हे बजावण्यासाठी तो आवश्यकच होता. संरक्षणसिद्धता आवश्यक पण आक्रमणविचार नको.

"प्रकाश" शब्दाचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे.

तमस = वाईट प्रवृत्ती, प्रदूषण, अनैतिकता, अज्ञान, भीती, धास्ती, अयोग्य स्पर्धा (पाय ओढून पुढे जाणे), निरुत्साह, झोप, वगैरे.

प्रकाश = सद्वृत्ती, ज्ञान, नीति, धैर्य, उत्साह, ऊर्जा, शक्ती, निर्भयता, वस्तूंचे स्पष्ट दर्शन, सजीव सृष्टीचे पोषण, गतिशीलता, उत्कर्ष, अभ्युदय, इत्यादि.

म्हणूनच, मानवी जीवनाचे ध्येय "अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल" हेच प्राचीन कालापासून मानले गेले आहे, आजही आहे व भविष्यातही राहील. हा प्रकाश संपूर्ण विश्वातील मानवसमाजाला मार्गदर्शक होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!









- सुशील अभ्यंकर

1 टिप्पणी:

  1. ह्या आजी म्हणजे लेखिका सुशील अभ्यंकर विदुषी वृंदा टिळकांच्या आई ह्यांचा 'तमसो मा.. ' हा लेख जुनच काही पण नव्यानी सांगणारा वाटला. लेख खूपच परिपक्व विचारांचा आहे. ह्या आजींकडून अजून खूप काही वाचायला आवडेल. धन्यवाद.

    Yeshwant

    उत्तर द्याहटवा