युरोपच्या ऐतिहासिक जमिनीवरील माझे सोनेरी क्षण - भाग २

युरोपच्या ऐतिहासिक जमिनीवरील माझे सोनेरी क्षण - भाग १

रोमन साम्राज्याच्या अनिर्बंध आणि दिशाहीन झालेल्या शासकांमुळे रोम आपल्या यातनामय हिंसक इतिहासाकरिता आजही जाणला जातो. मला ह्याचा प्रत्यय Colosseum the Rome ह्या स्मारकाला पाहून तीव्रतेने आला. ह्या स्मारकास रोमन शासकाने, आपल्या जनतेच्या मनोरंजनाकरिता बांधले होते असे म्हणतात. Amphitheatre सारख्या घडणीच्या कमानदार प्रवेशद्वाराच्या आत शिरताच,वर्तुळाकार बैठ्या पद्धतीच्या पायऱ्या आणि मध्यभागी कित्येक भुयारे आणि खंदक आहेत. ह्या खंदकांच्या मध्येच युद्धात हस्तगत केलेल्या गुलामांना (ज्यांना Gladiators असे म्हटले जायचे) वाघ, कोल्हे, चित्ते अश्या रानटी प्राण्यांबरोबर एकत्र सोडले जात असे. आणि गुलामांची, प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज घालवून देणारे रोमन शासक आणि त्यांची रोमन जनता त्या चित्तथरारक आणि जीवघेण्या खेळाला मनोरंजन म्हणून पाहत असे. क्रूरतेचे प्रतिक असलेले ते स्मारक पाहताना मन सुन्न झाले. न पाहिलेल्या कैद्यांच्या करिता मन हेलावले. त्यांच्या यातनामय अंताची नुसती कल्पना शहारा देऊन गेली. इतिहासाच्या गर्भात गडप झालेल्या असल्या क्रूर रहस्यांना जाणणे हे रोम च्या ह्या स्मारकाला पाहून शक्य झाले. इतिहासातील राजनैतिक घडामोडी, गाजलेल्या व्यक्तिरेखा, आणि त्यांचे गनिमी कावे हे आम्हा महाराष्ट्रवासियांना नवे नाहीत. अख्ख्या दक्षिण ते मध्य भारतात, मुसलमानी, पेशवाई आणि शिवकालीन सत्तेचे अस्त आणि उदय आणि त्या सुमारास घडलेले असले बरेच प्रकार आम्हा सर्वांस ठाऊक आहेत. तरी क्लिओपात्रा, मोझार्ट, लीयोनार्डो दा विन्ची, जुलिअस सीझर ह्यांच्या ह्या शहराला पाहून मी अलगदपणे त्या रोमन साम्राज्यात शिरले.

रोमलाच लागून असलेले एक स्वतंत्र पण खूपच लहान शहर, व्हॅटिकन सिटी (Vatican city) म्हणून आहे. फक्त अर्ध्या तासात मी जवळच असलेल्या ह्या शहरातल्या जगप्रसिद्ध संग्रहालयात पोहोचले . "कलेचे माहेरघर" म्हणून ख्याती प्राप्त असलेले हे शहर, १६ व्या शतकात आपल्या जिवंत वाटणाऱ्या चित्रांमुळे प्रसिद्धीस आलेल्या मायकेल अन्जेलो मुळे नावारूपाला आले. रखरखीत उन्हात संग्रहालयापर्यंत जाणाऱ्या जवळ जवळ ६०-७० पायऱ्या चढून नि पुन्हा भर उन्हात तिकीटाकरिता तिष्ठत लांब रांगेत उभे राहून शिणलेले माझे मन आत आवारात शिरताच पुन्हा ताजेतवाने झाले. आतल्या दालनांच्या छतावर आणि भिंतींवर मायकेल अन्जेलो आणि लीयोनार्डो दा विन्ची सारख्या दिग्गज चित्रकारांनी काढलेल्या चित्रांना पाहून मन अभिभूत झाले. त्या पेंटींग्स मधील प्रत्येक चेहरामोहरा आणि त्या चेहऱ्यांवरील भाव एवढेच नाही तर घातलेल्या वस्त्रांवर पडलेल्या चुरगळलेल्या त्या चुण्या, वस्त्रांची पोत, रेशमी तलमपणा आणि तसाच काही वस्त्रांचा खरखरीतपणादेखील चित्रातून बाहेर डोकावत होता. एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या कृश हातावरील नसा नि नसा, ठळकपणे दाखवू शकण्याचे सामर्थ्य ठेवणाऱ्या मायकेल अन्जेलोचा, मानवी चेहऱ्यांचा अभ्यास भलताच खोल असल्याचे जाणवले. त्याची पेंटींग्स तत्कालीन समाजाचे चित्रण तपशीलवार करत होती. त्या वेळचे प्रसंग आणि त्यातील अंतर्व्यथा त्या चित्रातून झाकळत होती. मायकेल अन्जेलोला शिल्पकार म्हणावे कि चित्रकार हे माझे मलाच उमजत नव्हते कारण तसे करणे, म्हणजे शिल्पकार आणि चित्रकार ह्या दोघात तुलना करून दोघांपैकी एकास दुय्यम व एकास श्रेष्ठ ठरवणेच होय. हे खरच सूर्य आणि चंद्रामध्ये तुलना केल्यासारखे असते. शेवटी लिओनार्डो आणि मायकेल अन्जेलो ह्यांची पेंटींग्स विकत घेऊन मी ह्या माझ्या रोम प्रवासातून व्हेनिस ह्या रोमँटिक शहराची वाट धरली.

आशियातील सूर्यास्ताच्या वेळा आणि युरोपच्या सूर्यास्ताच्या वेळांत बराच फरक असल्याने रात्री ९ ला देखील उन्हाचा तडाखा पाहून आपण जगाच्या एका वेगळ्या बाजूला राहत आहोत याची जाणीव किंचित गडद झाली. त्यातून पाण्याच्या ह्या सुरेख शहरात पाण्यावरील आयुष्य, मोठे मजेशीर आणि रोमँटिक वाटले. व्हेनिस हे पाण्याच्या कॅनाल्सने जोडलेले शहर आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या लहान मोठया रंगीबेरंगी होड्या (ज्याला येथे गोंडोला असे म्हणतात) पाहून गंमत वाटली. त्या गोन्डोलीयार्सचे पेहराव आणि त्यांच्या क्षेत्रिय शिष्टाचारानुसार एखद्या स्त्री प्रवाशाला संबोधून "सेनोरिता" म्हणून मारलेल्या हाकेने एखादीच्या मनावर वेनेशियन प्रभाव न झाला तर नवल. काही काही स्थळांना पाहताना तर असे वाटले जणू आपण स्वप्नातल्या जगात आहोत. एखद्या ग्रीटिंग कार्डात पाहिलेल्या दृश्याला समोर पाहताना आपण सत्यातल्या जगात आहोत कि कल्पनेतल्या जगात आहोत असे वाटणे साहजिकच होते. आम्ही सूर्यास्ताच्या सुमारास गोंडोला ride घेतली ह्या सुमारास तिकिटांचे दर इतर वेळेपेक्षा जास्त असले तरी ग्रांड कॅनालची फेरी करता करता निमुळत्या होत जाण्याऱ्या कॅनाल्स आणि त्यात असलेली वेनेशियन घरे, कॅथेड्रल- चर्चेस फारच लोभस आणि कल्पनातीत वाटत होती. अधून मधून आमचा गोन्डोलीयार तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत काही ऐतिहासिक माहिती पुरवत होता. तर मध्येच काही गुणगुणत होता. ते सर्व आठवताना मला १९७४ साली चित्रीकरण झालेल्या अमिताभ आणि झीनतच्या चित्रपटाची आठवण झाली आणि सोबत R D बर्मन साहेब ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचीदेखील आठवण झाली.

रोम, व्हेनिस आणि व्हॅटिकन सिटी पाहून मग आम्ही झेक प्रजासत्ताक (Czech Republic) ह्या शहरात आलो ज्याचे पूर्वीचे नाव czechoslovakia होते. हे शहर पुष्कळ बोहेमियन फ्लेवर घेऊन आहे. एव्हाना प्रवासाने शिणलेल्या माझ्या शरीराने आणि मनाने पुरताच ताबा सोडला होता तरी मनावरची मरगळ झिडकारून आम्ही ऑस्ट्र्या ह्या एका लहान शहराकडे निघालो. आल्प्स च्या गगनचुंबी पर्वत शृंखलेच्या पायथ्याशी विसावलेले हे Innsbruck शहर हिवाळ्यात स्कीईंग आणि उन्हाळ्यात hiking करिता प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या कडेला एका बाजूला बर्फाने गोठलेल्या नद्या तर दुसऱ्या बाजूला बर्फाखाली दडलेल्या त्या आल्प्सच्या पर्वत शृंखला नि त्यातून वाट काढत जाणारी आमची ट्रेन हा खरोखरीच एक आगळा वेगळा अनुभव होता. हे शहर जगातील सर्वात मोठ्या swarowski crystals करिता प्रसिद्ध असल्याने आम्ही स्वरोस्की वर्ल्ड ह्या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या जवळ जवळ १३७ पौन्डच्या त्या रंगीत चमचमणाऱ्या खड्याला पहिले. ..

माझ्या ह्या प्रवासाचे हे शेवटचे स्थळ होते. ह्या साऱ्या देशांमध्ये विखुरलेले भारतीय पाहून जग आटोक्यात आले कि काय असे वाटले. जिथे तिथे बांगलादेशी आणि भारतीय विक्रेते भाजीपाला, selfie sticks, पाण्याच्या बाटल्या, सोवेनिअर्स पासून ते चक्क प्राडा bags विकताना सहजच आढळत होते. आमच्या सारख्या देशबंधूंना पाहून चटकन दर कमी करून आपल्या भावनिक श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यास कधीच चुकतही नव्हते. मी स्वतः सिंगापूरसारख्या (जगातल्या महाग म्हणवल्या जाण्याऱ्या देशांच्या यादीत जाऊन बसलेल्या) देशात राहत असल्याने, थोडक्या कमाईत आपल्या अप्तेष्टांपासून दूर राहून पैसे कमावणाऱ्या ह्या immigrants ची भावनिक बाजू पाहून दंग झाले.

असो, शेवटी लीयोनार्डो दा विन्ची ह्या रोमच्या विमानतळावरून, जगातल्या जुन्या देशांचा निरोप घेऊन तसेच आपल्या गोड आठवणींची शिदोरी घेऊन, मी जगातल्या तरुण आणि आधुनिक म्हणवणाऱ्या माझे वास्तव्य असणाऱ्या देशाची, अर्थात सिंगापूरची फ्लाईट धरली.













सौ रुपाली मनीष पाठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा