फिटनेस : कल, आज और कल

फिटनेस हा नुसता शब्द जरी ऐकला ना, तरी मला अगदी लहान मुलासारखे हातपाय पसरून मोठ्यांदा रडावेसे वाटते. थांबा! “हे काय चाललेय?”, “शोभते का ह्या वयात असे वागणे?” वगैरे, वगैरे लुक्स मला द्यायच्या आधी माझे काय म्हणणे आहे ते तरी ऐकून घ्या, आणि मग मला सांगा की तुम्हालाही माझे म्हणणे पटते की नाही ते!

सद्ध्या सगळीकडेच ‘फिटनेस’ ची लाट आली आहे, हे काही मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. पण मग माझी अशी एकदम टोकाची रिअॅक्शन का झाली? त्याचे कारण म्हणजे “आमची पिढी” ज्या काळात जन्मली तो काळ! आता तुम्ही विचाराल, “आमची पिढी म्हणजे कोणती?”, “आमचा काळ म्हणजे कोणता?”. ते आता तुम्हाला समजेलच.

त्याचे काय झाले, की माझ्या आईच्या जमान्यात, किंवा माझ्या लहानपणी म्हणा, ही जी नवीन टेक्नोलॉजी आहे ना किंवा ही नवनवीन गॅजेट्स म्हणजे कुकर, मिक्सर, वॉशिंग मशीन, डीश वॉशर, व्हॅक्यूम क्लीनर, वगैरे, वगैरे, या सगळ्या गोष्टींचा शोध लागलेला होता, पण सर्रासपणे त्या सर्वसामन्याच्या घरात पोहोचलेल्या नव्हत्या. माझी आई हातानेच केर काढायची, जमीन पुसायची, चटणी पाट्यावर वाटायची, मसाले खलबत्त्यात कुटायची वगैरे. टाकीच्या नळाला चोवीस तास पाणी सुरु झाले होते, पण प्यायच्या पाण्याच्या दोन तीन बादल्या अजूनही खालच्या मजल्यावरून भरून आणायला लागत होत्या. थोडक्यात काय तर घरची कामे करतानाच तिला पुरेसा व्यायाम होत होता. वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती.

बरे, खाण्यापिण्याचे म्हणाल, तर मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाणे हा ‘स्टेट्स सिम्बॉल’ अजूनही झाला नव्हता. घरीच चांगले चुंगले करून खाण्यामधे श्रीमंती समजली जात होती. घरीच सर्व करायला लागत असल्यामुळे डोसे, वडे, पावभाजी, वगैरे पदार्थ नवलाईचे होते. पंजाबी, चाईनीज तर खूपच लांब. बहुतेक वेळा आपला साधा आमटी, भात, भाजी पोळी असा सकस आहारच असायचा. त्यामुळे आहारावर कंट्रोल असे वेगळे काही करायला लागायचे नाही.

आता त्याच्या अगदी उलट परिस्थिती. म्हणजे माझी मुलगी ऋचा, त्यांच्या पिढीत तर सगळे इतके हेल्थ कॉन्शस आहेत, त्यांना तर अगदी शाळेपासूनच हेल्थ, फिटनेस, डाएट वगैरेचे व्यवस्थित शिक्षण दिले जाते. ह्या पिढीला जीम, योगा क्लास, पिलाटे क्लास, स्विमिंग वगैरे सर्व साधने सगळीकडे सहज उपलब्ध आहेत आणि तरुण पिढी ते आपसूकच फॉलो करतेय. हेल्थ फुडचाही सध्या खूपच बोलबाला आहे. त्यामुळे फॅशन म्हणून, स्टेट्स सिम्बॉल म्हणून, सगळीकडे सह्ज मिळतेय म्हणून, काही म्हणा ही आजची तरूण पिढी खूपच मोठ्या प्रमाणात फिटनेसबद्दल जागृक आहे.

आता खरी गंमत होते, ती आमच्या पिढीची! मी त्या दिवशी माझ्या आईला सांगत होते कि मी उद्यापासून जिमला जाणार आहे तर आमचा काय संवाद झाला माहित आहे?

आई : कशाला हवी आहे जीम? अग घरातली कामे केलीस ना की पुरतो तेवढा व्यायाम. सगळ्या खोल्यांचा वाकून केर काढ आणि फरशी पुसून घे की बघ कसे पोट सपाट आणि कंबर बारीक होते ते. इकडे त्या बाईला फरशी पुसायला पैसे द्यायचे आणि तिकडे जिमच्या फिया भरायच्या. सांगितलेत कुणी हे उद्योग!

मी : अग तसे नाही ग, तिकडे ‘वेटस’ वगैरे पण करता येतात म्हणजे मग ‘मसल्स’ पण तयार होतात ना.

आई : त्यात काय रोज चार कपडे हाताने धुवून वाळत टाक म्हणजे बघ कसे तुमचे बायसेप्स का काय म्हणतात ते तयार होतील.

मी : अग आई पण ह्या सगळ्याला वेळ नको का तेवढा माझ्याकडे?

आई : नसायला काय झाले? त्या जिमला जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास, त्या जीम मधे तासभर म्हणजे झाले ना दोन तास, तेवढ्या वेळात दहा जणांचे कपडे धुवून होतील आणि दहा खोल्या झाडून होतील. ते जिमचे कपडे घ्यायचे पैसे वाचतील ते वेगळेच.

आईने इतके सांगितल्यावर मग मीही मनावर घेतले. दुसऱ्याच दिवशी मी सक्काळी उठून केर काढला, धुणे भिजवले आणि फरशी पुसायला घेतली. इकडे माझी लेक माझा हा सगळा उद्योग बघत होती. शेवटी तिने न राहवून विचारले “मॉम, आज मावशीबाई कामाला येणार नाहीयेत का?” तेंव्हा मी तिला आजीचे आणि माझे झालेले बोलणे सांगितले. त्यावर तिने त्या नवीन पिढीच्या स्टाईलने जे काय हात उडवले आणि डोळे फिरवले ते माझे मला माहीत. तिने मग मला तिच्यासमोर बसवले आणि लेक्चर द्यायला सुरुवात केली.

ऋचा : मॉम, हे केर काढणे, कपडे हाताने धुणे ह्या सगळ्या गोष्टी आता ‘आउट डेटेड’ झाल्यायत ग. त्या सगळ्यासाठी आता मशीन्स आहेत ती वापर ना. ह्या कामांनी तू नुसती दमशील, सगळ्या बॉडीला प्रॉपर एक्सरसाईज नाही होणार. कमॉन मॉम, ‘बी विथ द टाईम’.

झाले!! आता लेकीचे हे भले मोठे लेक्चर ऐकून आणि काय ते ‘बी विथ द टाईम’ व्हायला म्हणून शेवटी मी परत जिममधे जायला लागले.

बरे, खाण्याच्या बाबतीत तीच तऱ्हा. आईचा आग्रह की आपले रोजचे साधे जेवणच चांगले आणि पौष्टिक, तर लेक म्हणते किती ते तुम्ही तेल, तूप वापरता इंडीयन कुकिंगमधे! त्यापेक्षा सॅलड, सूप वगैरे किती हेल्थी असते. त्यात कितीतरी प्रकार करता येतात. म्हणजे माझी “इकडे आड, तिकडे विहीर” अशी अवस्था!

त्यादिवशी आईचे काहीतरी काम होते म्हणून मी जिमनंतर परस्पर आईकडे गेले तर माझे जिमचे कपडे बघून म्हणाली,
आई : हे काय? हा काय अवतार करून घेतलायस? हे कुठले सोंग आणलेयस?

मी : अग हो, हो! किती नावे ठेवशील? जरा मला बोलू देशील की नाही?.

आई : आता आणखीन काय बोलायचे आहे? अवतार सांगतोय ते पुरे नाही का?

मग मीही चिडले आणि माझ्या लेकीने जे सगळे सांगितले होते ते तिला ठणकावून सांगितले, “आय वांट टू बी विथ द टाईम”.

त्यावर ती तोंडाला पदर लावून हसायला लागली आणि म्हणाली, “अग, तुझ्या लेकीचे ठीक आहे ग! तिच्या वयाला, त्यांच्या पिढीला ते सगळे शोभून दिसते, त्या त्या वयात ती ती फॅड, फॅशन चालायचीच. किती गोड आहे ग ते माझे कोकरू. पण आता तूही का तेच करणारेस?

आईकडून मी तिरीमिरीतच घरी आले. माझा चेहेरा बघूनच ऋचाला कळले, की माझे काहीतरी बिनसले आहे. तिने विचारल्यावर मी झाला प्रकार तिला सांगितला तर म्हणते कशी की, “अग, आजी बरोबरच आहे ग. आजीच्या जनरेशनला तिने सगळे ओल्ड स्टाईलने केले तर ठीकच आहे ना तिच्यासाठी. शी इज सो स्वीट ना ममा! पण मॉम, तू नको तशी वागू. तुला ते सूट नाही होणार.”

हे ऐकल्यावर मात्र माझे ब्लडप्रेशर जे काय वर गेलेय म्हणून सांगू. म्हणजे आईप्रमाणे वागले, तर लेक म्हणते, “ओल्ड फॅशन”, लेकीच्या म्हणण्याप्रमाणे वागले, तर आई म्हणते, “ही काय थेरं”. बरे, त्या दोघी परत एकमेकीची कौतुकेच करतायत! त्या दोघी बरोबरच आहेत. काय चुकतेय ते माझेच. वरती त्यांचेच ऐकून घ्यायचे की “तू अशी वागतेस ना, म्हणूनच तुला उगाच टेन्शन येते, स्ट्रेस येतो आणि मग तुझे बिपी वाढते”.

मग मात्र मी ठरवले, आता कोणाचेच ऐकायचे नाही. फिटनेसच्या बाबतीत आता आपणच आपले ठरवायचे. मग पहिला विचार आला तो म्हणजे शरीराच्या फिटनेसबरोबरच मनाचा फिटनेसही तितकाच महत्वाचा! असे बिपी वाढून चालणार नाही. मग ठरवले, की आधी “मनाच्या फिटनेस” वर लक्ष केंद्रित करायचे. मग काय एक एक मोठ्ठा बाऊल घेतला. बाऊल कसला छोटे पातेलेच म्हणाना! त्यात शिगोशिग भरून भरपूर दाणे घातलेला चिवडा घेतला. एक मस्त पुस्तक घेतले आणि सोफ्यावर ठाण मांडले. मस्तपैकी चिवडा खात, खात मनसोक्त पुस्तक वाचत बसले. पुस्तकाचे शेवटचे पान उलटले, चिवड्यातला शेवटचा दाणा तोंडात टाकला तेंव्हा माझे बिपी ठीक्क १२० / ८० वर येऊन पोहोचले होते.

ता.क.

“मनाच्या फिटनेस” बद्दल थोडेसे सांगावेसे वाटते म्हणून या चार ओळी. शरीराच्या आजाराप्रमाणेच मनाचा आजारही तितकाच “खरा” आहे आणि “महत्वाचा” सुद्धा आहे!

कोणाला बिपीचा त्रास असेल, कोणाला डायबेटीस, कोणाला कॅन्सर तर कोणाला स्ट्रोक. या सर्व आजारांमधे, रोगांमधे साहजिकच आपण काळजी करतो, पण मग योग्य ती काळजी घेतोही. ह्या आजारांबद्दल आपाल्याला “वाईट” वाटते, परंतु त्यांची कधी “लाज” वाटत नाही. मग मनाच्या म्हणजे मानसिक आजारांबद्दलच आपल्याला “कमीपणा” का वाटतो? “लाज” का वाटते? शरीराच्या आजारासाठी आपण जितक्या सहजपणे डॉक्टरकडे जातो तितकीच सहजता सायकीऍट्रिस्ट किंवा सायकोलाॅजिस्टकडे जाताना का वाटत नाही? मानसिक पेशंटला तुमच्या आधाराची गरज असते, तुमच्या वेगळ्या नजरेने बघण्याची नाही! जसे आपण इतर पेशंट्शी वागतो, त्यांना आधार देतो, तसेच मानसिक पेशंट ला “कमी न लेखता” आधार देणे हे एक “समाज” म्हणून आपले कर्तव्ये आहे असे मला मनापासून वाटते. हा बदल झाला तर सध्याच्या धकाधकीच्या, जीवघेण्या कॉम्पीटीशनच्या युगात परीस्थीतीला तोंड देताना जरासा दिलासा मिळेल असेही वाटते. 

- योगिनी लेले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा