विरंगुळा

करमणूक म्हणजे नाटक-सिनेमा पाहणे, वाचन करणे की TV बघणे? किंवा, रोजच्या रुटीन / दैनंदिनीपासून काहीतरी वेगळं, सर्जनशील करणे. खूप तास एकच काम करत राहिलो तर शरीर व मन थकून जातं, कारण त्यात तोचतोचपणा येतो. थोडासा बदल केला, तरी लगेच ताजं वाटतं. चला तर मग, करमणुकीचा आज जरा 'हटके' विचार करुया...

मागच्या महिन्यात, मी आणि माझ्या मैत्रिणींने मंथन मध्ये 'अल्झायमर' ह्या आजारावर प्रेसेंटेशन दिलं होतं. या गंभीर विषयाचा अभ्यास करताना मेंदुविषयी बरीच माहिती मिळाली. ‘मेमरी’ चांगली ठेवण्याकरता मेंदुला सतत प्रेरित करावं लागतं. कुतुहल वाटून नवीन काहीतरी शिकणं, आनंद होईल अशा काही सकारात्मक गोष्टी केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. बहुतांश लोकं कामे उजव्या हातानी करतात; बदल म्हणून ती कधीतरी डाव्या हाताने करुन पहा. उदा. केस विंचरणे, वस्तू  उचलणे, लिहायचा प्रयत्न करणे, इत्यादी.

आपण रोज चालायला ठराविक बागेत, ठराविक वेळी व ठराविक मार्गाने जात असाल, तर त्यातही अधून मधून  बदल करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनीही मनाला ताजेपणा येतो. कारण आपण करत असलेली प्रत्येक छोटी क्रिया ही सतत मेंदु व शरीराने सलगपणे केलेली असते. आपण करत असलेली गोष्ट, मग ती कितीही साधारण किंवा क्षुल्लक असो, त्यानी जर आपल्या मनाला खूप आनंद मिळत असेल -- इतरांना त्रास न देता -- तर ती नक्की करावी. समजा, मी एखादी कविता किंवा लेख लिहीत आहे, तर ते लिहिताना मला मनापासून आनंद मिळाला पाहीजे. लोकांना ती कविता किंवा लेख आवडणं  म्हणजे दुधात साखर.

प्रत्येकाची “करमणुकीची” ची व्याख्या वेगळी असते. एखादा नवीन पदार्थ शिकणे, छान गाणं ऐकणे, आवडीचे पुस्तक वाचणे कितीतरी गोष्टींमधून तुम्ही निखळ आनंद मिळवू शकता. कधी कधी कुटुंब वा मित्र-मैत्रिणींबरोबर कॉफी पीत, काहीतरी चटक मटक खात तासनतास मनमोकळ्या गप्पा मारणं ही सुद्धा एक उत्तम करमणूक आहे. आत्ता हल्लीच आम्ही “होळी स्पेशल शब्दगंध” मधे खूप मजा केली. त्यावेळी जुन्या मराठी / हिंदी  गाण्यांवर विडंबन लिहायचं  होतं. तेव्हा लक्षात आलं की, ते सोपं नाहीये. कारण त्याकरता वेगळी कलात्मकता हवी, डोक्याला वेगळी चालना हवी. ह्या सगळ्या गोष्टींनी मनाला एक ताजेपणा येतो.

खळखळून हसणं, दिलखुलास गप्पा, हे सगळं तब्बेत चांगली ठेवण्याकरता खूप उपयोगी आहे. ह्यात वेळ फुकट जातो, असं समजू नये. कितीही व्यस्त दैनंदिनी असली, तरी आपले छंद जरूर जोपासावे. कारण त्यातून मिळणारा निखळ आनंद हा वाऱ्याच्या गार झुळूकीसारखा असतो.

आजच्या तरुण पिढीकरता हे सगळं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. मग घरी आल्यावर घरची कामं, स्वयंपाक, आवरा आवरी, मुलांचा अभ्यास, दुसऱ्या दिवशीची तयारी... ह्या सगळ्याला २४ तास सुद्धा अपुरे वाटतात.

पण जशा ह्या अढचणी आहेत तशा अनेक सोयीदेखील आहेत. आता बऱ्याच सोसायट्यांमधे पोहायला तलाव, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस, जिम, जॉगिंग ट्रॅक आहेत. झालचतर अनेकदा चांगले शेजारी, मित्र मैत्रिणीही भेटतात. त्यामुळे एका मोठ्या कुटुंबात राहिल्याचा आनंद मिळूतो. सकाळी जिममधे किंवा पळताना असे शेजारी भेटले की छान गप्पा होतात आणि त्याबरोबर  व्यायामही. रोज संध्याकाळी छोटी मुलं खाली खेळतात, सायकल चालवतात. त्यात त्यांचाही वेळ छान जातो.

सोसायट्यांमधे सगळे सणवार साजरे होतात. नोकरीच्या निमित्तानी बहुतेक जण आपल्या शहरापासून, देशापासून, घरापासून दूर राहतात आणि त्यामुळे सण साजरा करण्याचा उत्साह दाणगा असतो. सणवारी लहान मुलांचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्या सगळ्यात भाग घ्यायला मुलांना प्रोत्साहित करावं. त्याने मुलं एकमेकात मिसळतात व त्यांच्यात सभाधीटपणा येतो. लहान मुलांचे कार्यक्रम बसवणं ही पालाकांकरता एक चांगली करमणूक होऊ शकते. एक तर पालकांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात हा एक छान विरंगुळा असतो. आणि आपल्या चिमुकल्या मुलाला / मुलीला गाताना, नाचताना पाहण्याचा केवढा आनंद असतो. हल्ली तर बऱ्याच कंपनीज मधेही जिम, टेबल टेनिस इत्यादीची सोयी ह्याचकरता असतात.

आपल्या आयुष्यात रटाळपणा येऊ न देता, मनाला व शरीराला ताजं कसं ठेवता येईल, ह्याचा विचार प्रत्येकानी नक्कीच केला पाहीजे. माझा हा लेख वाचून तुमची थोडी तरी करमणूक झाली असेल अशी आशा करते.

- मेघना असेरकर





२ टिप्पण्या: