सिंगापूर: नव्याचा ध्यास

सिंगापूर हा देश तुम्हाला का आवडला ? असं कोणी विचारलं तर काय लिहू पेक्षा किती लिहू असे होते. स्वच्छ रस्ते, शिस्तबद्ध रहदारी, विचारपूर्वक नियोजन आणि निसर्गाची केलेली सुंदर जपणूक ह्याने प्रथम भेटीतच मनावर मोहिनी टाकली. आणि त्यानंतर प्रत्येक वेळी हा देश नव्याने भेटत गेला.

अगदी विमानतळापासून हा बदल पहायला मिळाला. कधी मुलांसाठी खेळाचे नवीन कक्ष, कधी लेझर किरणांचे कारंजे, तर कधी दिव्यांचा पाऊस ! 

फक्त विमानतळच नाही तर बाहेर पाऊल टाकल्यावर रस्त्याच्या दुभाजकावर असलेली फुले आणि बाजूला असलेल्या इमारती नवीन रंगात आणि नवीन ढंगात पहायला मिळाल्या. कदाचित ह्या देशाला नाविन्याचा ध्यास असेल आणि ह्या ध्यासामुळेच सिंगापूर पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे. दरवेळी पर्यटकांना नवीन भेट असते. कधी कॅसिनो हाॅटेलची लांबलचक बोट Marina Bay Sands, कधी जायंट व्हील Singapore Flyer, कधी अनेक झाडे घेऊन थीम पार्क असलेली Gardens By The Bay.

पर्यटन स्थळांचे विशेष म्हणजे ती नुसतीच आकर्षक नाहीत तर माहितीने परिपूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. इथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अत्यावश्यक गरजांसाठी सोयी आहेतच. भारतात त्याची वानवा आहे म्हणून विशेष उल्लेख. पण निरनिराळ्या भागातून येणार्या पर्यटकांना त्यांचे आवडीचे खाणे देणारी हाॅटेल्स आहेत. माणसाच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हेच खरं! पण हा देश खरोखरच पोटात शिरतो.

Gardens By The Bay मधील काही खास भाग बघून चकितच झाले. भारतातील भौगोलिक परिस्थिती, तिथली झाडे, अनुकूल हवामान ही माहिती मला इथे येऊन मिळाली. रिव्हर सफारीमधे गंगा घाटावरील देवळे, गंगा शुध्दीकरणासाठी सुरु असलेले प्रयत्न ! अरे, आपली गंगा ! सिंगापूरमध्ये ! हे म्हणजे एखाद्याची हळवी नस पकडण्यासारखे आहे.

मला वाटते, माणसातील पर्यटकाला सिंगापूरला खेचून आणणे आणि पर्यटकातील माणसाला भारावून टाकणे ह्या देशाला चांगलेच जमले आहे. दुसरी मनाला भावलेली गोष्ट म्हणजे सर्वांना सामावून घेणारे सर्वसमावेशक धोरण ! दिवाळीत दिव्यांची रोषणाई आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम ! ख्रिसमसच्या डेकोरेशन मधे अधिकच संपन्न दिसणारा Orchard Road ! आणि पारंपरिक वेषातील मुस्लिम बांधवांच्या रुपात जणू हरिराया सण!

मला वाटतं, सर्वधर्मसमभाव हे तत्वज्ञान ह्या देशाने अंगीकारले असले तरी सर्वांना आनंदी ठेवले तरच हे प्रत्यक्षात अवतरेल हे मानसशास्त्रही हा देश वापरतो. आणि म्हणूनच सर्वधर्मीय अत्यंत खेळीमेळीने वावरताना दिसतात. कदाचित, ' राजा तशी प्रजा ' ही उक्ती इथे तंतोतंत लागू पडते. दिवाळीच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात एक सिंगापुरी स्त्री चक्क लाल जरीच्या साडीत, पारंपरिक दागिन्यात, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत होती. ती त्या भागातून निवडून आलेली खासदार आहे हे कळल्यावर आश्चर्यचकित झाले. पण इथले सर्वच राजकीय व्यक्ती सर्वांबरोबर खेळीमेळीने वावरतात असे समजले. अगदी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष सुध्दा सामान्य जनतेत येऊन त्यांची विचारपूस करतात.

सिंगापूर का आवडले ह्या यादीत एक नाव टाकल्याशिवाय यादी पूर्ण होणार नाही. ते म्हणजे सिंगापूमधील महाराष्ट्र मंडळ! कवितेच्या मैफिली, गणपतीचे अथर्वशीर्ष पूजन, दिवाळीत फराळाबरोबर नाटक, संगीत ह्या कलाकृती ! नवरात्रीत भोंडल्याचा खेळ, होळीने चढवलेला रंग आणि आपली भाषा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी मराठी शाळा! अनेक वर्षांपूर्वी सिंगापूरला आलेल्या कोणी भारतीय संस्कृतीचे बीज रुजवले. अनेकांनी ते जोपासले, वाढवले. परक्या मातीत हा वृक्ष बहरला. आज आपल्या मुलांना, नातवंडांना आपले सण, उत्सव, साहित्य ह्याचा आस्वाद घेताना पाहून मलाच काय पण सार्यांच्याच आई-वडिलांना आनंद होत असेल. 
समारोप करताना लिहावेसे वाटते, ४-५ भेटीत, काही महिन्यांच्या वास्तव्यात जे मनाने अनुभवले ते लिहावेसे वाटले.

सिंगापूर आवडण्याचे महत्त्वाचे कारण इथे प्रगतीने आकाशाची उंची गाठली असली तरी पाय मूल्यांवर स्थिर आहेत. माणसामाणसातील संबंध कायम आहेत.

सिंगापूर ! जगाच्या भूगोलात त्याचे स्थान लहान असेल. पण इतिहासांत त्याने मानाचे स्थान पटकावले आहे. विविध संस्कृतीतील रंग एकत्र येऊन सर्वांना जोडणारे एक सुंदर इंद्रधनुष्य तयार झाले आहे. त्यातील रंग मनाला भावतात. आणि म्हणावेसे वाटते ,
" बार बार देखो ,हजार बार देखो,
यह देखने की चीज है , यह देश
सिंगापूर !!!!    


-प्रमोदिनी देशमुख





   

1 टिप्पणी: