स्वातंत्र्याची ऐशीतैशी

आजचा दिस तीन-चार तास लवकर सुरू झाल्याने, जरा खास हाय खरा. नायतर तुमीच सांगा, ६ काय उठायची येळ हाय काय? आं... झोप पूर्ण न झाल्याची बरेकींग न्यूज दिवसभर कवटीच्या आत-बाहेर रेंगाळणार व्हती. तशीबी काल महत्वाची “बैठक” रात्री बर्‍याच उशिरापर्यंत चालल्यामुळं, सकाली डोकंपण जड झाल व्हतं  अन् सकालच्या सूर्याच्या रंगाशी स्पर्धा करणार्‍या आमच्या डोल्याच्या रंगावरूनच आम्ही किती कामात “बुडालो” व्हतो ते कळून येत व्हतं. 

नदीवरच्या नवीन पुलाच्या बांधकामाबद्दल काल किती वेळ “खोल” चर्चा चालली व्हती. गेल्या ५ वर्षातला याच नदीवर त्याच ठिकानी बांधला जानारा हा तिसरा पूल! काय पन नीट काम करत नाहीत हे ठेकेदार अन् इन्जिनीयर का बिन्जिनीयर. मागच्या येळी बांधलेला पूल जो वर्षभराच्या आत पडायला हवा हुता तो साला दोन वरस टिकला. आमदारास्नी समजवता समजवता किती तरास झाल्ला. लई नुसकान झालं टक्केवारीमधी मागच्या वरसाला. या वरसाला ते सगळं भरून निघायला हव म्हटलं तर ह्यो नवीन ठेकेदार जरा जास्तच ईमानदार बनत व्हता. काल साला किती खर्च झाला त्याच्यावर, अख्खी कोंबडी अन् विदेशी रिचवली तरी हरामखोर मानायला तैय्यारच नाय. च्यामारी, आज रातच्याला रंभेबरूबर त्याची येगळी बैठक लावल्याबिगर हे बेण काय गळाला लागनार नाय. 

सकाली सकाली या सगळ्या इचारांनी टकुर्‍याचा नुसता भुगा झाला व्हता. सकाली परत जरा अर्धा ग्लास तीर्थ घ्यावं म्हनजे डोस्क जरा थंड व्हईल म्हनून उठलो तोपतूर आमचं धाकलं कार्टं वही घेऊन वर माडीवर आलं. अन् म्हनतं कस, “पप्पा, आज १५ आगस्ट हाय. मला  स्वातंत्र्याच्या बदलत्या संकल्पना या इषयावर निबूध लिवून आनाया सांगितला हाय, मास्तरनं. मला जरा लिव्हायला मदत करा.” च्यामारी त्या कुलकर्णी मास्तराच्या! लहान लहान पोरास्नी कसले डिफिकल्ट इषय देऊन राहिला हा मानूस. येवढी शाळा शिक्लो असतो तर म्याच मास्तर नस्तो का झालो. काय पन इषय, त्या पोरास्नी कस्ला दोष देनार. आमाला तरी कुटं त्ये सवातंत्र्याचा मीनिंग नीट कळ्ळा हाय! म्या त्याला दिला आबांकडे धाडून. लिव गपचिप वहीत काय सांगल तो त्या “सवातंत्र्य” अन् तेच्या काय “कल्पना” की “बिल्पना” बद्दल! मायला, कल्पनेच्या नावाचा नुस्ता विचार मनात आल्यावर कस वाईच बर वाटल, लई दिस झालं राव तिला भेटून. या एक दोन दिवसात काय तरी काम काढून शेजारच्या तालुक्याला चक्कार टाकली पाहिजे लेका! बघू… तर म्या कुटं हुतो??... आं...हा...हा....”आबा” 

आता आबा म्हन्जी माझा आजा, तेच्या तरूनपनात त्या गांधीबाबा बरूबर देस सोडवायला लई राबला, तुरूंगात पन व्हता. पन, सवातंत्र्य मिळाल्यावर या देशानं त्याला अन् आमच्या कुटूंबाला काय्य दिल्ल?? आयुस्यभर माझ्या आजेच्या अन आयेच्या अंगावर एक गुजभर सोनसुदीक घालू शकला नाय त्यो... अन् माझा बा. तायेच्या लग्नात हुंडा देनार नाय म्हणून त्या दीडदमडीच्या दौलतीबरूबर लगीन लावून दिल तिचं. सवातंत्र्यसैनिकाची पेन्शनपन नाय घेतली त्यांन, का तर म्हनं माझ्या देसासाठीच केलं. देश सवतंत्र्य झाला अन् म्या भरून पावलो म्हन!! 

म्या दहावर्षाचा होऊपातूर, माझा बा अन् माय गरिबीत टाचा घासून घासून मेले. गरिबीतून सुटले बिचारे, सवातंत्र्य मिळाले तेनला लवकर. येवढं सगळ होऊनसुदीक हे जुनं हाड अजूनही तरतरीत हाय. अन आता, अंगणात बसून येनार्‍या जानार्‍या परत्येकाला काय काब सांगत राहतू, भारताला सवातंत्र्य मिळून इतकी वरस झाली. ते मिळवायला लई लोकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली म्हनं. स्वराज मिळवण्यासाटी टिळक, गांधी, पटेल, सुभाष बोस या महापुरुसांच्या नेतृत्वाखाली अनेक जन लढाईत लढले, देशासाठी आपलं आविष्य अन् बलिदान दिलं म्हने. तवा गोर्‍यांच्या राज्यांतून भारत सवतंत्र झाला. आता बघ म्हनाव काय देशाचं काय वाटूळं चाल्लं हाय ते. नेते लोक स्वतःच्या “हात”कर्तृत्वानं देशाचं सवातंत्र्य विकायला निघाले हायेत, त्याच गोर्‍यांना! म्या त्यातरी करत नाय ना, चार पैसे हिकडून तिकडून जरा वेगळ्या मारगानं काय मिळवलं तर याचं सुख ठणकतया. तो स्वतः गरिबीत राहिला आसलं तर आमी का म्हनून गरिबीत रहाव?? म्या म्हनतो, सवातंत्र्य पायजे की नको मला, कुटल्या पन मार्गान पैसा मिळवायचा?? 

आर् तिच्या… सवातंत्र्यवरून लक्षात आलं, आज १५ ऑगस्ट हाये. आज लई ठिकानी चमकायचं हाय, झेंडा फडकावयाचा हाय!!. जबरदस्त रूबाब झाडला पाहिजे सगळीकडं. त्या झेंड्यापेक्षा माझं अन् माझ्या कपड्याचच जास्ती कौतिक केलं पाहिजे लोकांनी. 

दोन दिसांपूर्वीच पांढरा नेहरू शरट आनि पायजमा करकरीत इस्त्री करून घेतला असल्यानं तो परस्न सुटला व्हता. रामभाऊंनी कालच दोन डझन पलॅस्टिकचे झेंडे व तिरंगी श्टिकर (मेड इन चायना) एकदम आनुनशान ठेवले हायेत. हल्ली कागदी झेंड्यांची फॅसन नसल्यानं अन् कापडी झेंडे परवडत नसल्यानं, या छोट्या झेंड्यांवर अन् तिरंगी श्टिकर वरच साजरा करावा लागनार सवातंत्र्यदिन! काय महागाई म्हनायची ही!! आ??

घड्यालात ६-३० वाजलेल बघून “रामभाऊ” म्या जोरात वराडलो.

“काय मालक, काय आज्ञा हाय?” रामभाऊंचं मान खाली घालून उत्तर.

“अरं, त्या कोल्हापुरीला पॉलीस करायचय, पॉलीस बिगार बरं दिसल काय ते?”

“मालक, म्या रातच्यालाच करून ठेउलीय की” रामभाऊंनी आत्मइश्वासानं दिलेलं नम्र उत्तर मला लई आवाडलं. नोकर मानसानं कसं असं मालकाच्या सेवेत दक्ष असावं, जसं आम्ही नेते लोक जनतेच्या सेवेला कायम हाजिर अस्तो तसं!! च्यामारी लई भारीच की, डोस्क थोड ताळ्यावर आलं म्हनायचं. जोक सुचाले जनू....ही..ही..ही.

फटाफट दाढी आंघोळ झाली, नंतरन कडक ईस्त्रीचे कपडे… ऊंची परफुम वगैरे मारून ७ ला जनतेचा सेवक तैय्यार. चकाकनारी कोल्हापुरी चप्पल पायात अन् डोळ्यावर रेबॅनचा गॉगल घालून म्या आरश्यात सवतालाच नमस्कार करून घेत्ला आनि… रामभाऊंनी केलेल्या खास अंडा आमलेट-पावचा बेत संपवून घराबाहेर निघलो. डोस्कं ठणकाया लागलं तर उपाय म्हनून छोटी “औषधाची” बाटली पण खिषात ठेव्हून दिली.

कार्यकर्त्यांची गर्दी व्हती थोडीफार. सगळे बिचारे थंडीने पार गारठलेले दिसत हुते. त्यातल्या एका अनुभवी कार्यकर्त्यानं माझ्या डोईवर टोपी नसल्याचं हळूच खुणवलं. मल्ना तो इशारा कळण्याच्या आतच दादांनी माहे हातात एक करकरीत अन् कडाक गांधी टोपी दिली. म्या आता ती टोपी घालून स्कॉर्पीओ मध्ये बसलो व्हतो. काय तो रूबाब! बायकोनं दारातूनच डावा डोळा बारीक करून अन् बोटांच्या खुनेनं कपड्यात चिकना दिसत असल्याचं इशार्‍यानच सांगितलं. नसलेली कालर एकदम तराट झाली.



आबा हाय अंगणात बसलेला, त्या पोरास्नी जमवून काय बाय सांगत आसल; नायतर जनगन मन म्हणून घेत आसल. मला कंधी पन आबाचं बोलनं नीट कळल नाय. त्या गप्पांनी घर, संसार आनि ही गाडी चालतिया व्हय. बायकोला कशी गावची सरपंच बनवून दागिन्यांनी मढवली हाये. पैसा घरात दिल्ला की ती बी खुष आन म्याबी खुष. मंग कशाला चौकशा करतीया ती, म्या कुटं जातो अन् काय करतो ते. ती तिच्या सवातंत्र्यावर खुष आन म्या माझ्या. हे महिला सवातंत्र्य अन् सुक दिसत नाय आबाला! दादांनी आता निघायला हवची खून केली, झेंडा वाट बघत हुता नव्हका या जनतेच्या सेवकाचा.

रंग्याने गाडीला स्टार्टर मारला. आमची पहिली भेट तालुक्याच्या शाळेला व्हती, दुसरी शासकीय रुग्णालय, वाचनालय, महिला वसतीगृह; वसतीगृहानंतर व्यापारी बॅंक्येत. मायला, जवळचे सर्व झेंडे संपले असल्यान सिग्नलवर काही झेंडे इकत घ्यावे लागले. झेंडे इकत घेनं, हा सगळा परकार माझ्यासाठी तसा नवीनच हुता. कोन त्या झेंड्याला नंतर घरात घेऊन जानार हुतं? सिग्नलवर एक शेंबडं पोरगं हातात झेंडे अन् कडेवर एक काळवंडलेलं तान्हं नागडं बाळ घेऊन आमच्या जवळ आलं, “पाच का दो साहब”.

मी म्हटलो, “१० चे ६ देतो का?” 

हो-ना करता करता १० चे ५ झेंडे घेऊन यवहार फायनल केला. उरलाच एकाद दुसरा तर देतो आबाला पन. दोन-तीन दिस मला काही ज्ञान पाजणार नाही म्हणजे. नायतर भ्रष्टाचारावरून सतत त्याचं ते लेक्चर… पैसा पचनार नाही म्हनतो असला. काल त्या ठेकेदाराला घरात पाहून केवढ्या चौकश्या केल्या म्हातार्‍यानं… पुनींदा म्हणून असल्या मिटींग घरात ठेवनार नाय. रंग्यानं बॅंक्येसमोर रूबाब झाडायला जोरात कचकन बरेक लावला, आम्ही आल्याची वरदी हाये ती. पोरगं हळूहळू आमच्या तालमीत तैय्यार होतयं, पन लई सवातंत्र्य देऊन पन चालायचं नाय. कधी आपल्या विरूधात ऊब राहील भरवसा नाय. जरा याचा लगाम हातात ठेवला पाईजे… बघू.

व्यापारी बॅंक्येत अध्यक्ष सत्कारासाठी पुढ आले; नंतर भाषन वगैरे सगळ कसं नियोजीत. आबाच्या काय पाच-पन्नास लाईनी ऐकून ऐकून पाठ झाल्या व्हत्या, त्येच शबूद परत परत फिरवून भाषणात वापरले. त्या सर्व थोर मानसांची नावे घेऊन १० मिनीटाच भाषान ५ मिनीटात संपवून, आजून बर्‍याच ठिकानी जायच हाय आस सांगून आटोपतं घेतल. त्यानंतर चहा-पाण… मग परतीचा परवास. अगुदरच आमच्या गणपतीच्या मंडपाला फूल न फुलाची पाकळी म्हनून ५०,००० च्या देणगीची सोय कराया सांगून ठेवली व्हती बॅंक्येच्या लोकास्नी. त्यांनी दिलेल्या कित्येक खोट्या करजाचे कागुद जपून ठेवलेत म्या घरच्या तिजोरीत. आनि आमच्या सकाळच्या झोपेचं खोबर् करून वेळात वेळ काढून, एवढ्या लांब फकस्त झेंडा फडकावला अन् भाषन ठोकायला आलो व्हतो आमी!.. आमच्यासारख्या जनतेच्या सेवेत बिझी असणार्‍या माणसाच्या वेळेची एवढी तर किंमत नक्कीच मोजायला हवी त्यास्नी. 

रात्री डाक बंगल्यावर आमदार साहेबानं सोबत तालुक्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष बैठक ठेवली व्हती, त्याचबरूबर तालुक्यातील कलावंतांचा एक छोटेखानी कार्यक्रमही ठेवला व्हता. अमेरिका, जरमनी, जापान इ.. देश फिरूनही माझे पाय घट्ट मातीशी जोडलेले हायेत. माझ्या संस्कृतीचा, कलेचा मला अभिमान हायेच. तालुक्यातील दु:खी प्रश्न बघून मन खिन्न होत असतच त्यामुळे कार्यकर्त्यांनी औषधाची सोय आधीच केली व्हती. आता थकवा घालवण्यासाठी आमचा अभिषेक सुरू झाला हुता. गावठी कोंबडी, तिचीच अंडी, माहोल छान रंगला हुता बघा. मध्येच रंग्याला समजावून त्या ठेकेदाराची रंभेबरूबर येगळ्या बैठकीची सोय लावायला पाठवून दिल्ल. यंदा हे काम जमवून आनाया पाहिजे हुत. डायरेक्ट आमदारांचा आदेश व्हता, परसनली लक्ष घाला म्हनून.

सकाळी करकरीत इस्त्री करून घातलेला नेहरू शरट अन् पायजमा दिवसभराच्या धावपळीत पार चुरगाळला व्हता, मळला व्हता. लाल-पांढर्‍या रश्याचे डाग इकडं तिकडं पडले व्हते. डोक्यावरची पांढरी गांधी टोपी माझ्याच खुर्चीखाली धूळ खात पडली व्हती अन् उरलेला एक झेंडा हाडकांच्या ढीगार्‍याखाली तुमच्या अन् माझ्या डोळ्यांत हरवलेल्या सवातंत्र्य संग्रामाचे क्षन कुठे दिसतात का हे शोधत अखेरचा श्वास घेत हुता. त्याच वेळी बाहेर दूरून कुटतरी अस्पष्ट अशा गान्याच्या ओळी ऐकू येत व्हत्या,

जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा ।
वो भारत देश है मेरा ।

- ओंकार  बापट


२ टिप्पण्या: