अनामिका

"ऋतू गंध शिशिर" याचा विषय जाहीर झाला "नाव नसलेली नाती " आणि क्षणात माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ती! अनामिका! कोण होती, कुठली होती ,नावगाव काहीच माहित नव्हतं.देश,भाषा,सगळे काही वेगळे,तरीही नकळत नात जोडले गेल. सुखदुःखाने भरलेल्या या आयुष्यात कुठे काही हरवते ते स्व:करायचे आणि जे सापडले ते अनमोल जतन करून ठेवायचे त्यापैकी ही "अनामिका". खरंतर पुर्वजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय अशी नाती जुळत नाही जुळलेली नाती तोडायची नसतात हे मी मनोमन जाणते म्हणूनच गेली तीन वर्षांपासून हे नात आम्ही हळूवारपणे जपत आहोत.

नेहमी प्रमाणे संध्याकाळी मी एकटीच स्वीमींगटँक वर बसले होते.तेवढ्यात समोरुन एक चायनीज बाई येताना दिसली. (वय अंदाजे 75 च्या आसपास असावे). सहज माझी नजर तिच्याकडे गेली.दिसता क्षणी ती हसली.मी हसून प्रतिसाद दिला.तिने शेकहँन्ड करण्यासाठी हात पुढे केला.दुसर्या क्षणी तिचा प्रेमळस्पर्श मला जाणवला.किती आपुलकीने तिने मला साथ दिली होती.नजरेची भाषा समजली.काही बोलावे म्हणून तोंड उघडले तर शब्द अबोल झाल्यासारखे वाटले.तिला चायनीज भाषा शिवाय इतर कुठलीही भाषा येत नव्हती. भाषेची भली मोठी भिंत आमच्यामध्ये उभी होती. शब्द अबोल झाले तरी नजरेतून प्रेमाच्या भावना व्यक्त करत होतो. दोघींच्या चेहर्यावर एकमेकींना भेटल्याचा आनंद दिसत होता.

हवेत खूप उकाडा होत असताना थडगार वार्याची एखादी झुळुक यावी तशी ती हळूवारपणे माझ्या आयुष्यात आली. आज तर ती माझ्याजवळ येऊन बसली. खूप प्रेमळ नजरेने मला न्याहाळत होतो ,काय बघते अशी ही? मला प्रश्न पडला. तेवढ्यात(हातवारे करून) "तू खूप सुंदर दिसते" म्हणत. तिने माझी ओढणी काढून घेत स्वात:च्या खादयांवर टाकत (जशा लहान मुली नवीन फ्राँक घातला की विचारतात,आई मी कशी दिसते? त्या प्रमाणे ती मला विचारत होती). तिचे ते बालीश रूप मला खूप आवडले. मी खुदकन हसले. "खूप छान" हाताने अँक्शन करुन सांगितले.ती खुष झाली,असे बर्याच वेळा मी विविध ज्वेलरी किंवा चांगले ड्रेस,हेअरस्टाईल केली की मला "तू खूप छान दिसते" हे आवर्जुन सांगायची. बहुतेक तिला भारतीय संस्कृतीची आवड होती असे वाटते.एके दिवशी तर तिने चक्क राज कपूरचे "आवारा हूं" या गाण्याचा मुखडा म्हणून दाखवला.मी आश्चर्याने बघतच राहिले, वन्स मोर. तिने परत म्हणून दाखवले. आवारा ऐवजी "आवाडा हूं " हे दोन शब्द समजले. गाण्याचे पुढीचे सर्व शब्द चायनीज भाषेत होते पण टोनींग मात्र आपल्याच गाण्याची होती. परत उठून उभी राहून कथक डान्सची अदा एवढ्या सुंदर पध्दतीने करुन दाखवली की मी आश्चर्याने पहातच राहिले.काय "अजब रसायन" होतं माझ्या समोर.मी मराठी तर ती चायनीज,देश प्रांत भाषा वेगळी, कुठलाही संवाद नाही,अबोल शब्द. एवढच काय? या नात्याला कुठलेही नाव नव्हते. अशा नात्याची कोंडोमध्ये चर्चा व्हायची. आम्ही दोघी बरोबर असलो की लोक विचित्र नजरेने बघत असत. 

भेटी वाढू लागल्या तशा तिच्या व माझ्या आवडीनिवडी मध्ये बरेच साम्य असल्याचे जाणवले. मी पन्नाशी पार केलेली धुवून वापरून मऊ झालेल्या सोलापूरी चादरी सारखा माझा "स्वभाव"तर ती 75 च्या जवळ पोहोचलेली. तिचा स्वभाव मात्र मिठाई वर लावलेल्या "राजवर्खासारखा "आधार देणारा वाटत होता.मी तिला दिसताक्षणी खांदयावर हात टाकून मला कवेत घ्यायची.फार आपुलकी वाटत होती तिला माझ्याबद्दल,मला मात्र अवघड्ल्यासारखे व्हायचे.अजून नीटसा परिचय झालेला नव्हता. सुरवातीला तिचे असे वागणे तिच्या मुलीला आवडत नसे पण "अनामिका "मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माझ्याशी प्रेमाचे नात जपत होती. यानात्या मध्ये मतलब नव्हता,ना स्वार्थ,ना गरजेपुरते होते" स्नेहबंधनातून हे नात जोडले गेले होते.

मी योगा करते हे तिला माहित होते म्हणून मला योगा करुन दाखवअसा इशारा करत माझ्या बरोबर माझ्या घरी आली.मिस्टरांना म्हटलं,बघा आज नवीन पाहुणे आले आहेत आपल्या कडे. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. म्हटलं काही उपयोग नाही बोलून हातवारे करून सांगा. मग तिला थोडे योगासन व प्राणायाम करुन दाखवले.खूप खुश झाली. आमच्या दोघींची आठवण म्हणून मी तिच्या बरोबर फोटो काढून घेतले. तिला ही माझ्या बरोबर फोटो काढून पाहिजे होते,म्हणून आम्हा दोघांना घेऊन तिच्या घरी गेली.

तिच्या घरात कोणीही नव्हतं. आम्हा दोघांना बसण्याची खूण करून ती आत गेली. पाच मिनिटांत कपडे बदलून तयार होऊन माझ्याजवळ येऊन बसली. मिस्टरांनी आमचे फोटो काढले, नंतर ती अल्बम घेऊन आली. सर्व फोटो दाखवत असताना तिने पंजाबी ड्रेस घालून काढलेला फोटो पाहून आम्ही चकित झालो. त्यानंतर त्या दोघांचे फोटो दाखवत नवरा चार वर्षांपूर्वी गेला हे सांगत असतांना तिचे डोळे पाणावले होते. मी हळुवार हात तिच्या पाठीवर ठेवला. शब्दाविणा माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तिला खूप बरे वाटले. आम्ही तिचा निरोप घेऊन घरी आलो.

एकदा अनामिका ,तिची मुलगी व जावाई येतांना दिसले. मला पाहून ती खुष झाली. हाय हॅलो केले. काहीतरी मुलीशी बोलली व माझा हातधरून त्या दोघांना बायबाय करत माझ्या बरोबर निघाली.मला भीती वाटली.तिची मुलगी आता नक्की रागवणार ,काय करायचं? मी विचार करत असताना तिच्या मुलीने हसतहसत, "हाय ऑंटी, How are you?” मला हे अनपेक्षित होते. मी हसून होकारार्थी मान डोलावली. ती म्हणाली, "माझ्या आईला तुम्ही फार आवडता." मला आश्चर्याचा धक्काच बसला. ती स्वतः एवढी स्मार्ट असताना,काय होत एवढ माझ्यात तिला आवडण्यासारख? हे मात्र मला आजपर्यंत कळले नाही, असो.

दिवा बोलत नाही पण त्याचा परिचय प्रकाश देतो तसेच "अनामिका "चा परिचय तिच्या मुलीने करून दिला होता.तर अस हे आमच्या दोघींच "नाव नसलेले नात "यात कुठे संवाद नव्हता फक्त बॉडी लँग्वेजद्वारे आम्ही भावना व्यक्त करत होतो.


आकाशाला टेकतील असे हात नसतील माझ्याजवळ......

फुलांचे संगीत ऐकणारे कान नसतील......

निसर्गाचे सुंदर सौंदर्य पाहणारे डोळे नसतील......



पण अशा सुस्वभावी व्यक्तींची आठवण साठवून ठेवण्याची क्षमता असणारे "हृदय" मात्र माझ्याजवळ आहे.त्या हृदयाच्या कप्प्यात मी ह्या आठवणी सदैव जपून ठवेल, अगदी शेवटपर्यंत......!


धन्यवाद!



- सौ.प्रतिभा मुकूंद विभूते





1 टिप्पणी: