आरोग्यम् धनसंपदा - आरोग्य नेत्रांचे

पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळा हा अतिशय महत्त्वाचा नाजूक आणि सुंदर अवयव आहे. डोळ्याचे मुख्य काम म्हणजे रुपग्रहण - बघणे किंवा दर्शन. हे काम अतिप्रमाणात झाले किंवा कष्टाने झाले तर डोळ्यांना थकवा येतो. आजकालच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये टीव्ही, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, टॅब्स, व्हिडीओ गेम्स म्हणजे करमणूक असं समीकरणच तयार झालं आहे आणि लहान मुलांचे मैदानी खेळ खेळणं खूप कमी झालं आहे. त्यामुळे डोळ्यांवर अधिक ताण पडतो. हल्ली शाळेतील मुलांमध्ये चष्म्याचं प्रमाण अधिकचं वाढलेलं दिसून येतयं. ही खरच खूप गंभीर समस्या आहे. तेव्हा आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय उपाय योजना करावी याचा ह्या लेखात आपण विचार करुया...


नेत्ररोगांची लक्षणे- 

* सतत डोळ्यांतून पाणी येणं किंवा डोळे कोरडे होणे

* डोळ्याच्या ठिकाणी जडपणा, खाज किंवा आग होणे

* डोळ्यामध्ये खुपणे किंवा टोचल्यासारखे दुखणे

* डोळ्यांमध्ये धुरकट दिसणे, सूज येणे, लाल होणे किंवा डोळ्यांमध्ये नेत्रमल (जास्त घाण) येणे

* पाहताना किंवा वाचताना त्रास होणे, जवळचे किंवा दूरचे अस्पष्ट दिसणे

* पापण्यांच्या ठिकाणी दुखणे तसेच डोळ्यांची उघडझाप करतांना त्रास होणे

* डोळेदुखी, तीव्र प्रकाश सहन न होणे

* डोळ्यापुढे मध्येच चमकल्यासारखे वाटणे तसेच eye floaters (सूक्ष्म वस्तू तरंगल्यासारखे) दिसणे 


नेत्ररोगांची कारणे-

* टीव्ही, कॉम्प्युटर, स्मार्टफोन (any back-lit screen) यांच्या सतत वापर करणे

* सतत वाचन करणे, अतितीव्र किंवा अपुऱ्या प्रकाशात खूप जवळून किंवा झोपून वाचायची सवय 

* चालत्या वाहानात वाचणे किंवा व्हिडीओ गेम्स खेळणे

* सतत उष्णतेजवळ काम केल्याने, धूळ-धूर यांच्याशी सतत संपर्क/ वातावरणातील प्रदूषण

* जागरण, रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघणे, रात्रपाळी

* प्रखर उन्हात पोहणे

* उन्हातून आल्या आल्या थंडगार पाणी पिण्याची सवय तसेच उन्हातून आल्यावर ताबडतोब थंड पाण्याने आंघोळीची सवय

* सतत रडणे, शोक करणे

* धूम्रपान, वेगावरोध (मल मूत्र अधिक काळ पर्यंत रोखून धरण्याची सवय)

* डोळ्यांच्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर

* अनुवंशिक (Hereditary)

* दीर्घकाळापर्यंत मधुमेह (Diabetes) उच्च रक्तदाब (High B.P.) किंवा हृदयरोग (heart disease), वृक्कविकार (kidney disease) असे आजार

* “अ” जीवनसत्वाची कमतरता

* आहार - तिखट, आंबट, खारट पदार्थ, लोणची, पापड, व्हिनेगर, उष्ण मसालेदार पदार्थ, Preservatives असलेले पदार्थ, Junk and fast food यांच्या अतिप्रमाणातील सेवनाने पित्तप्रकोप होऊन डोळ्यात रोगनिर्मिती होते


डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? 

* नेत्ररोगांची कारणे कटाक्षाने टाळावी

* कुठलीही illuminated screen बघतांना किंवा कॉम्प्युटर वर काम करतांना थोड्या थोड्या वेळाने डोळे बंद ठेवून किंवा डोळ्यांचे साधे सोपे व्यायाम करुन डोळ्यांना विश्रांती द्यावी

* रोजच्या आहारात खालील पथ्यकर आहाराचा समावेश करावा 

भाज्या- गाजर, मुळा, कारले, पडवळ, वांगी, शेवग्याच्या शेंगा, पालक, चवळी, पालेभाज्या

फळे- केळी, द्राक्ष, काळ्या मनुका, खजूर, आवळा, डाळिंब

धने ,जीरे,  सैंधव मीठ, कोथिंबीर, मूग तसेच दूध-तुपासारखे स्निग्ध पदार्थ

* अंजन- डोळ्यामध्ये काजळ घालावे

* पादाभ्यंग व शिरोभ्यंग- तळपायाला व डोळ्यांना तेलाने मालीश करावी. 

* डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या, काकडीचे काप किंवा कोरफडीच्या पानाचा काप ठेवावा. 

* नेत्रधावन (eye wash) डोळे पाण्याने स्वच्छ धुवावेत. पाणी भांड्यात किंवा eye wash glass मधे घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करावी. 

* आसने- सूर्यनमस्कार, सिंहमुद्रा, शिर्षासन. 


* डोळ्यांचे साधे व सोपे व्यायाम (eye exercise) 

१. त्राटक- त्राटक म्हणजे एकटक पाहत राहाणे. 

एखादी विशिष्ट वस्तू (शक्यतोवर तेलाचा दिवा किंवा मेणबत्ती ज्योत) डोळ्याच्या समान पातळीवर ठेवून त्याकडे बुब्बुळ व पापणी न हालवता पाहात राहाणे. डोळ्यावर ताण आल्यास अथवा डोळ्यातून पाणी आले की डोळे बंद करावेत. ही प्रक्रिया ३/४ वेळा करावी. 

२. डोळ्यांवर दाब- यामध्ये ५-१० सेकंद डोळे हाताच्या तळव्याने घट्ट मिटावेत. त्यामुळे डोळ्यांचे स्नायू बळकट होतात.

३. जवळ व दूर बघण्याचा व्यायाम- उजव्या हाताचे पहिले बोट (तर्जनी) नाकापासून दीड ते दोन इंच अंतरावर धरुन बोटाच्या अग्राकडे ३ सेकंद बघत राहावे. मग आधीच ठरवून ठेवलेल्या दूरच्या वस्तूकडे ३ सेकंद बघावे. 

कॉम्प्युटरवर सतत काम करत असताना वरील दिलेले डोळ्यांचे व्यायाम अधून मधून करावे. 


“आँखें  सलामत तो Apps पचास !” 



- डॉ. रुपाली गोंधळेकर
M.D. (A.M.), B.A.M.S.

       



२ टिप्पण्या: