प्रवास योगा

योगा, फिटनेस जिम, व्यायाम, झुंबा अशी काही नावं ऐकली की आजकाल माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. ट्रेडमिलवर कोणीही समोर धावत नसताना आणि त्यापेक्षाही मागे कुणी लागलेलं नसताना धावणं, - (त्यावर बायको म्हणते, त्यापेक्षा रस्त्याने चालताना इकडे तिकडे न बघता भरभर चालत चला.....) क्षमता आजमावण्यासाठी गोल दंडाकृती वजनं उचलत राहणं, (- आई म्हणते त्यापेक्षा दळणाचा डबा रोज १५ दिवसांनी आणि महिन्याला जिन्यावरून उतरून घेऊन जात जा...) पोटाचे वेडे-वाकडे प्रकार करत दाबत राहणं (...त्यापेक्षा रोज १२ सूर्यनमस्कार घाल – पुन्हा मातोश्रीच).. अश्या विभिन्न मतांच्या गलबल्यात सापडलेला मी, मग काहीच न करता आळश्यासारखा बसून, मोबाईलवर पेपर वाचत किंवा गाणी ऐकत (गाण्यांच्या नावाखाली whatsapp) नाहीतर लोळत राहिलोय. आणि मग एक दिवस ह्या आळशीपणाने दणका दिलाच...

ऑफिसमध्ये वार्षिक आरोग्यतपासणी करताना, ब्लडप्रेशर जास्त आलं... आता ब्लडप्रेशर मोजणारी ती बया इतकी सुंदर, देखणी आणि नीटस होती की माझं स्पष्ट मत आहे, त्यादिवशी सगळ्याचंच ब्लडप्रेशर नेहमी पेक्षा नक्कीच जास्त आलेलं असणार. पण का कुणास ठावूक त्या मायादेवीने माझ्या नावापुढे “CONSULT YOUR PHYSICIAN; FOLLOW GOOD DIET” असं काही लिहिलं, आणि आमच्या घरात धाबं दणाणलं... “कितीदा सांगितलं तुला जरा बुड हलव आणि रात्री जेवण झाल्यावर शत-पावल्या घाल... पण नाही ! ऐकेल तर तू गोखले कसा ... – इति मातोश्री... त्यात सौ.ने अजून री ओढली... आणि आमचं ६ वर्षाचं पोर... माझ्या गलेलट्ठ पोटावर चापट्या मारत म्हणालं, “बाबा बाबा ... आता तुम्ही अमितच्या बाबांसारखी जिम जॉईन करा, ते की नाई रोज ऑफिसमधून आल्यावर जिमला जातात...” “हो का... करतो हं बाळा..” असं म्हणत मी इकडे तिकडे बघितलं तर सौ. आपली धारदार नजर रोखत म्हणाली, “आता उद्यापासून कार बंद..” कार बंद म्हटल्यावर एकदम आ वासला.. “जोपर्यंत ब्लडप्रेशर कमी होत नाही तोपर्यंत...” – “अगं, कारने थोडीच काही ब्लडप्रेशर वाढतं... तुझी महिन्याची खरेदी आणि क्रेडीट कार्ड बिलांनी वाढलंय बहुदा..” (दुसरं वाक्य मी मनात म्हटलं हे सुजाण आणि सूज्ञ हितचिंतकांनी नक्कीच ओळखलं असणार).

असो, तर त्या दुसऱ्या दिवसापासून माझी कार बंद झाली... आणि रोज सकाळी ऑफिसची बस पकडण्याची धावपळ सुरु झाली.. सकाळी मिळणारा भरपेट नाश्ता फक्त एका जुसावर आणि कसल्याश्या तुरट गोडीच्या रसावर येऊन थांबला. त्यानंतर आता मला धावत धावत बस पकडताना पाहून डोंबिवलीचा नागुशेठ (नागेश हे त्याचं खरं नाव) नाकात अलगदपणे तपकीर कोंबत लगेच खोचकपणे म्हणाला, “ह्या: ह्या: काय गोखले, आजकाल बसने. काय विचार काय?.. वजन कमी करतोयेस वाटतं !” मनात आलं, ‘नाग्या आधी स्वतःची बोचकं झालेली ढेरी सांभाळ… कधीपण बेल्ट तोडून बाहेर येईल..’ पण म्हटलं, कुठे सकाळ सकाळ ह्याच्या नादी लागा.. मी नुस्त हुंs करून मागच्या सीटवर घाम पुसत पुसत जाऊन बसलो.. तिथे रमीचा डाव रंगात आलेला होता. त्यातल्या काणेमामांनी आता पुढचा डाव तू खेळ असा नजरेने इशारा केला... डाव सुरु झाला आणि मग मी आजकाल बसने का येतो ह्याची तिथल्या (चांडाळ !) चौकडीने मोठ्या आस्थेने चौकशी केली... मी बापडा .. सांगितलं खरं कारण... आणि मग त्या चांडाळांनी आता तू रोज पहाटे लवकर ऊठ .. आणि धावायला जात जा, पासून रोज ५ किमी चाल झालीच पाहिजे... तेलकट तुपकट कमी खां, असं म्हणत माझ्यासमोर नुकतीच नाक्यावर घेतलेली कांदा, मुग भजी गप्प खल्लास करून टाकली. सकाळी उठून लिंबू-मध-गरम पाणी पीत जा रे.. १० दिवसात वजन आणि ब्लडप्रेशर नॉर्मल !.. किंवा रोज झोपताना एक छोटासा विस्किचा पेग घे.. हमखास वजन कमी होईल इत्यादी मौलिक माहिती दिली..

ऑफिसला पोचल्यावर बाळ्याने ग्रीन टी आणून दिलान.. वर म्हणतो कसा, “रोज ह्या प्या आता साहेब, एकदम ठणठणीत व्हाल”. विचारलं, तुला कुणी सांगितलं तर म्हणतो, त्यात काय, मी कालच सगळ्यांचे रिपोर्ट बघितले, आणि आजपासून सगळ्यांना त्याप्रमाणे चहा, नाश्ता देणारेह. त्यात तुमचा नंबर पहिला आहे.” त्याच्यावर खेकसणार तेव्हढ्यात साहेबाने फोन करून बोलावलं. वाटल, की कालची क्लायंट मिटिंग नोटस मागत असेल, म्हणून प्रिंट काढून घेऊन गेलो, तर भलतच. म्हणाला की, “गोखले आज पासून तुम्ही माझ्याबरोबर गाजर, बीट ज्यूस घेत चला… आणि दुपारचं जेवण कमी घ्या..” कुणाचं काय तर कुणाचं काय ! बाहेर आलो तर मदिराक्षी मीनल मोने माझ्याकडे टक लावून पाहत होती. आता हिला काय झालं असा विचार येत नाही तर समोर एका झुम्बा क्लासचा फॉर्म नाचवलान .. म्हणाली, मी इथेच जाते, तू पण ये .. १००% खात्री..” आता ही मदिराक्षी तिकडे झुम्बायला जाते म्हणून जावं तर फी पाहून डोळे पांढरे झाले. “हो ... हो... येईन हं’ असं म्हणत तिला टाळून जागेवर आलो, तर शेजारी बसणारा विन्या काहीतरी brochure नाचवत घेऊन आला.” अरे गोखल्या, हा बघ नामी उपाय .. योग with म्युझिक .. नाहीतरी तू एवीतेवी तबला कुटत असतोस न, आता योगा करत कूट. मी मला योगाच्या कुठल्याश्या पोझमध्ये tabla कसा वाजवता येईल ह्याच्या विवंचनेत पडलो.

त्यानंतर दर तासा-दिड तासाने आळीपाळीने माझे हितचिंतक सहकारी (!) जाता येता विचारपूस करत काहीबाही योगा, रामदेवबाबाच्या CD, कुठलीशी brochure देत राहिले. कसाबसा त्या सगळ्यांना टाळत, कामाचा उरका पाडत संध्याकाळी घरी जायला निघालो. ऑफिस बसमध्ये फुकट डोक्याला पुन्हा ताप नको म्हणून सांताक्रूझ ते दादरपर्यंत बेस्टच्या AC बसने आलो आणि दादर ते ठाणा लोकल पकडावी ह्या विचारात स्टेशनवर पोचलो तर ही तोबा गर्दी... गर्दीच्या एका टोकावरून दुसरीकडे रेटा देत देत पोचलो आणि आलेल्या फास्ट ट्रेनमध्ये कोंबता झालो.. आधी फूटबोर्डवर, नंतर पुढल्या स्टेशनला मधल्या भागात आणि नंतर मुलुंडला direct दुसऱ्या दाराच्या खांबाजवळ...मस्तपैकी हातापायांची मशागत, कधी एक हात वरती, कधी दोन्ही हात वरती, कधी कोणाचं वजन खांद्यांवरती, कधी पाठीला जोरदार रेटा, कधी एका पायावर रेलत ...आणि वेगवेगळी आसन करत, कसरती करत.. त्या भयंकर गर्दीत स्वतःला, बॅगेला आणि पाकिटाला सांभाळत ठाण्याला एकदाचा उतरलो. अचानक 3-4 किलो वजन कमी झाल्याचा भास मला झाला. घरी पोचलो, आणि वजनकाट्यावर उभा राहून बघतो तो काय खरंच 2 किलो वजन कमी झालेलं.

स्वतःशीच खुदकन हसत, फटाफट कपडे बदलून चिरंजीवांबरोबर खेळायला लागलो. ९ वाजले तशी जेवण तय्यार आहे.. मग मला सात्विक आहार सुरु झाल्याचं समजलं,.. काहीसा नाक मुरडत गपगुमान खाऊन मोकळा झालो... झोपायची वेळ झाली तसा मी सहज रशिदखानचा मुलतानी लावला आणि गुंगत गुंगत सकाळपासूनचा नित्यक्रम आठवता झालो.. आणि एकदम लक्षात आलं की वेगळ काहीही करण्यापेक्षा जर लोकलचा प्रवास केला तर झुंबा, योगा, जिम, सुर्यनमस्कार सगळंच एका प्रवासात घडून गेलंय ते ... आपसूकच फिटनेस, वजन सगळं काही साधून घेऊ शकतो...

आणि ठरवलं तर, ती कार नको, ती ऑफिसची बस पण नको... झुंबा, योगा, जिम, सूर्यनमस्कारला मारा बुट्टी .. खऱ्या मुंबईकराचा खरा झुंबा, योगा, जिम, व्यायाम हा लोकल प्रवास हाच आहे. आणि तोच उत्तम उपाय आहे... सकाळी उठलो, भरभर आवरून सात्विक नाश्ता करता झालो, आणि तडक स्टेशन गाठून लोकलची सवारी पकडून व्यायामाला सुरुवात करता झालो...अहाहा काय सांगू तो अनुभव...

तर मग काय म्हणता मुंबईकर... कधी सुरु करताय तुमचा लोकलचा “प्रवासयोग” !
- ओमकार गोखले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा