कथा ‘अभंग तुक्याचे’ या ध्वनिफितीची

संत तुकाराम यांच्या अभंगांना अनेकांनी चाली बांधल्या आहेत. अनेकांचे अभंग लोकप्रिय झाले. त्यात काही प्रसिद्ध नावे आहेत रामभाऊ फाटक, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि श्रीनिवास खळे. खळ्यांनी बांधलेले तुकारामांचे अभंग त्यातील वेगळेपणामुळे गाजले.

श्रीनिवास खळे यांनी गायनाचे धडे उस्ताद फैयाज खान आणि पंडित मधुसूदन जोशी यांच्याकडे गिरवले. गाणे हेच उद्दिष्ट ठेऊन ते बडोद्याहून मुंबईला आले आणि भगीरथ प्रयत्न केल्यावर संगीत क्षेत्रात स्थिरावले. 

त्यांनी अनेक कवींच्या कवितांना चाली बांधल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या. काही उदाहरणे द्यायची तर ‘श्रावणात घन निळा’, ‘जाहल्या काही चुका’, ‘कळीदार कापुरी पान’. ते अभिजात चाली बांधतात अशी रसिकांची धारणा झाली. 

संत तुकाराम यांचे निवडक अभंग आपण चाली बांधून घेऊन गावेत अशी कल्पना खरंतर लतादीदी यांची होती आणि त्यांनी श्रीनिवास खळे यांना काही अभंग निवडून त्यांना चाली बांधायची विनंती केली. खळे यांना या कल्पनेने स्फुरण चढले. ते रात्री तुकारामाची गाथा घेऊन बसले आणि पहाटे ४ पर्यंत त्यांनी २५० अभंग निवडले ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा अभंग त्यांना सर्वात उत्तम वाटला आणि त्यांनी तेथेच चाल बांधली. जेव्हा लतादीदींना सांगितले २५० अभंग निवडले आहेत तेव्हा लतादीदींनी खळ्यांना गो. नी. दांडेकरांना भेटायचे सुचवले. गोनीदां यांनी २५० मधील २२ शेवटी निवडले. २२ सुद्धा मोठी संख्या असल्याने अभंग निवडीची समस्या संपलेली नव्हती.

त्याकाळात कविवर्य प्रा. वसंत बापट MA करिता तुकाराम शिकवत असत. खळे यांनी बापटांची मदत घेतली. बापट यांनी २० अभंग काढून दिले. तरीही समस्या संपली नाही, तेव्हा त्यांनी विद्याधर गोखले यांची मदत घेतली आणि गोखल्यांनी १७ अभंग काढून दिले. 

अखेर खळ्यांनी लतादीदींना अभंगांची चाली ऐकायला बोलावले. तेव्हा दीदी म्हणाल्या २० पैकी तुमच्या आवडीच्या १२ अभंगांना चाली द्या. अशा तऱ्हेने अनेक विद्वान मंडळींच्या मंथनातून अभंगांची निवड झाली. ह्या अभंगांना चाल लावताना खळे यांनी एक भान ठेवले. चाल ही पारंपारिक न ठेवता आधुनिक असावी पण त्यात संतांच्या मातीचे संगीत असावे. त्यामुळे या ध्वनिफितीमधील बहुतेक चाली या रागदारीवर आधारित आहेत. साथीला पखवाज वापरल्याने त्यातील प्रासादिक अंग अतिशय उठावदार झाले आहे. अर्जुन शेजवळ यांनी पखवाजाची साथ केली आहे. 

जेव्हा ध्वनिफीत प्रसिद्ध झाली तेव्हा खळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यातील ‘भेटी लागी जीवा’ हा अभंग गझल नवाझ गुलाम अली यांना फार आवडला. विदुषी बेगम अख्तर यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पंडित कुमार गंधर्व यांनीही या अभंगांचे कौतुक केले आणि नोटेशन लिहून घेतले. खळे यांची यावर एकच प्रतिक्रिया होती की ही सगळी सरस्वतीची कृपा आहे. 


या ध्वनिफितीमधील अभंग खालील प्रमाणे होते,

१. ‘जय राम कृष्ण हरी’ 

२. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ - राग यमन 


३. ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे’ - राग भैरवी 

५. ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ’​ 

६. ‘हाति नेम आता न फ़िरे माघारी’ 

७. ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई’ - राग भूप 

८. ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’​ 


१०. ‘कन्या सासुर्याशी जाय’​ 

११. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’


१२. ‘हेचि दान देगा देवा


या ध्वनिफीतीला प्रा. राम शेवाळकर यांच्यासारख्या विद्वानांचे निरूपण होते.

मराठी समाजाचे भावविश्व् समृद्ध केल्याबद्दल या ध्वनिफितीशी जे लोक निगडित होते त्यांचे मनःपूर्वक आभार…

(संदर्भ : नाद संवाद लेखक सुभाष डोंगरे)

शैलेश दामले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा