अज्ञानातील सुख?

असतो मा सद् गमय 
तमसो मा ज्योतिर्गमय 
मृत्योर् मा अमृतं गमय

चर्चेतून, चळवळीतून, चिंतनातून, आणि ह्या विषयावरील मी केलेल्या वैचरिक मंथनातून ही प्रार्थना मला जरा वेगळ्या संदर्भात भेटते. जरा व्यंग्यात्मक आणि उपरोधात्मक तऱ्हेने ह्या प्रार्थनेचा गर्भितार्थ माझ्या मनावर उमटतो. ह्या विषयाच्या विविध पैलूंवर कित्येक विचारवंतांनी ह्या पूर्वी किती काही आशदायक असे लिखाण केलेले असेल कारण हा विषयच मुळात इतका व्यापक आहे की ह्या विषयावरील विविध व्यक्तींचे विचार निश्चितच निरनिराळे असू शकतील. आपल्या संस्कृतीत रुजलेल्या ह्या प्रार्थनेत आम्ही माणसे ईश्वरास कुठलीही ऐहिक मागणी करत नाही तर त्यास आम्ही साकडे घालून विनवतो की "हे ईश्वरा, आम्हास असत्यातून सत्याकडे, तिमिरातून तेजाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे ने.

वाचकहो, मला विचारावेसे वाटते की खरोखरी का असत्यातून सत्याकडची, अंधारातून तेजाकडची वाटचाल सुखद असते?? काही भ्रम भ्रमच राहिले तर? काही सत्य नाहीच कळले तर? अज्ञानात सुख आहे असे म्हणतात ते चूक नाही. ज्ञानाच्या शोधात निघालेल्या गौतम बुद्धांना ज्ञानाचा बोध होतास अखेरीस विरक्तीच आली ना? बऱ्याचदा भ्रम किंवा अज्ञानात माणसे जीवनातील लहानसहान गोष्टींमधील आंनद अधिक उपभोगतात. बालकावस्थेत आम्हा सर्वांमध्ये निरागसपणा असतो. आम्ही अज्ञानीच असतो आणि म्हणूनच "झाडे हिरवीकंचच का?" हा प्रश्न देखील लहान मुलास आश्चर्यात टाकतो. थोडे मोठे झाल्यावर झाडे ही chlorophyll मुळे हिरवीकंच असतात असे समजल्यावर झाडांच्या हिरवेगार असण्यावर तितकेसे आश्चर्य वाटतात नाही. लहानपणी आम्हा सर्वांनाच आकाशात गडगडल्यावर "देवाची आजी जात्यावरून पीठ दळत आहे" असे आज्या सांगायच्या. पण बुद्धी वाढताच त्या मागचे वैज्ञानिक सत्य समजल्यावर त्यातले कुतूहल संपले. खरे ना? तात्पर्य हेच की जसजशी आमच्या बुद्धीची वाढ होते तसतसे आमचे कुतूहल संपते. जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन, बेंजामिन फ्रॅंकलिन जे जगातील प्रत्येक बाजूला तार्किक, अनुपातिक वा विश्लेषकपणे तसेच वैज्ञानिक आणि सैद्धांतिक पातळीवर पारखल्या खेरीज शंकेनीच पाहायचे, असल्या ह्या वैज्ञानिकांचे शेवटचे शब्द होते की "आम्ही जन्मभर हाच विचार करत राहिलो की एके दिवशी आम्ही जगातील साऱ्या रहस्यांना जाणून घेऊ पण जीवन संपते वेळी ह्या उलटच झाले. त्या रहस्यांच्या जितके खोलात गेलो तितकी ती रहस्यं अधिकाधिक खोल झाली. आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांना उरात घेऊनच आम्ही ह्या जगाचा निरोप घेत आहोत.

वाचकहो, आइनस्टाईन हा एक वैज्ञानिक जरी असला तरी तो आमच्या शंकराचार्यांइतकाच आध्यात्मिक देखील होता. जगातील अनेक अनाकलनीय पैलूंचा अभ्यास वैज्ञानिक आधारावर तपासून पाहणाऱ्या ह्या गणितज्ञाला कुणी मरतेवेळी विचारले," पुन्हा जर जन्म मिळाला तर भौतिकशास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ म्हणून जन्माला यायला आवडेल का?" त्यावर आइनस्टाईन म्हणाला, "जर पुन्हा मनुष्य रुपात मला जन्म मिळाला तर मी अगदी सामान्य बुद्धीच्या माणसाचा जन्म घेणे पसंत करेन. जीवनातील लहानसहान गोष्टींमधील सुख वेचून (अधिक खोलात न जाता) एक परिपूर्ण आयुष्य घालवणे स्वीकारेन."

वाचकहो, जगातील ज्ञानी व्यक्तींचे जीवन कदाचित फार सुरेख नसते. ज्ञानाचा ताप पेलणाऱ्या ह्या महापुरुषांना पहाटेचा थंड वारा, नुकत्याच उमललेल्या फुलाचा वास, पावसात भिजलेली चमचमणारी उन्हे, सूर्यास्ताच्या वेळी आसमंतात होणारी रंगांची उधळण, खडकांवर आदळणाऱ्या समुद्री लाटा अन त्यातील संगीतध्वनी सहसा खुलवत नाहीत. कुठल्याही कारणाशिवाय गुणगुणणे देखील त्यांना जमत नाही. एवढेच काय तर फारश्या भावनिक गुंतागुंतीत न रमणारे हे महापुरुष हृदय हा रक्ताचे शुद्धीकरण आणि अभिसरण करणारा शारीरिक अवयव आहे आणि त्याचा भावनेशी काही एक संबंध नाही, " असल्या ठाम वैज्ञानिक दृष्टीकोनामुळेच नात्यांमधील ओलावा अनुभवण्यात देखील अपयशी ठरतात आणि म्हणूनच ह्यांची पारिवारिक आयुष्यं एकाकीच राह्य्लीत.

ह्या सर्वाला कारणीभूत होते ते त्यांचे अतिज्ञान! आणि म्हणूनच बहुतेक जगाचा निरोप घेतेवेळी मनाच्या एकाकी अवस्थेत ही मंडळी लिहून गेलीत "Be childlike!"

वाचकहो, "तमसो मा ज्योतिर्गमय" ज्ञानार्जनाकडे, तेजाकडे नेणाऱ्या ह्या प्रार्थनेच्या शोधात मला झालेल्या उपरतीमुळे मीच कोड्यात पडते की ज्ञानार्जनानंतर माणसातील बालसुलभ आश्चर्य का मरते? त्यांच्यातील लहान मूल का मरते? ह्या प्रवासात मी जो काही शोध घेतलाय त्याने आपणही कदाचित त्या दिशेने विचार कराल ह्या उमेदीत!












सौ. रुपाली मनीष पाठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा