समतोल कसा बरं साधावा?

“कल्याणी, आता श्वास घेणं थांबव हे”, असा जोरदार दम देणारा आवाज आला आणि क्षणभर दचकलेच. आपली ‘वेळ’ आली की काय श्वास थांबवायची! पटकन डोळे ऊघडले आणि मला उठवायचा प्रयत्न करत असलेली नात समोर दिसली. माझ्या झोपण्याच्या आणि घोरण्याच्या नाटकाचा फज्जा उडाला होता. घोरणे हा शब्द माहित नसल्याने श्वास थांबव म्हणत होती ती. “खोटं खोटं झोपलीस नं, सांग आता गोष्ट” एक गोष्ट सांगितली की ‘आता दुसरी’ हे नेहमी चालूच! ती मला नेहमी नावानेच हाक मारते कारण ‘कल्याणी’ नाव असतांना आजी का म्हणायचे हा तिचा सरळ प्रश्न असतो.

सकाळी उठल्यापासून तिने माझ्याभोवती असण्याची सवय झाली आहे मला. ‘कल्याणी तुझी कॉफी आधी संपते का माझ्या कपातलं दूध’ येथपासून सुरुवात…. ती जिंकावी म्हणून मी हळूहळू कॉफी प्यायची हे पण तिनेच सांगावे मला. शाळेतून घरी आली की दुपारचे खेळ सुरु. ‘कल्याणी तुझा पाय बरा झाला आहे नं मग रेस लाव माझ्याबरोबर’ मग आमची रनींग रेस सुरु होते… ह्या दारापासून त्या दारापर्यंत. मी तर तिचाच हात धरुन असते मग ती कशी पुढे जाणार! पण ती मला धरुन खेचत असल्यामुळे माझ्या पुढेच असते म्हणजे ह्या ठिकाणीपण जिंकणारी तीच.

काहीही खाण्याचा तिला नेहमी कंटाळा पण चिप्स किंवा पॉपकॉर्न असले म्हणजे प्रथम माझ्यातले खायचे आणि वर सांगायचे,“ तू म्हणतेस ना सगळे शेअर करुन  खायचे म्हणून” असे उलटे प्रयोग माझ्यावर असतात. शाळेतला डान्स करुन दाखव म्हटले की तिच्या शाळेतला पार्टनर मीच आणि तिच्या Instructions प्रमाणे आमचं ‘नच बलिये’ सुरु होतं.

त्या दिवशी तिला घेउन गेले मी दत्त मंदिरात. दत्तांच्या पादुकांना मी आधी नमस्कार केला तर म्हणे ‘अग् कल्याणी बाप्पाने आपल्या चपला बाहेर काढून ठेवल्या आहेत त्याला का नमस्कार करतात? बप्पा बघ तीन तोंडांनी इकडे तिकडे पाहातोय आणि हसतोय तुला’ एवढे अगाध ज्ञान मला असते तर! असो, आता सर्वच लिहायला लागले तर लेख संपणार कसा ? सांगायचे एवढेच की सध्यातरी मला घरामध्ये दिवसभर पुरणारी मुख्य करमणूक म्हणजे माझी नात ! बाकी मग TV, What's app, Facebook आणि भरीला इतर कार्यक्रम, शॉपिंग वगैरे… करमणुकीला एवढे खूप झाले माझ्यासाठी….

‘करमणूक’ विषयाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की जसे व्यक्ती  तितक्या प्रकृती. प्रत्येकाच्या कल्पना आणि विषय वेगळे. ड्रॉईंग, पेंटींग, रांगोळी संगीत, फोटोग्राफी, फुलांच्या सजावटी इत्यादी अनेक कलाप्रकार. त्याचबरोबर हल्ली करमणुकीचं मुख्य साधन म्हणजे मोबाईल. घरातल्या प्रत्येकाकडे मोबाईलवर what's app, Facebook असल्याने प्रत्येकजण त्यात तोंड खूपसून बसलेला असतो. टेक्नॉलॉजी आदि सोशल मिडीयाचा वाढता वापर हे सध्या सगळीकडे दिसणारे चित्र. मोबाईल फ़ोन आणि इंटरनेट यामुळे कामाच्या गोष्टी, फोटो इत्यादी शेअर करता येतात, घरबसल्या काम करता येतं, कोणालाही कुठेही व्हिडीओ कॉल करता येतो, जगात कोणत्याही कोपऱ्यात असलेले नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याशी गप्पा मारता येतात. आपले छंद जोपासता येतात… उदा. डिजीटल पियानो, ऑन लाईन मॅचेस, सिनेमा बघणे- सर्व कसं एका क्लिक वर. सर्वजण त्यातच गुंतलेले असतात, त्यांच्यासाठी हीच करमणूक झाली आहे.

टेक्नॉलॉजीचे जसे फायदे तसे तोटेपण आहेत. आपल्या कुटुंबीयांबरोबर अथवा मित्रमैत्रिणींबरोबर प्रत्यक्ष गप्पा, चेष्टामस्करी, एकमेकांना टाळ्या देत विनोद करणे, चर्चा करणे, एकत्र बसून खाणे, या आनंदाला लोक पारखे होऊ लागले आहेत. मोबाईलला स्वतःचा मित्र मानणं , किंवा आय पॅडशी बोलत बसणं, एकमेकांना नुसते मॅसेजेस फॉर वर्ड करणे ह्यात वेळ चांगला जातो, करमणूक वाटते पण ह्यात माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. एकलकोंडी बनत आहेत. पुर्वी लहान मुले संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी गच्चीत किंवा पटांगणात एकत्र जमून खेळत, अगदी हैदोस घालत. हल्ली मात्र मुलांना खेळण्यासाठी ‘प्ले डेट’ घावी लागते. सहजपणे शेजारीसुद्धा जाऊ शकत नाहीत. करमणूक म्हणजे घरात Tv, video बघणे. Computer games खेळणे नाहीतर घरात एकटे बसणे. कारण घरात खेळणी ढीगभर पण शेअर करायला, प्रत्यक्ष खेळायला मित्र मैत्रिणी नाहीत. माणसाने खूप प्रगती केली पण या डिजीटल जगामध्ये वेगवान जीवनशैली निर्माण झाली त्यामुळे समाज व्यक्तिकेंद्रीत होत चालला आहे. प्रत्येकाला स्वःताची स्पेस हवी आहे. तरीपण माणूस संवादाशिवाय राहू शकत नाही हे पण सत्य आहे. संवाद साधण्यासाठी किंवा करमणुकीसाठी काल्पनिक विश्व उभे करणे शक्य असले तरी टेक्नॉलॉजी आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा समतोल साधूनच आयुष्याचा आनंद जास्त प्रकारे घेता येईल.

-कल्याणी पाध्ये


1 टिप्पणी:

  1. छान लेख!
    नातवंडे ही आजीची करमणूक असते, आणि आजी म्हणजे नातवंडांचे खेळणे !

    उत्तर द्याहटवा