ती भारथी

मी नवीनच मुलाकडे काही दिवसांसाठी सिंगापूरला आले होते. संध्याकाळची वेळ होती. आमच्या बाल्कनीतून आमच्या कॉंडो मधील आखीव, रेखीत सुंदर बगीचा, क्लब हाऊस व जिमच्या टुमदार इमारती दिसत होत्या. मुलं बागडत होती. काहीजण घोळक्यांमधे गप्पा करत मश्गुल होते. काहींचा संध्याकाळी रोज फिरणाच्या नियम सुरु होता. हे आपल्या कामात गर्क होते. तर मी एकटीच घरी होते. दिवसभर घरी तरी मी काय करणार? मुलगा, सून आपआपल्या नोकऱ्यांना, नातवंडं शाळेत. मी वाचून तरी किती वाचणार? टीव्ही तरी किती पाहणार? काहीतरी वेगळं करायचं वय तर आता केव्हाच मागे पडलं होतं. स्वतःला, घराला, आता नटवायची हौस फिटली होती, सरली होती. हा एकटेपणा आता उरलेलं आयुष्य कुरतडतोय असं मला नेहमी वाटायचं. कंटाळून जात असे मी अगदी. संध्याकाळी माझा कंटाळलेला, उतरलेला चेहरा बघून मुलंही चूप, चूप रहात असत. 

'जाऊ का त्या गप्पा मारणाऱ्या ग्रुप मध्ये?' त्या दिवशी त्या ग्रुपमधे जाऊन किती बरं वाटलं होतं! 'हे विश्वचि माझे घर' ह्या उक्तिप्रमाणे निरनिराळ्या जाती, धर्माच्या बायका त्यात होत्या. कुणी मुलांकडे काही दिवसांसाठी आल्या होत्या, काहींचे नवरे गेल्याने हाच एक पर्याय होता. इकडच्या तिकडच्या गप्पा, नवीन ओळखी, आपल्या शहरांची माहिती यात छान वेळ गेला. आता तो 'माझा' ग्रुप झाला. संध्याकाळी मला प्रसन्न पाहून मुलंही खुश झाली. 

रोज जाता येता एक गोष्ट लक्षात आली. एका कोपऱ्यावरच्या टेबलवर एक जरा वयस्कर स्त्री (असेल ८५ च्या आसपास) बसलेली असे. नाकात उजव्या बाजूला हिऱ्याची मोठी चमकी, कानात हिऱ्याचे कुंडल, तिच्या काळ्या रंगावर अगदी उठून दिसत. गडद रंगाची सुती अथवा रेशमी साडी असे. जवळच तिची काठी उभी असे. चष्मा लावून, खाली मान करून ती नेहमी वाचनात गर्क असे. आजूबाजूला मुलांचा दंगा, खिदळणे, चकरा मारणारे, येणारे-जाणारे, तिला काहीच जाणवत नव्हते का? अधून मधून एक मेड (बाई) येऊन तिला काही विचारी. उत्तर मिळाले कि ती जवळच जरा बाजूला आपल्या मैत्रिणी बरोबर बोलत अथवा मोबाइलवर काही करत बसलेली दिसे. 

हे रोजचे दृश्य झाल्यावर मी माझ्या ग्रुप मध्ये चौकशी केली. कळले कि ती रोजच अशी बसते. कोण,कां? कुणालाच माहिती नव्हती. ती इच्छाही नव्हती. मी माझ्या कुटुंबाबरोबर १५ दिवसांची यात्रा करून परतले. त्या दृश्यात काही बदल नव्हता. मी भारतात परत गेले. ४ महिन्यांनी परत आले. ग्रुप मध्ये जोरदार स्वागत झाले. सहज त्या टेबलकडे पाहिले, 'अम्मा' तशीच खाली मान करून वाचत दिसली. हो, तिचं माझ्यापुरतं नाव मी 'अम्मा' ठेवलं होतं. मनाशी मी त्या क्षणी ठरवलं कि, आज तिच्याशी बोलायचेच. घरी परत जातांना मी तिला 'नमस्कार' म्हणाले. तिने मान वर करून पाहिले. त्या डोळ्यात अविश्वास होता. तिच्याशीच बोलते असं पाहिल्यावर ती खूप सुंदर हसून 'नमस्कार' म्हणाली. आपलं नाव 'भारथी' सांगितलं. ‘तमिळ साहित्य, कधी धार्मिक पुस्तकं वाचीत असते’ असं सांगितलं. 

मी अधून मधून तिच्याशी बोलायला बसू लागले. आधी ती ते सुंदर हसू द्यायची,मग बोलायची. आमच्या आता गप्पाही सुरू झाल्या. तिला मोडकं तोडकं इंग्रजी येत होते. तिचा नवरा विद्वान प्रोफेसर होता चेन्नईच्या कॉलेजला.तिचा छान बंगला होता चेन्नईला. मुलगा एकच होता. हुशार निघाला. तो, त्याची बायको, मुले इथे सेटल झाले होते. दोघेही मुलाकडे अधून मधून येत असत. नवरा गेल्यावर मात्र मुलगा आईला एकटे न ठेवता इथे घेऊन आला होता. तिच्या दिमतीला बाई ठेवली होती. काही कमी नव्हतं. मनात आले, बिच्चारी एकटी मात्र झाली. किती मोठा त्रास ग बाई तो! तिच्याशी बोलताना मला पाहिले कि, ग्रुपमधे माझी चेष्टा होत असे. मी अर्थातच लक्ष देत नव्हतेच. तिची व माझी तार जुळली होती. हळू हळू सूर लागत होता. नंतरच्या माझ्या वाऱ्यांमध्ये आम्ही नेहमी हसत, बोलत असे. पण एकदा ती २-३ दिवस दिसली नाही. टेबल रिकामेच दिसे. तिची बाई पण दिसेना. मनाला चुटपुट वाटत होती. पण कुणाला विचारणार? दुसऱ्या दिवशी तिच्या बाईची मैत्रीण दिसली. तिच्याकडून कळले कि भारथी आजारी होती. हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. त्याच दिवशी ती घरी परतली होती. दुसऱ्या दिवशी तिला भेटायचे ठरवून खाली उतरले. तर ती टेबलपाशी बसलेली! थोडी मलूल, शाल पांघरलेली. मला पाहिल्यावर तेच सुंदर हसू. तिचा थकलेला चेहरा देखील त्या हास्याने थोडा उजळून गेला. तिला कसे बरे वाटत नव्हते, ताबडतोब कसे हॉस्पिटलमध्ये हलवले, मुलगा-सुनेने किती सेवा केली..सर्व सांगितले. 'आता रोज खाली ये. बसत जा इथे. लवकर बरी होशील' असा मीही दिलासा दिला. 

नंतरच्या एक दोन फेऱ्यांमध्ये मी तिला विचारलच कि, 'कुणात मिसळत का नाही ? अशी एकटी का बसतेस ?' तिचे उत्तर ऐकून मी चाटच पडले. म्हणाली, 'अगं एकटी कुठे आहे मी? माझं लग्न, मी सतराची होते तेव्हांच झाले. नवरा, घर ह्यात खूप वर्षे रममाण राहिले. त्याच्या विद्वत्तेने मोहून गेले अगदी. मी ही मग शिकायचे ठरवले. एम.ए. केले. मला तमिळ साहित्याची खूप आवड आहे. मी खूप वाचते.' हे खरे होते. तमिळ भाषा देखील खूप समृद्ध भाषा. साहित्याच्या सर्व प्रकारानी नटलेली ही गर्भश्रीमंत भाषा आहे. पुढे तिने सांगितले, ‘नवऱ्याबरोबरच्या इतक्या वर्षांच्या आठवणी आहेत, साहित्य आहे, गाण्या-नाटकांच्या CDs मुलांनी आणून दिल्या आहेत. माझा मुलगा-सून चांगले आहेत. माझ्या वर प्रेम करतात, माझी काळजी करतात. आणिक काय हवं गं एका बाईला?’ आणि मी विचार करायची, बिचारी अम्मा एकटी म्हणून! खरंच! आहे त्या परिस्तिथीत सकारात्मक विचार ठेवणारी, करणारी, कशाचीही खंत न बाळगणारी अम्मा! नकळत मलाही एक शिकवण देऊन गेली होती. सकारात्मक राहण्याची, आपल्या जवळ जे चांगले आहे त्याची किंमत करण्याची, जे नाही त्याची खंत न बाळगण्याची. 

सगळ्यांमध्ये राहूनही मी माझ्या एकटेपणाची खंत करीत होते. आता मात्र मीही मला बदलण्याचे ठरवले. आनंदी राहू लागले. माझ्या आवडी जोपासू लागले. घरातही प्रसन्न राहू लागले. मुलांनाही हा बदल जाणवला. तेही सुखावले. अंतर ठेवून राहणारे आम्ही जवळ येत चाललो. ही त्या अम्माचीच कृपा नाही का? 

तिच्याशी माझी आणखी एक तार जुळली. माझ्या पुढच्या वारीत ती मला दिसली नाही. २/३ दिवस वाट पहिली. वाटलं थोडी आजारी तर नाही? येईल. तिची ती बाई पण दिसत नव्हती. मग मी त्या बाईच्या मैत्रिणीला शोधू लागले. ती सुद्धा दिसेना. आमच्या ग्रूपमधे विचारण्यात तर काहीच अर्थ नव्हता. काय करू? कुणाला विचारू? कसे कळेल? मनाची घालमेल काही कमी होत नव्हती. दुसऱ्या एक दोन मेडना (बायकांना) विचारले. त्यांना काहीच माहिती नव्हते. ना मला तिच्या मुलाचे नाव माहिती ना घर! तिचा विचार काही डोक्यातून जाईना. त्या दिवशी मी संध्याकाळी फिरायला बाहेर पडले आणि समोरून एक स्त्री येताना दिसली. नाकात उजव्या बाजूला हिऱ्याची चमकी घातलेली. मी भराभर तिच्याजवळ चालत गेले. एका दमात तिला विचारले, भारथी बद्दल. 

ती सांगू लागली. ‘वो भारथी अम्मा क्या? बिचारा बहुत बिमार था। पर लडका-बहू खूब सेवा किया। अब्बी १५ दिन हुआ अम्मा गया।’ तिचे शेवटचे वाक्य ऐकून माझ्या मनात चर्र झाले. अम्मा गेली? ते निर्मळ हसू आता कधीच दिसणार नाही? माझे डोळे भरून आले. झर झर अश्रू वाहू लागले. ‘तुमारा कोई था क्या वो? कोन था?' खरंच कोण होती माझी ती? तशी तर कुणीच नाही. अधून मधून थोड्या वेळाकरता भेटणाऱ्या आम्ही. दुसऱ्यांकरता, जगाकरता आम्ही एकमेकांच्या कुणीच नव्हतो. पण मग मनाचे काय? आमच्या मनाच्या तारा कधीच जुळल्या होत्या. आम्ही एकमेकींच्या कधीच झालो होतो. 'वो कोन था तुम्हारा?’ पुन्हा समोरून प्रश्न आला. माझ्या डोळ्यात अश्रू होते. भरल्या गळ्याने मी उत्तर दिले. 'आपको क्या, किसी को भी समझ नही आयेगा। वो मेरी थी. अपनी थी. तिचे हसू फक्त माझे होते.' आणि...आणि पुढे मला बोलताच आले नाही. मी स्फुंदून रडू लागले. माझे डोळे भरभरून वाहत राहिले. 

काय नातं असणं जरूरी आहे?


- श्रीमती श्रेया वेरूळकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा