निसर्गासोबत माझी मैत्री

मैत्री ही माणसांशीच शक्य आहे हे मी नक्कीच मानत नाही. कुठल्या एकाच अशा व्याख्येत न बसणारं, शब्दांच्या पलीकडे, आखीव नात्यांच्या सीमारेषा जिथे पुसट होत जातात, तिथे सुरु होणारं मैत्रीचं हे नातं, प्रत्येकासाठी वेगळे संदर्भ घेऊन येणारं असतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात, मैत्रीच्या स्वरूपात बदल होतातच, तसे ते माझ्यातही झालेत. ह्या विषयावर बरेचजण त्यांचे रोचक असे अनुभव लिहितीलच पण मी मात्र माझी झाडांशी असणारी मैत्री, त्यांच्या बद्दल वाटणारी ओढ, ह्या विषयी लिहिणार आहे. 

तुम्हा सर्वांना आपल्या घरासमोर बाग असावी असे वाटत असेलच. मी ही याला अपवाद नाही. तसेच तुम्हाला हे जुने मराठी भावगीतही आठवत असेल, 'असावे घरटे आपुले छान, पुढे असावा बाग बगीचा, वेल मंडपी जाई-जुईचा,आम्र तरुवर मधू माशांचा, फुलावा मोहर पानोपान'. तर मंडळी, आता बागकामा करिता लागणारा मुबलक वेळ किंवा जमिनी अभावी, आपली बागेची हौस आपण घरातील बाल्कनीतच फुलझाडे कुंड्यांमध्ये लावून भागवतॊ. मी हि तेच करतीये. 

समुद्राने वेढलेल्या तसेच Equator वर असलेल्या ह्या Island country त इच्छा असूनही, रातराणी, मोगरा, शेवंती, निशिगंध यासारखी फुले कुंडीत लावायचे माझे स्वप्न शक्य होणे अशक्य आहे हे लवकरच उमगले. अर्थातच येथील tropical हवामान, फक्त येथील फुलां करताच योग्य आहे हे येथे बरीच वर्षे राहून, बरेच प्रयोग करून झाल्यावर समजले. सिंगापूर ह्या देशात अवती भोवती पसरलेल्या अफाट समुद्रामुळे झाडे, फुले, भाज्या लावायला जमिनीची कमतरते आहे. त्यामुळे अनेक इमारतींच्या गच्ची वर "हँगिंग गार्डन" सारखी युक्ती वापरून भाज्या, फळं, फुलं पेरून, यांचे नियमित उत्पादन करून हा देश जगा समोर एक उदाहरण मांडत आहे. 

लहानपणी घरातील कुंड्यांत फुललेली फुले देवाला वाहताना अनुभवलेला आनंद मला आजही आठवतो. तसेच कुंड्यात पेरलेली कोथिंबीर, मिरची, कढीलिंब, पुदीना फोडणीत घालताना मी माझ्या मम्मीला नेहमीच पाहिले आहे. खरच, 'स्व निर्मिती' चा आनंदच निराळा! आज सिंगापूरच्या ह्या समुद्री वातावरणात टिकतील अशीच काही झाडे मी कुंड्यांमध्ये लावली आहेत. Orchid फूलाचे रोपटे ही लावले आहे, हे सिंगापूरचे राष्ट्रीय फूल आहे. पहिलं फूल उमलताना पाहिलेल्या क्षणाचे मी वर्णन तरी कसे करू ? ते पहिले वहिले फूल देवाला वाहताना झालेल्या माझ्या आनंदाला खरच शब्दात मांडणे कठीणच वाटते. खरंतर ह्या असल्या कोमल भावना फक्त स्वतःच अनुभवाव्या लागतात :) 



तर बाल्कनीत फुलवलेल्या ह्या झाडांना सोडून मी जेव्हा भारतात जाते तेव्हा एकीकडे आई वडीलांच्या ओढीने मन आसुसते, तसेच मागे राहिलेल्या घरातील झाडांच्या विरहाने कोमेजते. मी भारतात गेल्यावर त्यांना पाणी कोण देणार ह्या समस्येने मन बेचैन होते. पूर्वी बाहेर-गावी जाताना, शेजारपाजाऱ्यांना झाडांना पाणी द्यायचा प्रेमळ आग्रह करणं शक्य होतं पण आता जुजबी ओळख असलेले माझे चीनी शेजारी, ह्यांना हे काम कसे सांगणार? 

कित्येकांना झाडे जरी निर्जीव वाटत असली, मुकी वाटत असली तरी मला मात्र फारच बोलकी वाटतात माझी झाडे. सुट्टीच्या दिवशी माझ्या कित्येक संध्याकाळी, ह्या झाडां जवळच्या लाकडी खुर्चीत जातात. बऱ्याचदा झाडे मला काही लिहिण्यास देखील प्रवृत्त करतात. नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुवास, त्यांचा टवटवीत पणा, हिरवेगार पणा मला खुलवतो तसेच त्याचे कोमजणे मला खिन्न करते. गळलेली पिकलेली पिवळी पाने कात्रीने कापताना एक विचित्र हुरहुर मनास जाणवते. पिकलेली पाने कधीतरी हिरवी असतीलच ना! आपण सर्वही कालांतराने त्या पानां प्रमाणे वाळणार आहोत ही जाणीव, जीवनातील फोलपणा, उथळपणा ह्यावर खोल विचार करण्यास भाग पाड़ते. 

जशी मैत्रीची सुरुवात होऊन ती 'ओळख' दाट झाल्या खेरीज मैत्री फुलत नाही, तसाच झाडांशी संवाद साधायला, त्यांच्या सोबत "मैत्री" बहरायला, त्यांची निगा राखणे व त्यांच्या संगोपनात रमणे गरजेचे आहे. आजच्या प्रतिस्पर्धेच्या युगात, निखळ मैत्री सोडा पण अगदी रक्ताचे नाते देखील निस्पृह, अपेक्षेविना टिकवणे शक्य होते काय? म्हणूनच मला वाटते की निसर्गाशी असलेली माझी ही मैत्री कुठल्याही अपेक्षेपलीकडची आहे, जमले तर ह्यावर नक्की विचार करा ! 

- सौ. रुपाली मनीष पाठक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा