विकतचं दुखणं

हल्ली फिटनेस चा सगळीकडे बोलबाला आहे . सिंगापूर मध्ये हे काही नवीन नाही. मला आठवतंय १५ वर्षांपूर्वी आम्ही सिंगापूर मध्ये नवीन नवीन आलो होतो तेव्हा दुपारच्या १२ च्या उन्हात जेवायला जाताना किंवा रात्री शतपावली करण्यासाठी निघाले असताना रस्त्यावर लोकांना जॉगिंग करताना बघून आश्चर्य वाटायचं . कारण आमच्या डोक्यात जॉगिंग किंवा व्यायाम करायची वेळ ही सकाळी लवकरचीच असते हे फिट्ट बसलेलं होतं .

तर फिटनेस रोजनिशी - आठवड्यातून दोन दिवस सकाळी ५.३० ते ६.३० धावायला जाणे (पाऊस पडला तर gym मध्ये जाणे) , दोन दिवस योगा आणि दोन दिवस gym मध्ये strength training साठी जाणे . काय झकास आहे ना fitness regime ? पण हे माझं नाही बरं का :) असं intensive routine बनवून ते नित्यनेमाने पाळणाऱ्या लोकांबद्दल मला अतिशय अप्रूप वाटतं, ऊर अभिमानाने भरून येतं. पण मला स्वतःला असं काही झेपत नाही. स्वतःचं स्वतः लवकर उठून धावायला किंवा gym मध्ये व्यायाम करायला जाण्यासाठी जी शिस्त आणि प्रेरणा लागते ती मुळातच माझ्यात नाहीये ! हे करणाऱ्या लोकांना मी नमस्कार पण लांबूनच करते ! कारण कसं आहे ना मला लागतो class ...अहो class म्हणजे दर्जा ह्या अर्थाने नव्हे तर खिशातले पैसे खर्च करून कुठल्या तरी वर्गात नाव नोंदवून घेणं - थोडक्यात विकतचं दुखणं .

बरं आजूबाजूला पाहावं तर जॉगिंग करायला किंवा gym मध्ये जे लोक अतिशय regularly जातात ना , त्यांना खरं त्याची गरजच नसते ...ते already च फिट असतात. आता regularly exercise करतात म्हणून ते फिट असतात की ते फिट असतात म्हणून exercise करायला उत्सुक असतात ह्याच्यावर सांगोपांग चर्चा होऊ शकते . असो ...

तर मूळ मुद्दा असा की स्वतःच्या शरीराला कष्ट देण्यास मी काही सहाजीसहजी तयार होत नाही :) पण एकदा फिट राहण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी हे ठरवलंच. आता कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही दणक्यात झाली पाहिजे . मग काय, अनेक classes मध्ये नाव नोंदवलं . आता class मध्ये येणाऱ्या लोकांची पण गम्मत असते. म्हणजे शाळेत कसं सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारे विद्यार्थी कायम पुढे बसतात आणि शिक्षकाचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच हात वर. तसेच exercise class मध्ये पण हुशार विद्यार्थी instructor ला दाखवून दाखवून व्यायाम करत असतात तर काही पार कोपऱ्यात instructor ची नजर देखील जिथे पोचणार नाही असे दडून exercise किंवा तत्सम काहीतरी करण्याचा प्रयास करतात. वर्ग सुरु होतो तेव्हा सगळेच जोशात असतात , प्रत्येक beat ला "हे , हा, हो" असे स्फूर्तीदायक आवाज वगैरे काढतात. पण जसा वर्ग अर्ध्यावर येतो तसे हे सगळे आवाज नाहीसे होतात. मग आवाज येत असतो तो फक्त instructor चा आणि विद्यार्थी मात्र हळूच घड्याळाकडे नजर टाकत असतात... होत आला की नाही एक तास, कधी बरं stretching / cooling down चं routine सुरु होणार? असे अनेक प्रश्न ती नजर घड्याळाच्या काट्याला विचारत असते. पण घड्याळाचा काटा मात्र "घेतलंत ना विकतचं दुखणं, आता निस्तरा तुम्हीच" अशा आविर्भावात तटस्थपणे फिरत रहातो.

हुश्श्श ... बराच काळ लोटल्यानंतर तो एक तास संपतो कधी तरी. चला सुटलो रे देवा ह्या आनंदात सगळे घरी जातात. आणि खरी कसोटी सुरु होते ती पुढच्या वर्गाला यायच्या आधी. आपल्या शरीराला किती यातना होणार आहेत ह्याचा अंदाज आता पूर्णपणे आलेला असतो. तरी सुद्धा पुढच्या वर्गाला पाचपैकी एकतरी व्यक्ती जातेच. कारण मनात असते एक जिद्द - स्वतःला फिट ठेवण्याची जिद्द. आता या पाचपैकी एका व्यक्तीमध्ये माझा समावेश होतो की नाही ते जाऊ द्या. पण त्या एका व्यक्तीच्या जिद्दीला आणि निश्चयाला माझा सलाम आहे हे नक्की !!

                                                                                                                          - अस्मिता तडवळकर





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा