तेजाकडे वाटचाल

असतो मा सद् गमय
तमसो मा ज्योतिर् गमय
मृत्योर् मा अमृतं गमय

मला असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून तेजाकडे आणि विनाशाकडून अविनाशाकडे ने, अशी ही प्रार्थना. आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेली. अंधाराकडून तेजाकडे म्हणताच मला आमच्या कमलाबाईंची गोष्ट आठवली. त्यांची गोष्ट ऐकताना कधी माझ्या डोळ्यातलं पाणी मी हातात धरलेल्या चहाच्या कपात पडायला लागलं, मलाच कळलं नाही.

खूप वर्षं आमच्याकडे काम करणाऱ्या कमलाबाई. अतिशय इमानदारीनी चार घरी धुणीभांडी, केर, स्वयपाक करून आपलं व आपल्या दोन तरुण मुलींचं पोट भरणाऱ्या. मुली अगदी लहान असतानाच नवरा सोडून गेलेला. त्यांनी मात्र जिद्दीनी काबाडकष्ट करून मुलींना मोठं केलं, शाळेत घातलं. मुली त्यांच्याबरोबर काम करून अभ्यासही करत होत्या. एक कॉलेजला तर एक शाळेत जात होती.

पण मुलींचं बाबांची वाट पाहणं व कमलाबाईंचं नवऱ्याची वाट पाहणं काही थांबत नव्हतं. बघता बघता १५ वर्षे उलटून गेली होती. तो त्यांना का सोडून गेला होता, हेही त्यांना उमगलं नव्हतं. मला मुलगा झाला नाही, म्हणून त्यांना माझा राग आला असेल का? त्यांनी दुसरं लग्न केलं असेल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या व मुलींच्या मनात होते. जेव्हाही त्या ह्या विषयी बोलत तेव्हा तेव्हा माझ्या पोटात कालवा कालव होत असे. पण आज मात्र त्या जे म्हणाल्या ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्या म्हणाल्या, "वहिनी मी गेली १५ वर्षं दर दिवाळीत नवऱ्याकरता नवा ड्रेस आणून देवापुढे ठेवते व देवाला प्रार्थना करते की ह्यांना आमच्या जवळ परत आण. ते काही येत नाहीत. मग तो ड्रेस उचलून मी कपाटात ठेवून देते. मला मुलींना आणखीन शिकवायचं आहे. त्यांची लग्न करायची आहेत. मुलींना पण त्यांच्या बाबांची खूप आठवण येते. आणि माझा व मुलींचा पक्का विश्वास आहे की ते एक दिवस नक्की परत येतील." हे ऐकून मी पण गणपती बाप्पांना नमस्कार करून सांगितलं की त्यांची इच्छा पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनातला अंधार दूर कर.

भारतात किंवा जगात अशा अनेक कमलाबाई आहेत ज्या एकटीच्या जीवावर पूर्ण संसार निभावून नेतात. त्यांच्या अंध:कारमय जीवनाला तेजाकडेने हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

असत्याकडून सत्याकडे म्हणल्यावर मला आमच्या एका मित्राची लहानपणची मजेदार आठवण सांगावीशी वाटते. तो १४-१५ वर्षांचा होता तेव्हाचा हा किस्सा. घरी मित्रांचा ग्रुप जमला होता व मजा चालू होती. एवढ्यात त्याचे आई-बाबा कुठल्या तरी नातेवाईकांकडे निघाले. ते दिवसभराकरता जाणार होते. आता भरपूर मोकळीक मिळणार म्हणून सगळी मुलं आणखीनच खुश झाली. थोड्या वेळानंतर एक मित्र म्हणाला, "कार घेऊन लोणावळ्याला फिरून येऊ ना! नाहीतरी आता काका-काकू रात्रीपर्यंत येणार नाहीयेत."

आमच्या मित्राला कार जेमतेमच चालवता येत होती. पण मित्र खूप मागे लागले व सगळे लोणावळ्याला फिरायला गेले. भटकण्यात दिवस कुठे संपला त्यांना कळलेच नाही आणि रात्र व्हायला लागली. आमचा मित्र आपल्या मित्रांना म्हणाला, "उगीचंच मी तुमचं ऐकलं. आता माझं काही खरं नाही." मग त्यांना पुण्याला घरी यायची खूप घाई झाली. त्या काळात मोबाईल नसल्याने घरी कळवण्याची काहीच सोय नव्हती. तोपर्यंत काका काकू घरी पोचले होते. घरातून कार गायब व मुले पण गायब हे पाहून दोघं काळजीत पडले व थोड्या वेळानी काकांचा पारा चढू लागला. आमचा मित्र आपल्या ग्रुपबरोबर घाबरत घाबरत घरी पोचला. कार कशीबशी पार्क करून समोर पाहिले तर वडील दारातच उभे होते. त्यांचा रुद्रावतार पाहून त्याची तर बोबडीच वळली व काय करावे काही सुचेना. कसेबसे सगळे घरात गेले. मग त्याने सरळ बाबांच्या पायावर लोटांगण घातले व म्हणाला, "बाबा, मी चुकलो."

हा सगळा प्रकार इतका अनपेक्षित होता की काकाकाकूनांही कसे react करावे कळेना व सगळे जोरजोरात हसायला लागले. हे बघून सगळ्या मित्रांच्या पण जीवात जीव आला. त्या गोष्टीला इतकी वर्षं उलटून गेली पण अजून त्याची ही असत्याकडून सत्याकडची वाटचाल आठवून आम्ही खूप हसतो.

जेव्हा विनाशाकडून अविनाशाकडे हा विचार डोक्यात येतो तेव्हा सध्या जगभर चर्चेत असलेला मायग्रेशनचा विषय समोर येतो. आपण दिवसभर वेगवेगळ्या news channels वर मोठ्या प्रमाणावर होत असलेलं मायग्रेशन पाहतो. सिरियासारख्या देशांमधून लोकं सतत आपल्या कुटुंबासह युरोपच्या देशांकडे मायग्रेट होत आहेत. ग्रीस, इटली, जर्मनी इथे रोज लोकांचे लोंढेच्या लोंढे पोचत आहेत. काही लोकांचा ह्या immigrants ना जबरदस्त विरोध आहे. तर काही जण त्यांचं स्वागत करतायत. जर्मनीमध्ये कितीतरी लोकांनी chocolates देऊन त्यांचे स्वागत केले. काहींनी त्यांना आपल्या घरात राहण्याची सोय पण करून दिली. युरोपमध्ये देश खूप लहान आहेत व लोकसंख्या पण खूप कमी आहे.

गेल्या दहा वर्षात अमेरिकेत बाहेरून येऊन काम करणाऱ्यांच्या संख्येमध्ये ४७% वाढ झाली आहे आणि युरोपमधे तर बाहेरून येऊन काम करणाऱ्यांचे प्रमाण ७०% नी वाढले आहे. बऱ्याच विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या घटते आहे. म्हणजे ज्याला नैसर्गिक वाढ म्हणतात ती कमी होऊन वयस्क लोकांचं प्रमाण वाढतं आहे. तरुण कामगार वर्ग कमी होतोय. बाहेरच्या देशांमधून येणारी लोकं हा त्यावर उपाय होऊ शकतो. अर्थात त्यात बऱ्याच अडचणीही आहेत. कारण बाहेरच्या देशातून येणारी लोकं आपल्या कुटुंबाबरोबर आपला धर्म, चालीरीती व संस्कृती पण घेऊन येतात. ज्या देशात ते जाऊन राहतात, तिथल्या लोकांना त्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी आवडत नाहीत. त्यातून जगभर जातिभेद, इतर भेदभाव निर्माण होतात. ज्या देशात immigrants जातात, तिथल्या नेत्यांकरता पण एक आव्हान असतं कारण स्वतःच्या लोकांचं हित जपणं हे त्याचं पहिलं कर्तव्य असतं व ते तर्कशुद्धही आहे.

जोपर्यंत युद्धं चालतील, माणसात मतभेद राहतील, तोपर्यंत माणसाची विनाशाकडून अविनाशाकडे, अंधाराकडून तेजाकडे व असत्याकडून सत्याकडे वाटचाल ही चालूच राहील.













मेघना असेरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा