पट्टीचं नातं

एकदा पुणे मुक्कामी बाबा म्हणाले "अगं तुला आपल्या घरा जवळची मोहन आईस्क्रीम वाल्याची गाडी आठवते का? त्याच्या मुलानी आता डेक्कनला आईस्क्रीम चे दुकान काढलेय. कधी जाता येता जाऊन ये आईस्क्रीम खायला", मी हो म्हणले. लहानपणी घराजवळ मोहन आईस्क्रीम वाल्याची गाडी होती. एरवी बाहेरचे गाडी वरचे कुठले पदार्थ खायला सक्त मनाई करणारे बाबा या गाडी वाल्याचे आईस्क्रीम कसे खाऊ देतात, असा प्रश्ण नेहमी पडायचा. एक लोखंडी उघडी गाडी. त्यात आईस्क्रीमचे दोन पॉट. त्यात फक्त एकाच फ्लेवरचे आईस्क्रीम. शेजारी स्टूलवर बसलेला मळकट कपड्यातला मोहन. त्या पॉट मधला अतिशय सुंदर मलाई आईस्क्रीमचा गोळा तो पत्रावळीच्या तुकड्यावर द्यायचा आणि ते खायला खास लाकडी चमचा. असे ते आईस्क्रीम तिथे गाडीपाशी उभे राहून खाणे म्हणजे पर्वणीच असायची. ते आईस्क्रीम देताना पॉटचे झाकण काढून तो गोळा पानावर टाकून देताना आणि पुन्हा झाकण ठेवताना त्याच्या होणाऱ्या लयबद्ध हालचाली मी हळूच टिपायचे. घरी जाताना फक्त पत्रावळीचा तुकडा कचऱ्याच्या बादलीत टाकून तो चमचा कधी कधी घरी खेळायला सुद्धा आणायचे. मला तेव्हा वाटायचे की या मोहन ची मुले किती नशीबवान आहेत, त्यांना रोज मलाई आईस्क्रीम खायला मिळत असेल. 

लहानपणीचा माझा आवडता खाऊ मुलांना द्यावा या हेतूने मी मुलांना घेऊन डेक्कन वरच्या त्या दुकानात गेले. आता मोहन आईस्क्रीमवाले दुकान चकचकीत होते. पुण्याच्या इतर कुठल्याही आईस्क्रीम पार्लर सारखे. भिंतीवर आईस्क्रीम संडे ट्रिपल scoop वगैरे फोटो होते. बसायला स्वच्छ टेबल खुर्च्या होत्या. मग बसल्यावर मेनू कार्ड हातात पडले. ऑर्डर केल्यावर काचेच्या बाऊल मध्ये आईस्क्रीम आले. ते खायला स्टीलचा चमचा. माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. पण मुले खुश होती. अधून मधून कॅश काउंटर वरचा माणूस माझ्याकडे बघतोय अशी शंका मला आली. पण पुण्यात असे प्रकार नवीन नसल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. मी बिल मागवले तेव्हा काऊंटर वरचा तो माणूस आमच्या टेबल जवळ येऊन म्हणाला, "ताई तुम्ही वैद्य सरांची मुलगी का?" मी आश्चर्याने "हो" म्हटलं आणि मग तो म्हणाला, "ताई मी तुमच्याकडून पैसे नाही घेणार". मी काही त्याला ओळखले नव्हते. त्यामुळे मी नाही-नाही वगैरे म्हणायला सुरुवात केली. तो म्हणाला, "ताई तुम्ही मला ओळखले नाही, मी चंदू". कोण चंदू हे मी आठवायचा प्रयत्न करत होते तेवढ्यात त्याने पुढे बोलायला सुरुवात केली, "मी मोहन आईस्क्रीम वाल्याचा मुलगा". अच्छा म्हणजे लहानपणी मला ज्याचा हेवा वाटायचं तोच हा, असा विचार मनात आला. "मी वैद्य सरांकडे शिकवणीला यायचो आणि तेव्हा तुम्ही मला एकदा पट्टीने मारले होते." खरेतर एवढ्या मोठ्या माणसाने माझ्या मुलांसमोर तुम्ही मला पट्टीने मारले होते हे सांगितल्याने मला जरा ओशाळल्यासारखे वाटले. तो पुढे सांगत होता, "ताई त्या दिवशी तुम्ही मला पट्टीने मारले आणि माझ्या वर्गातल्या मुलांनी मला चिडवायला सुरुवात केली, चंद्याला मास्तरांच्या पोरीनी बडवला म्हणून. तेव्हा मला फार राग यायचा तुमचा. मग मी ठरवले चांगला अभ्यास करायचा. त्यानंतर दहावी पर्यंत कधी नापास नाही झालो मी. त्यानंतर पण शिकायचे होते पण बाबांना वयामुळे रोज पॉट फिरवून आईस्क्रीम करणे जमेना म्हणून मी त्यांना मदत करायला लागलो आणि शिक्षण थांबले. पण आईस्क्रीमचा धंदा चांगला चालू लागला. पाच वर्षांपूर्वी हे दुकान काढले मी. अजूनही गाडी आहे पण ती चालवायला माणसे ठेवली आहेत. दुकान मी बघतो. तुम्ही परत कधी भेटाल असे वाटले नव्हते. आज अचानक भेट झाली आणि फार बरे वाटले".

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. माझे बाबा गरीब विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्यायचे. एखादे वेळी ते चहा पिऊन पोचे पर्यंत त्यांना उशीर झाला तर माझ्यातली शिक्षिका जागी व्हायची आणि मी थोडा वेळ त्या सहावीच्या मुलांना शिकवायला जायची. त्यातला हा चंदू. तो मोहन आईस्क्रीम वाल्याचा मुलगा आहे हे मला तेव्हा माहित नव्हते. तर एकदा एक अतिशय सोपे भागाकाराचे गणित चुकल्यावर मी त्याच्या हातावर पट्टी मारली होती आणि त्याने पण निमूटपणे मार खाल्ला होता. नंतर बाबा थोडे रागावले सुद्धा होते, "अग ही मुले तुझ्या एवढीच आहेत. त्यांच्या घरी अभ्यासाचे वातावरण नाही. त्यांना घरी शिकवायला कोणी नाही म्हणून ती इथे येतात. आता इथे पण येऊन त्यांना मार मिळत असेल तर ती कशाला येतील". त्यानंतर मी फारशी शिकवणीच्या वर्गात गेले नाही. हे सारे चित्र माझ्या डोळ्यासमोरून झर्र्कन सरकून गेले. 

मी देऊ केलेले पैसे घ्यायला त्याने पुन्हा नकार दिला. दुकानातून बाहेर पडताना ओशाळलेले, समाधानी असे काहीसे मिश्र भाव माझ्या चेहऱ्यावर होते. इकडे मुलगी माझा हात ओढून, "आई तू त्या काकांना मारले तरी त्या काकांनी आपल्याला आईस्क्रीम फ्री का दिले?", असा प्रश्ण विचारत होती. तिला काय उत्तर द्यावे कळत नव्हते. तिला फक्त एवढेच सांगितले, "इंडिया मध्ये अशीच भारी असतात लोकं". सांगणार तरी काय? कारण मी तो प्रसंग विसरून गेले होते आणि मला सुतराम कल्पना नव्हती की अजाणत्या वयातल्या माझ्या एका पट्टीमुळे कोणाचे आयुष्य इतके बदलले असू शकेल.

- विनया रायदुर्ग



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा