नातं - माणसाचं माणसाशी कि माणसाचं टेकनॉलॉजीशी ?

नुकताच “ती सध्या काय करते?” सिनेमा बघितला, आणि खूप एन्जॉय पण केला. सध्या शाळा, कॉलेज च्या reunions ची लाटच आली आहे. जो तो whatsapp व facebook वरून लहानपणच्या मित्र, मैत्रिणींना शोधून groups बनवतोय. देशोदेशीच्या नातेवाईकांचे ग्रुप्स बनत आहेत, आणि सोशल मिडिया मुळे एकूण धमाल चालू आहे. माझा सुद्धा 'गरवारे शाळा पुणे' असा whatsapp group आहे. 

मी १९७५ साली ११ वी पास झाले, ती ११ वीची शेवटची batch होती. त्यानंतर १० + २ आले. नवीन group सुरु झाल्यावर खूपच excitement होती. मित्र, मैत्रिणी मिळून आम्ही ५० जण. अर्थात त्यातल्या काही close friends च्या मी आधीही संपर्कात होते पण काही तर आठवतही नव्हते. मग फोटो वरून एकमेकांना ओळखणे, फोन इत्यादी चालू झाले. खरच, बालपणीच्या मित्र, मैत्रिणींना भेटण्याची, त्यांच्याशी गप्पा मारायची मजाच वेगळी असते. आणि अर्थातच हे सोशल मिडिया मुळेच शक्य झाले. आत्ता recently मला माझी एक बालमैत्रीण फेसबुक वर भेटली आणि ३६ वर्षांनी आम्ही सिडनी मध्ये भेटलो. दोघींना खूप आनंद झाला.

मोबाईल फोन, इंटरनेट ह्या सगळ्यामुळे आयुष्य केवढं सोपं झालय. मुख्य म्हणजे communication खूप सोपं झालंय. देशोदेशीच्या नातेवाईकांचे ग्रुप्स बनल्यानी कुणाचं काय चाललंय, हे कळत रहातं. कमी वेळात कामं पटापट होतात, लग्नाची, बाकी कार्यक्रमाची बोलावणी whats app वर सहज करता येतात. फोटो शेअर करता येतात. आता परदेशी राहणाऱ्या आपल्या मुला, नातवडांना रोज पाहणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हे रुटीन झालंय. त्यामुळे अंतर जाणवत नाही. मात्र सध्याच्या काळात तुमची रोज नवीन काहीतरी शिकायची तयारी हवी. तेव्हाच तुम्ही ह्या technology ला पूर्णपणे एन्जॉय करू शकता. on line shopping करणे, प्रवासाची तिकिटे काढणे, taxi मागवणे, वेगवेगळी बिले भरणे, Net Banking हे सर्व शिकताना सुरवातीला थोडा वेळ लागतो पण एकदा का ह्याचा सराव झाला कि, खूप सोयीचं वाटतं. नोटबंदीमुळे तसाही कॅशलेस चा जमाना आहे, तेव्हा हे सगळं जितक्या लवकर शिकू, तितकं आपल्या फायद्याचं आहे, असं वाटतं. तसही प्रवाहाबरोबर वाहण्यात मजा असते. 

हे सगळं लिहिता-लिहिता माझं मन भूतकाळात गेलं. बिना computer, मोबाईलचं आयुष्य सुद्धा कित्ती साधं, सुंदर होतं असं वाटलं. तेव्हा TV व बाकी फारशी साधने नसल्यानी, आम्ही भावंडे, मित्र, मैत्रिणींबरोबर संध्याकाळी मोकळ्या हवेत खूप खेळत असायचो. झाडावर चढणे, पळापळी, दोरीवरच्या उड्या, लंगडी, पोहायला जाणे असा शारीरिक व्यायाम भरपूर व्हायचा. अर्थातच सपाटून भूक लागायची व घरी बनलेलं साधं, सकस जेवण मस्त लागायचं. रात्री सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारणे, सुट्टी असली तर गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणे वगैरे चालत असे. म्हणूनच आता शाळा, कॉलेज मधली मुलं ह्या वयात dieting करतात व IPad, laptop वर गेम्स खेळतात हे पाहून मन विषण्ण होतं. लहानपणा पासून बंद खोलीत एकटे बसण्याची सवय चांगली नाही. हल्ली मुलांना communication चा प्रॉब्लेम येतो. कारण बहुतेक घरांमध्ये आई, वडील आणि एक मूल असल्यानी एकदम कोणी नवं आल्यास काय बोलावं मुलांना उमगत नाही. माझ्या घरी मोठ्ठं एकत्र कुटुंब, पाहुणे, ह्या सगळ्यामुळे सर्व वयाच्या लोकांशी सहज गप्पा मारायची सवय लहानपणा पासूनच लागली. Communication Skills, Confidence Building करता क्लासची गरज पडली नाही. नंतर पुढे TV, फोन आला.

लग्नानंतरही एकत्र कुटुंब असल्यानी, आयुष्य कायम समृध्द वाटलं. आम्ही सगळे रात्रीचं जेवण एकत्र करायचो, आणि मग TV serial किंवा ईतर प्रोग्राम्स बघायचो. एकत्र कुटुंबात, दर वेळेस आपल्या आवडीचा कार्यक्रम बघता येईल असे नाही. कारण तेव्हा घरात एकच TV होता पण compromise करायची सवय होते, जी आयुष्यात खूप कामी येते. बराच वेळ एकत्र घालवल्यामुळे कुटुंबामध्ये जिव्हाळा व जवळीक तयार होते कारण आपसात खूप संवाद असतो. आता प्रत्येक खोलीत एक TV असतो किंवा मुलं laptop, मोबईल वरही आपल्या आवडीचे कार्यक्रम बघतात. त्यानी आपसातला संवाद होत नाही. Technology नी प्रगती केलीये, पण माणसं दुरावली आहेत. तरुण पिढी facebook च्या likes मागे वेडी आहे. फोटो टाकण्याची, सेल्फिजची चढाओढ सुद्धा जीवघेणी आहे. कित्येकदा accident झाल्यावर, त्या माणसाला वाचवण्याऐवजी लोकं video व त्याच्याबरोबर सेल्फिज घेतात. समाजातल्या ह्या विकृतींनी मन अस्वस्थ होतं. कुठलंही knowledge मिळवण्याकरता आता माणूस एकमेकावर अवलंबून नाहीये, कारण त्याच्या दिमतीला Google, You Tube हे सर्व हजर आहेत. Computer च्या radiations चे शरीरावर भयंकर परिणाम होतात. Cancer,Tumors, misscarriage, डोके दुखणे, दृष्टी खराब होणे, निद्रानाश इत्यादी. सूर्योदय व सुर्यास्ताबरोबर चालणारी माणसाची दिनचर्या Computer आल्यापासून बिघडली आहे. उशिरापर्यंत जागणे व अपुरी झोप हे common झाले आहे.

मध्यंतरी केलेल्या एका survey मध्ये आढळले कि, भारतात ५०% बायका, मुलींना सायबर क्राईमला तोंड द्यावे लागते. त्यामधे धमक्या मिळणे, अश्लील भाषा हे सर्व आहे. तरुण मुला मुलींना trolling, body shaming ह्यामुळे मानसिक ताण येतो. मध्यंतरी आलेला एक whatsapp मेसेज मला फार आवडला होता. 'एका माणसाला फेसबुक वर २००० friends असतात, पण त्याच्या कार्यक्रमाला फक्त ५ लोकं येतात' आणि प्रत्यक्षात हे खरं पण आहे. कारण, computer वर तुम्ही किती लोकांशी जोडले गेला आहात, यापेक्षा मनाच्या तारा किती जणांशी जुळल्या आहेत, हे जास्ती महत्वाचं. Google, Facebook, Whats app, Twitter, YouTube ह्यांच्याशी जवळीक असूदे, पण नातेवाईक आणि मित्र, मैत्रिणींशी भेटीगाठी व गप्पा पण चालू राहू देत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तसच माणसानी Computer किंवा मोबईलचा गुलाम न होता, त्याचा उपयोग कामाकरता व सोईकरता मर्यादित ठेवला पाहीजे. शेवट ह्या चारोळीने करते.

नको होऊस गुलाम सोशल मिडीयाचा, 
आप्तेष्ट, मित्रांशी असू दे संबंध जिव्हाळ्याचा. 
Mobile व computer साऱ्या कामाचा भार वाही, 
तरी त्यास माणुसकीची सर नाही, माणुसकीची सर नाही.


- सौ. मेघना असेरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा