महिला ‘दीन’

आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुलभाताईंचे कॉलेजमध्ये भाषण होते. सुलभाताईंचे वय पन्नाशीच्या आसपास. वयाची जवळपास ३० वर्षे त्या कॉलेजमध्ये इंग्लिशच्या लेक्चरर होत्या. त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व, साध्याच पण सुंदर रंग-संगतीच्या कलकत्ता कॉटनच्या साड्या, पन्नाशीतही काळ्या लांब केसांचा सुंदर अंबाडा आणि इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्त्व यामुळे विद्यार्थ्यांचे फार प्रेम होते त्यांच्यावर. सुलभा प्रभुणे मॅडमचा क्लास अटेंड करायला दुसऱ्या वर्गाची मुलेदेखील गुपचूप येऊन बसायची.

आज मॅडमचे भाषण ऐकायला हॉलमध्ये इतकी गर्दी झाली होती की काही विद्यार्थी विद्यार्थिनी हॉलबाहेरच्या व्हरांड्यात उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होते.

मॅडम बोलत होत्या:

खरे तर असा दिन साजरा करावा लागणे हेच मुळात शल्य आहे. एकीकडे स्त्रियांना त्यागाची देवी, गृहलक्ष्मी अशी पदे देऊन त्यांना देवत्त्व द्यायचे आणि दुसरीकडे त्यांना साधे व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा नसावे? कित्येक घरात आजही मुलगा मुलगी भेद केला जातो. मुलींना दुय्यम वागणूक मिळते. मुलगी कितीही हुशार असली तरी तिला सतत ती मुलगी असल्याचा न्यूनगंड दिला जातो. तिचे नुसते माणूस म्हणून जगण्याचे काही अधिकार देखील हिरावून घेतले जातात. आजही खेड्यात मुली शाळेत न दिसता चुलीपाशी दिसतात. शहरात रस्त्याने चालताना मुली खाली मान घालून चालतात. न जाणो कुठल्या कोपऱ्यावर कोण त्यांची छेड काढेल? 

हे चित्र बदलावे असे वाटत असेल तर त्याची सुरुवात तुमच्या वयापासून व्हायला हवी. कॉलेजमध्ये असल्यापासून स्त्रियांना मानाची वागणूक देण्याची सवय मुलांनी लावून घेतली तर ते पुढे चांगले नागरिक, चांगले पती, चांगले पिता होतील. बदल आता मुलींमध्ये नाही तर मुलींसाठी होण्याची गरज आहे. मॅडमचा एकेक शब्द विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला जात होता. भाषणाच्या शेवटी जेव्हा मॅडमनी, “सांगा, आज कोण कोण स्त्रियांना सन्मानाने वागवण्याची प्रतिज्ञा घ्यायला तयार आहात”, असे विचारले तेव्हा संपूर्ण हॉलमध्ये "मी" असा एकाच सूर उमटला होता.

कार्यक्रम संपला तेव्हा अंधार पडला होता. मॅडमच्या फायनल इयरच्या वर्गातील काही मुलामुलींना मॅडमशी या विषयावर अजून थोडी चर्चा करायची होती म्हणून ती मुले मागे रेंगाळली.पण गर्दीत मॅडम केव्हा निघून गेल्या त्यांना पत्ता लागला नाही. काही अति-उत्साही मुलांनी आपण आत्ता मॅडमच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलूया अशी कल्पना सुचवली. आणि मंडळी लगेच निघाली देखील. मॅडमच्या घरी जाऊन त्यांना भेटायची उत्सुकता मोठी होती. कसे असेल घर, कसे असतील त्यांच्या घरचे लोक अशा  सर्व गोष्टींचे कुतूहल. मॅडम सोशल मीडिया पासून लांब होत्या आणि कॉलेजमध्ये पण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल कोणाला फारसे ठाऊक नव्हते त्यामुळे मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

मंडळी त्यांच्या घरी पोहोचली. बंद असलेल्या दारावर "श्री. श्रीकांत प्रभुणे" पाटी दिसल्यावर हेच घर असावे अशी सर्वांची खात्री पटली. दारावरची बेल वाजवणार एवढ्यात आतून त्यांना कोणीतरी जोरजोरात बोलल्याचा आवाज आला. 

थोडा कान देऊन ऐकल्यावर त्यांच्या कानावर पडले ते असे:

ही काय घरी यायची वेळ झाली?... अहो पण का उशीर झाला हे तर ऐकून घ्या... एक शब्द बोलू नकोस... तुझी कॉलेजची थेरं पुरे झाली आता... तुझ्या टिचक्या नोकरीमुळे घरादाराचे नुकसान होते ते दिसत नाही तुला? तुझ्या पगारावाचून घर अडलेले नाही... आणि तुला विरंगुळा मिळावा म्हणून तू घराकडे दुर्लक्ष केलेले मी खपवून घेणार नाही... पोरे केव्हाची उपाशी आहेत… नवरा उपाशी आहे. त्याचे तुला काही नाही. तू मिरव कॉलेजच्या मुलांसमोर... त्यानंतर थोडी आदळ आपट... आणि मग भयाण शांतता... मुले आल्या पाऊली सुन्न मनाने गुपचूप परत निघाली. खाली जाऊन गाड्या काढत असताना एका मुलीचे सहज वर लक्ष गेले तेव्हा तिला बाल्कनीमध्ये डोळे टिपणाऱ्या मॅडम दिसल्या...

- विनया रायदुर्ग




1 टिप्पणी:

  1. उत्कृष्ट अंक! केशव पाटणकर, मनःपूर्वक अभिनंदन - तुझे आणि तुझ्या टीमचे !
    - मुकुंद टाकसाळे

    उत्तर द्याहटवा