करमणूक आठवणीतली !!

संक्रांत संपून थंडी कमी होऊ लागली की होळीचे वेध लागत. आम्हा मुलांना होळीपेक्षाही त्यानंतर येणाऱ्या धुळवड आणि रंगपंचमीचेच आकर्षण अधिक असे. प्रत्यक्ष होळीच्या दिवशी कॉलनीच्या एका टोकाला होळी रचली जाई. शाळा सुटली की आम्ही मुलं आधी तिकडे धूम ठोकत असू. सगळी मुले जमली की हाताच्या मुठी तोंडावर वाजवत बोंबा मारायला अधिकच जोर येई. दुसऱ्या दिवशी मनसोक्त रंग खेळून झाला की संध्याकाळी मोर्चा रसवंती गृहाकडे! आलं,लिंबू आणि बर्फ घालून रस प्यायला मजा येई. 

मार्च - एप्रिल महिन्यात परिक्षा सुरु होत. सर्व मुलं शाळा,परिक्षा आणि अभ्यासात बुडून जातं. उन्हाळ्याची सुट्टी लागली की,वेगवेगळे खेळ खेळायला मजा येई. पत्ते ,कॅरम यासारखे बैठे खेळ तर होतेच पण जास्त मजा येई ते लपंडाव, डब्बा एक्सप्रेस, लगोरी, गोट्या असे खेळ उशिरापर्यंत खेळण्यात. रात्रीची जेवणं उरकली की मुलं गोळा होत आणि लपंडाव ,डब्बा एक्सप्रेस चा डाव रात्री उशीरापर्यंत रंगत असे. मग कधीतरी जेवणाचे डब्बे घेऊन बागेत सहल निघत असे किंवा स्वतः स्वयंपाक करुन बघायची हौस येई. शिधा गोळा करुन कुणाच्यातरी घराच्या बागेत चूल पेटत असे. 

घरोघरी टेलिव्हिजन येण्याआधीचा काळ. करमणुकीची साधनं कमी होती परंतु छोट्या गोष्टींमधून भरपूर आनंद मिळत होता. नाही म्हणायला प्रत्येक घरी रेडिओ होते, त्यावर बातम्या, गाणी आणि विविध कार्यक्रम ऐकले जायचे. मैदानी खेळ विशेषकरुन पारंपारिक खेळ, बागेतल्या सहली, निवांत दुपारी टाकलेला पत्त्यांचा डाव असो किंवा अगदी बागेतून चोरून खालेल्या चिंचा - बोरे ,पेरु -कैऱ्या असोत. करमणुकीला सीमा नव्हती. काय करू ? हा प्रश्न मुलांना पडत नव्हता. मुलं घरापेक्षा, घराबाहेर अधिक दिसत होती.

करमणुकीच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणजे चित्रपट. तेव्हा एक-पडदा चित्रपटगृहे होती आणि चित्रपट पाहणे ही एक पर्वणीच असायची. परंतु खरी मौज मोकळ्या मैदानात चित्रपट पाहण्यात होती. मैदानात लावलेला पांढराशुभ्र पडदा आणि थोड्या अंतरावर टेबलावर प्रोजेक्टर ठेवून दाखविलेला पिक्चर. आमच्या कॉलनीतल्या एका काकांनी उपक्रम चालू केला होता, महिन्यातील एका किंवा दोन शनिवारी चित्रपट दाखविण्याचा. त्यात हिंदी, मराठी बरोबरच इंग्रजी विशेषकरून चार्ली चॅप्लिन आणि लॉरेल हार्डीचे ही चित्रपट दाखविले जायचे. शनिवारी अर्धवेळ शाळा असायची. सिनेमा असेल त्या शनिवारी दुपारीच सगळा अभ्यास उरकून घ्यायचा आणि संध्याकाळ होण्याची वाट बघायची. एकदा का संध्याकाळ झाली की ,सर्व मुलांचा मोर्चा चादरी ,सतरंज्या ,चटया घेऊन कॉलनीतल्या मधल्या मोकळ्या जागेत निघत असे, जागा पटकविण्यासाठी. पसरलेल्या चादरी ,सतरंज्या उडून जाऊ नये म्हणून दगडं गोळा करुन चार कोपऱ्यांवर ठेवायचे. यथावकाश पांढरा पडदा लावला जायचा. टेबलावर प्रोजेक्टर ठेवला की त्याभोवती मुलांचा गराडा पडायचा. सिनेमाच्या रिळांचे काळे डब्बे बघून तो कसा आहे आणि किती लांबीचा आहे याची चर्चा रंगायची .

जेवण झाले की सर्वजण जमा होऊ लागत आणि पिक्चर सुरु होई. थंडीच्या दिवसांत चादरी, शाली, गोधड्या पांघरुण आणि पावसाळी दिवसांत अगदी छत्र्या उघडून त्या खाली बसून बघितलेले कितीतरी चित्रपट आठवतात. ब्लॅक अँण्ड व्हाइट जमान्यातील उत्तमोत्तम हिंदी चित्रपट असेच मोकळ्या पटांगणात ,आकाशाच्या छताखाली बघितले. गणेशोत्सवाच्या दिवसांत मराठी नाटकं किंवा हिंदी -मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ही असाच बघितला.

त्यानंतर कधीतरी कॉलनीतील एक -दोन घरी ब्लॅक अँण्ड व्हाईट टीव्ही आले. रविवारी सकाळची साप्ताहिकी आणि संध्याकाळचा चित्रपट यासाठी त्यांच्याघरी गर्दी जमू लागली. त्यांच्या घरातले हे टेलिव्हिजन खाजगी असण्यापेक्षा सार्वजनिक अधिक होते. कालांतराने रंगीत टीव्ही आले आणि घराघरांवर अँटेना दिसू लागले. टेलीव्हिजनवर दिसणाऱ्या एकाच वाहिनीमुळे करमणुकीला मर्यादा होती, तरीही रविवार संघ्याकाळी किंवा रामायण-महाभारत सारख्या मालिकांमुळे रस्ते ओस पडू लागले.

एकविसावे शतक जसे जवळ येऊ लागले तसे करमणुकीची साधनं आणि व्याख्या बदलत गेली. एक-पडदा चित्रपटगृहांचे मल्टीप्लेक्स झाले. पन्नास ते पंचवीस आठवडे चालणारे चित्रपट पन्नास दिवसही चालेनासे झाले. रेडिओ कधीही आणि कुठेही ऐकता येऊ लागला. एक वाहिनी टीव्ही बदलून आधी केबल ऑपरेटर आणि नंतर असंख्य वाहिन्यांनी चोवीस तास मनोरंजन सुरु केले. करमणूक चार भिंतीत बंदिस्त होत गेली. मुलं मैदानापेक्षा टिव्ही समोर अधिक दिसू लागली. त्यातच भर पडली संगणक आणि मोबाईल क्रांतीची ! असंख्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी आयुष्य व्यापून गेले तरीही आठवणीतल्या छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळालेल्या मनोरंजनाने आयुष्य समृध्द झाले.


- अनिता पांडकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा