बिनपैशाची करमणूक

करमणूक हा विषय रोजचाच असला, तरी त्याची व्याख्या करणे खरच कठीण आहे. मला असं वाटतं कि जी गोष्ट आपल्याला निखळ आनंद देते, ज्या गोष्टीत आपला जीव पुरेपूर रमतो, आपली दु:ख विसरून ख-या अर्थाने आपल्याला ज्यात रममाण होता येत तीच खरी करमणूक.

करमणूक करून घ्यायला खूप पैसे देऊन, महागडे तिकीट काढून, मोठमोठ्या कार्यक्रमाला जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जसे हल्ली कॉमेडी रिऍलिटी शोज चे फॅड बोकाळले आहे, पैसे देऊन कोणाकडून तरी हसवून घ्यायचे. काही वेळा तर हसू येत नसताना हसायचे बाकीचे हसतात म्हणून किंवा बॅकग्राऊंडला हसण्याचे आवाज काढलेले असतात म्हणून, त्यापेक्षा डोळे उघडे ठेऊन आजूबाजूचे बारीक निरीक्षण केले तरी आपोआप आपली करमणूक होऊ शकते.

आपले लहान पण आठवले, तर त्या काळात खूप महागडी खेळणी उपलब्ध नव्हती. आट्यापाट्या , विटीदांडू, पत्ते, सागरगोटे, लगोरी एवढेच काय तर सिगारेटची रिकामी पाकिटे जमवून त्याचा आम्ही खेळात वापर करत असू. आजूबाजूची सर्व मुले जमवून खेळण्यात व काही वेळा भांडण्यात खूपच मजा होती .एकमेकांशी जमवून घेण्याचे आणि आपल्या वस्तू दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करण्याचे शिक्षण यातूनच तर मिळत असे .विशेष म्हणजे या सर्व गोष्टी फुकट उपलब्ध होत्या, पण त्यातून होणारी करमणूक व मिळणारा आनंद आमच्यासाठी खूपच मौल्यवान होता. 

‘चांदोबा, आनंद वेताळ’, या सारखी पुस्तके वाचणे, त्यातली रंगीत चित्रे पाहणे यात वेगळीच गंमत होती. नवीन मासिके कधी घरी येतील याची आतुरतेने वाट पाहत असायचो आम्ही. मराठी बालकविता तर इतक्या सुंदर असायच्या. त्यात सुंदर अर्थ व चाल असायची. पटकन पाठ होऊन जायच्या व म्हणायला ही मजा यायची. त्यातल्या काही कविता ५० वर्षानंतर अजूनही आठवतात. “लहान माझी बाहुली, मोठी तिची साऊली ,घारे डोळे फिरविते, नकटे नाक उडविते”, ही कविता, खरंच आपलं नकटं नाक उडवत व डोळे फिरवत म्हटल्याचे मला अजूनही आठवते आहे. खूप मजा यायची. 

प्राण्यांचे, म्हणजे मांजर, कुत्रा व गोठ्या मधील गाई, बैल व म्हशीसुध्दा यांचे निरीक्षण करतानाही खूप करमणूक होत असे. मांजरीच्या पिलाचे, त्याच्या आईच्या शेपटीशी खेळणे, मान तिरकी करून पाहणे, व कधीतरी स्वतःची शेपटी पकडण्याच्या प्रयत्नात स्वतःभोवती गोलगोल फिरत राहणे. कुत्र्याचे त्याच्या पट्ट्याशी खेळणे मजेदार वाटायचे. आमच्याकडे मांजरीची दोन पिल्ले होती. खूप गोड दिसतात ही लहानपणी. एकाला खवलेला नारळ खायला फार आवडायचा. नारळ खवण्याचा आवाज आला की ते धावत यायचे. कधीकधी त्याची गम्मत करायला आणि त्याला बोलवायचे असेल तर नुसताच नारळाच्या करवंटीचा आवाज करायचो आम्ही आणि ते धावत यायचं. आम्ही खूप एन्जॉय करायचो ती गंमत. 

कोकणात मोठी घरे व आजूबाजूला मोकळी जागा असते. तिथे अशी पध्द्त असते की मांजराची जागा घरात व कुत्र्याची समोरच्या अंगणात. मांजर घरात आले तर त्याचे लाड व्हायचे, पण कुत्रा बिचारा कायम दरवाज्याच्या बाहेर उभा असायचा. आत्ता सारखा सोफयावर येऊन बसायला परवानगी नव्हती त्याला. तो घरात शिरतो असे दिसले तर बिचाऱ्याला लगेच बाहेर काढले जाई. पण गमतीची गोष्ट अशी की कधीकधी संधी मिळाली तर आमचा मोत्या पटकन समोरच्या दारातून आत यायचा व ओरडा खात मागच्या दाराने बाहेर पळायचा. जाता जाता मात्र वाकडी मान करून घरातल्या गोष्टीचं निरीक्षण करून घ्यायचा. त्याचे हावभाव बघून आम्ही खूप हसायचो तेंव्हा. माझ्या मनात विचार यायचा की मांजरीचा नक्की हेवा वाटत असणार याला . 

पुष्कळ वेळा लहान मुलांच्या निरागसतेतून व बोबड्या बोलातून सुद्धा आपली छान करमणूक होते. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात व त्यातून विनोदी किस्से तयार होतात. मागच्याच आठवड्यातली गंमत. आमचा नातू, वय वर्षे अडीच. त्याला 'टॉयलेट ट्रेंड' करायचा प्रयत्न सध्या चालू आहे. पूर्वी डायपर प्रकरण नसल्यामुळे हे काम आपोआप जमून जायचे. आता या ट्रेनिंग सोबत 'अवॉर्ड ' ही द्यावे लागते. त्यांनी हे काम शिकवल्या प्रमाणे केले की आई-बाबा त्याला एक छानसा स्टिकर द्यायचे. एकदा त्याला तसाच एक स्टिकर घरात मिळाला. त्याने तो बाबाला दिला व म्हणाला बाबा “आवाल फॉर यु”. साहजिकच बाबा म्हणाला की, 'अरे मला कशाला? मला नको देऊस.' तर त्याने लगेच विचारले, “व्हाय यु नौत तेकींग, डीड यु वेट युर अँडी तुदे” आमची हसून हसून पुरेवाट झाली.

अशीच अजून एक मजेदार घटना आठवली. घरच्या गणेश उत्सवाकरता आमच्या नात्यातली सर्व बालगोपाळ मंडळी जमली होती. त्यात दोघा चुलत बहिणींची नावे आरती व नयना अशी होती व वये पाच ते सात वर्षे होती. पूजा झाल्यावर आजी म्हणायची , "चलारे, आरती करायला " असे म्हटल्यावर नयना नाराज व्हायची. दोन दिवस झाले कोणालाच काही समजेना की ही अशी हिरमुसलेली का आहे? तिस-या दिवशी तर तिने चक्क भोकाडच पसरले. "अग काय झाले तरी काय रडायला?" असे विचारल्यावर नयना म्हणाली, "रोज रोज, तुम्ही आरतीला चला असेच म्हणता, कधी माझे नाव घेऊन 'नयनाला चला' असे म्हणत नाही" अरे हो, खरंच की, हा पॉईंट आमच्या लक्षातच आला नव्ह्ता. त्यादिवशी तिला बरे वाटावे म्हणून आजीला " नयनाला चला " असे म्हणावे लागले. नंतर तिला समजावून सांगावे लागले की बाप्पाच्या गाण्याला आरती म्हणतात, म्हणून आरतीला चला असं म्हणताहेत सर्वजण. आता पंचवीस वर्षांनी ही गंमत, त्या दोघी आल्या की आजी सांगते व त्या दोघींसह आम्ही भरपूर हसतो. 

लग्नानंतर काही दिवस आमचे वास्तव्य मुंबईला होते. मुंबई दर्शन करताना गर्दी दिसली, की आम्हीही तिथे डोकावून पहायचो. हमखास तिथे माकडाचा खेळ, डोंबा-याचा खेळ किंवा रस्त्यावरील सर्कशीचे खेळ पहायला मिळायचे. त्यातली मजा पाहून जनता सर्व व्यथा विसरून खळखळून हसताना आम्ही पाहिली आहे. तिथे त्या गर्दीत व भर उन्हात जी करमणूक अनुभवली, ती आता पैसे खर्च करून, वातानुकूलित हॉल मध्ये बसून मिळते का असा प्रश्न पडतो. ब-याच वेळा या विकतच्या करमणुकीच्या घटना व किस्से क्षणिक असतात. पण भावनिक व छोट्या घटना मनात घर करून राहतात व आठवून अजूनही त्याची मजा अनुभवता येते.

- स्नेहल केळकर





३ टिप्पण्या:

  1. खरे तर जो निख्खळ आनंद आपण मिळवला तो आजची पिढी खऱ्या अर्थाने वंचित आहे.याचे एकच सबळ कारण जे मला वाटते ते म्हणजे आपण आपल्या मुलांना आपण उपभोगली मजा,नवी पिढी या गोंडस नावाखाली किंवा आवडते किंवा यांचे प्रयोग त्यांच्यावर करत नाही.
    कोणत्याही काळात मजा ही मजाच असते.माझ्या काळातील वेगळी त्यांच्या काळातील वेगळी असे कधीच नसते.खरे तर आई वडील पुढारलेले दाखवायचा प्रयत्न करतात.व जुन्या काळातील हे आनंद त्यांच्या पर्यंत पोचवले जात नाही.हे दुर्दैव​ आपण मान्य करत नाही.सध्या भावना व भावनिक नाते हे कशासाठी आहे ते सांगण्याची वेळ आली आहे. हा लेख वाचून मला वैयक्तिक खुप खुप आनंद झाला.वाचताना समोर त्याचे स्पष्ट चित्र उभे राहिले. मस्तच .

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिले आहेस स्नेहल! शेअर करणे आणि जमवून घेणे ..दोन फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्यास.

    उत्तर द्याहटवा