ऊन, पाऊस व आयपॅड

आयुष्यच्या शेवटच्या वऴणावर असताना मागे वळून पाहिल्यावर,आपण काय कमावलं काय गमावलं हे पाहताना, गमावलं काहीच नाही, पण संसार सुखाचा झाला याचा आनंद वाटतो. तरुण वयात खूप करावसं वाटतं. खूप काही इच्छा आकांक्षा असतात, आवडीही असतात, मनोरंजनासाठी वा स्वात:च्या कलागुणांचा विकास कराण्यासाठी काही करावेसे वाटते. मलाही शिवणकामाची, गाणी ऐकण्याची, नाटकात काम करण्याची, स्वयंपाकाची आवड होती. तरीही, संसारात पडल्यावर संसार सुखाचा करण्याच्या धावपळीतच, मुलांच्या भावी आयुष्याचा प्रवास सुखकर व्हावा हे सांभाळतच, स्वत:चे बरेच छंद जपले. पण हे सर्व करणे भागच होते, मध्यम वर्गातल्या सर्व महिलांना आहे त्या उत्पन्नात काटकसर करुनच करावे लागते असे. 

मुलं मोठी झाली. चांगली शिकली. उत्तम नोकऱ्या लागल्या, त्यांना आयुष्याचे जोडीदार चांगले मिळाले हे पाहुन आम्ही कृतकृत्य झालो. खऱ्या अर्थाने धन्य झालो. आता आपल्या आवडी-निवडी जोपासायचे ठरवले. वाचनाची खूप आवड होती. पहिल्यापासूनच मोठमोठ्या लोकांची आत्मचरित्र वाचली, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना हजेरी लावू लागलो. माझ्या यजमानांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती, नोकरीच्या काळात करणे झाले नाही म्हणून निवृतीला तीन वर्षे होती तेव्हापासून गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या व विशारद केले. पण अलंकार परीक्षेच्या आठ दिवस आधी त्यांना हार्टअटॅक आला. घशात नळ्या घातल्याने त्यांचा आवाजच गेला, परीक्षाही गेली. याचे त्यांना व आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. मग घरातीलच संगीत वाढवले. दर गुरुपौर्णिमेला आमच्याकडे संगीताचा कार्यक्रम होऊ लागला. त्यानंतर संगीतावर निबंध लिहून त्यांना PhD मिळवायची होती. बरेच लिहूनही झाले पण दुर्दैवाने तेही काम पूर्ण नाही झाले याचे वाईट वाटते. म्हणून आता त्यांच्या नावाने वेगवेगळ्या शाळेतील मुलांना संगीतातील स्पर्धेत बक्षिसे देतो. 

आता माझे आयुष्य कसे घालवायचे हा प्रश्न आला. आपले आपणच ते ठरवायचे. छंद बरेच होते पण ते सर्वच आपण पूर्ण करु शकत नाही. पुन्हा घरातल्या मंडळीना त्रास न देता ती करमणूक व्हायला हवी, तो छंद जपायला हवा. 

वाचनाची प्रचंड आवड ग्रंथालयातून  मुलगा दर शनिवारी चार पुस्तकं आणत होता. मी बरी होते तेव्हा जात होते. एक दिवस मुलगा म्हणाला, “आई, वाचनालयातली सगळी पुस्तक संपली”. मीही डोळ्यांना त्रास नको, आहेत ते अवयव शेवटपर्यंत टिकावेत म्हणून वाचन बंद केले. दिवस कसा घालवायचा, लेकाला काळजी. त्याने माझ्या ऐशींव्या (८०) वाढदिवसाला हा आयपॅड का काय म्हणतात ते घेऊन दिले. मला संकोच वाटला, एवढी महागडी वस्तू मी कशी वापरणार, जन्मात कधी पाहिली नाही, कशी हाताळायची. पण मुलाने व नातवाने मेल कसे करायचे, स्काइप कसे करायचे, त्यावर मराठी पेपर कसे वाचायचे, हे शिकवले. काही गोष्टी मुलीने बंगलोरहून सांगितल्या. आता मला या आयपॅडची इतकी सवय झाली आहे की माझा दिवस कसा जातो हे मलाच कळत नाही. 

देशोदेशी असलेले नातेवाईक, मित्रमंडळी भेटतात, त्यांच्याशी बोलते... धन्य, धन्य वाटते. मला माणसं जमवण्याची हौसच, म्हणून मी रोज त्यांच्यशी संपर्क साधते. रोज कुणाचातरी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असतो. शिवाय सटरफटर लिहायची वाईट खोड आहेच, त्यामुळे लोकांना ते सहन करावे लागते...करतात बिचारे, माझी करमणूक पण लोकांना त्रास!

अजूनही वाटतं मी जर धड असते तर महाराष्ट्र मंडळाच्या सर्व कार्यक्रमात भाग घेतला असता. माझी करमणूक करणाऱ्या  या आयपॅडला, मला घेऊन देणाऱ्या माझ्या मुलाला व चुकले की धावून येणाऱ्या नातवाला श्रेय आहे.


- शांता टिळक

 



८ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर लिहीले आहेत.थोडक्यात पण महत्वाचे सर्व आले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर लिहीले आहेत.थोडक्यात पण महत्वाचे सर्व आले आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर लिहीले आहे थोडक्यात पण महत्वाचे

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर लिहीले आहे थोडक्यात पण महत्वाचे

    उत्तर द्याहटवा
  5. ह्याला म्हणतात सकारात्मक जीवन जगणे व त्यातून इतरांना त्याचे उदाहरण घालून देणे ������

    उत्तर द्याहटवा
  6. मावशी, फार छान लिहिलेय, "आता माझे आयुष्य कसे घालवायचे हा प्रश्न आला. आपले आपणच ते ठरवायचे. छंद बरेच होते पण ते सर्वच आपण पूर्ण करु शकत नाही. पुन्हा घरातल्या मंडळीना त्रास न देता ती करमणूक व्हायला हवी, तो छंद जपायला हवा."खरंय.
    एकदम ताजे आणि उत्साही वाटते ,तुमचे लिखाण वाचले की!

    उत्तर द्याहटवा
  7. Ti Aais,
    Agadi Manasarakhe aani vyavastheet lihile aahes. Khoop chhan vatale

    Shashank

    उत्तर द्याहटवा