महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

छोट्या मुलांकरिता अभिनय कार्यशाळा - Theatre ETC

(दिनांक २२ , २३ आणि २४ जून २०१७)

मंडळाच्या सभासद स्वप्ना मिराशी आणि नलिनी थिटे ह्या दोघीजणींनी मि़ळून ही कार्यशाळा घेतली. ह्याला छोट्या बालमित्रांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत मुलांना नाटकाच्या विविध अंगांची व तंत्रांची माहिती दिली गेली. नाटक ही नुसती प्रदर्शनकला नसून त्यातून परकायाप्रवेश व सहिष्णुता, एकत्र येऊन एकजुटीने काम करून त्याचा आनंद घेणे, कोणतेही काम छोटे वा मोठे न मानणे, स्वतःपेक्षा नाटकाला सर्वात जास्त महत्त्व देणे, व स्वतःला मोकळेपणाने मुक्त व आत्मविश्वासाने व्यक्त करता येणे हे सगळे शिकवण्यात आले. 

शेवटी मुलांनी नाटकंही बसवली. मुलांचे तीन गट बनवण्यात आले व प्रत्येक गटाला आपापले स्वतंत्र असे नाटक बसवायला मिळाले. मुलांच्या आईवडिलांना व कुटुंबियांना ही नाटके शनिवारी २४ तारखेला बघायला मिळाली. 

कार्यशाळेची छायाचित्रे इथे बघा.


ममंसिं सहल २०१७ - बिंतानइंडोनेशिया

(शनिवार, १५ जुलै २०१७ आणि रविवार १६ जुलै २०१७)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाने सहलीचा एक मस्त बेत आखला. इंडोनेशियातल्या बिंतान ह्या बेटाला बोटीने जाऊन तेथील शांत निवांत अशा 'बिंतान अ‍ॅग्रो रिसॉर्ट' मधे दोन दिवस एक रात्र मुक्काम करण्यात आला. City Tour, बालीनीज मसाज, कॅम्प फायर, आणि रिसॉर्ट मधील आरामदायक वातावरण ही सहलीची वैशिष्ठे होती. मंडळाच्या सभासंदानी ह्या सहलीमधे भाग घेऊन पर्यटनाचा आनंद लुटला.

सहलीची छायाचित्रे इथे बघा:





श्रावणसरी
(मंगळवार, ८ ऑगस्ट २०१७ संध्याकाळी ७ ते ९:३०)

श्रावण महिना सुरु झाला की आपल्याकडे सणवारांची सुरुवात होते. राखी पौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, हळदीकुंकू म्हणजे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण! त्या उत्साहात आणि आनंदात थोडी भर घालण्यासाठी मंडळाने आपल्या स्त्रीसभासदांसाठी 'श्रावणसरी' हा मंगळागौरीचे खेळ आणि हळदी कुंकू असे स्वरुप असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केंट वेल फंक्शन हाॅलमध्ये केले होते. शंभर हौशी बायकांनी ठेवणीतल्या रंगीबेरंगी साड्या, नऊवार, सुंदर पैठण्या नेसून झिम्मा, फुगडी, गोफ असे विविध खेळात भाग घेऊन मोठेपणाची झाल उतरवून भरपूर दंगा, मस्ती आणि धम्माल केली. महिलांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. हळदी कुंकू, गजरा आणि सौभाग्याचे वाण देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. एका आठवड्यातच तिकीटे sold out झालीत. पद्मजा जोशींच्या मार्गदर्शनाखाली नवविवाहीत स्त्रीयांकडून मंगळागौरीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुहीक आरती आणि प्रसाद वितरण आनंदाने पार पडले. 

आता मंगळागौरीच्या खेळाची वेळ आली तसे सर्वजणींनी रिंगण घालून विनया रायदुर्ग व तिच्या चमूच्या मदतीने मंगळागौरीचे खेळ खेळण्यास प्रारंभ केला. आधी त्या खेळ खेळून दाखवायच्या व त्यानंतर सर्वजणींनी त्यांचे अनुकरण केले. त्यात फुगडी, झिम्मा ,आगोटा पागोटा, गोफ, नाच ग घुमा, पाणी लाटा, खिस बाई खिस, खुसू खुसू, ताम तवली इत्यादी अस्सल मराठमोळी खेळांचा समावेश होता. सर्व महिलांनी खेळीमेळीने व उत्फुर्तपणे खेळून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

तास दीड तासांच्या खेळानंतर सर्वजणींनी भोजनावर यथेच्छ ताव मारला. नलिनी थिटे, श्यामल भाटे, अमृता कुळकर्णी आणि प्राजक्ती मार्कंण्डे ह्या मुलींनी देखील कार्यक्रम यशस्वी व्हायला भरपूर मदत केली. संपूर्ण कार्यक्रमांचे छायाचित्रीकरण भाग्यश्री गुप्ते ह्यांनी केले. रांगोळी काढली होती श्रद्धा मेस्त्री ह्यांनी. बक्षिसं खरेदीसाठी राणी माधवी किंजवडेकर आणि इशा बिबेकर ह्यांची मदत मिळाली. नीता विवेक साठे, माल्विका वैद्य, मयुरा दामले, अपर्णा समेळ, रश्मी घोडके ह्यांनी मदतनीस म्हणून मोलाची मदत केली. ह्याव्यतिरिक्त सुचित्रा जंगम, सचिन जंगम, श्रीकांत जोशी, निवेदीता फावडे ह्यांची देखील श्रावणसरी ह्या कार्यक्रमाला भरपूर मदत मिळाली. असा हा कार्यक्रम दरवर्षी व्हायला पाहिजे अशी अनेकांनी मागणी केली ह्यातचं काय ह्या कार्यक्रमाचे यश सामावलेले आहे. 

श्रावणसरीची छायाचित्रे इथे बघा:


आगामी कार्यक्रम

गणेशोत्सव
शुक्रवार, २५ ऑगस्ट ते मंगळवार, २९ ऑगस्ट २०१७ पर्यंत
स्थळ - ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, शाखा क्वीन्सटाऊन, मे चीन रोड, सिंगापूर
तिकीट विकत घेण्यासाठी इथे बघा.

स्थानिक कलाकारांचे नाटक
९ सप्टेंबर २०१७ खू ऑडिटोरियमधे.

दांडिया
3० सप्टेंबर २०१७
स्थळ - ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, शाखा क्वीन्सटाऊन, मे चीन रोड, सिंगापूर

दिवाळी ऑर्केस्ट्रा
२२ ऑक्टोबर २०१७
स्थळ - सिंगापूर पॉलिटेक्नीक, डोवर रोड, सिंगापूर

- यशवंत काकड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा