वेगळ्या वाटा - मजकूर लेखन

लेखनवाटेवरचे एक आगळेवेगळे वळण :

सर्वसाधारणपणे कोणत्याही कलेची दोन अंगे असतात : अभिजात आणि व्यावसायिक. अभिजात साहित्याची व्याख्या, त्याचे विषय, मूल्यमापनाचे निकष वगैरे मुद्द्यांवर प्राचीन काळापासून प्रचंड उहापोह झालेला आहे. त्या तुलनेने व्यावसायिक लेखनप्रपंच हा तसा नवीन उद्योग आहे! अगदी ढोबळमानाने ठरवायचे झाले तर व्यावसायिक लेखनाची व्याख्या “विशिष्ट व्यापारी हेतू सिद्ध करण्यासाठी प्रतिभावान लेखकाला मानधन देऊन करवून घेतलेले लेखन” अशी करता येईल. एकविसाव्या शतकात व्यावसायिक लेखनाच्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्या. त्यातील बहुतांश संधी चित्रपट आणि मार्केटिंग क्षेत्रात प्रकर्षाने प्रचलित झाल्या. एखाद्या उत्पादनाचे अथवा सेवेचे मार्केटिंगमधील यश हे आकर्षक भाषा आणि प्रभावी संदेशांवर अवलंबून असते. टीव्हीवरच्या जाहिरातींच्या कल्पना आणि पटकथा, वृत्तपत्रातील जाहिरातींमधील मजकूर, माहितीपत्रकांमधील मजकूर इत्यादी लेखनप्रकार गेल्या शतकात नुसतेच रूढ झाले नाहीत तर त्यांचे शास्त्र आणि अनेक तंत्रेसुद्धा हळूहळू उत्क्रांत झाली. अशा पद्धतीचे लेखनकौशल्य असलेंला लेखक “कॉपी रायटर” म्हणून ओळखला जातो. प्रगत देशांमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी कॉपी रायटर आजही वर्षाला लाखो डॉलर उत्पन्न मिळवतो. सृजनशील कॉपी रायटिंग आणि कल्पक डिझाईन या दोन खांबांवर जगभरात अब्जावधी डॉलरची उलाढाल असलेल्या जाहिरात व्यवसायाचा विशाल तंबू अनेक दशके उभा आहे. 

गूगल नावाचा भूकंप: 

दि. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगलने आपली मुहूर्तमेढ रोवली आणि मनुष्यप्राण्याच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाले. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी जीवनाच्या प्रत्येक अंगांवर सद्द्या गूगलचा निर्विवाद प्रभाव दिसून येत आहे आणि दिवसेंदिवस ही पकड अधिकाधिक भक्कम होत चालली आहे. अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीतून प्रगल्भ झालेल्या गूगल तंत्रज्ञानाने आपले जीवन अतिशय सुखावह झाले आहे हे कोणीही सहज मान्य करेल. एकीकडे ग्राहकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल करणाऱ्या गूगलने अनेक प्रस्थापित उद्योगांना होत्याचे नव्हते करून टाकले आहे. अर्थातच औद्योगिक विश्वामध्ये अश्या उलथापालथी होणे ही काही नवीन बाब नाही. प्रत्येक प्रगत तंत्रज्ञान असे मंथन थोड्या फार प्रमाणात घडवून आणतच असते. परंतु गूगलने आणलेल्या बदलांना भूकंपाचीच उपमा योग्य ठरेल याचे कारण त्यांचे परिणाम आणि परिमाण अभूतपूर्व आणि अकल्पनीय आहेत. 

मार्केटिंग विश्वाची नवीन व्यवस्था:

गूगलचा हादरा मार्केटिंग जगताला सर्वाधिक बसला आहे. उत्पादनांचे वितरण आणि त्यांची जाहिरात या दोन प्रमुख भूमिका मार्केटिंगची मंडळी निभावत असतात. इंटरनेट तंत्रज्ञानामुळे आज ई-कॉमर्स व्यवहार सर्व वयोगटांतील आणि उत्त्पन्नगटांतील ग्राहकांच्या अंगवळणी पडले आहेत. ही सोयीस्कर वितरणव्यवस्था आपण आनंदाने स्वीकारली आहे. वितरणव्यवस्थेप्रमाणेच जाहिरातउद्योगाची प्रस्थापित व्यवस्थासुद्धा आज ढासळून पडत आहे. विकसित देशांमध्ये टीव्ही वाहिन्या व वर्तमानपत्रे कशीबशी तग धरून आहेत.
बरीचशी बंदही पडली आहेत. हे लोण हळूहळू विकसनशील देशातही येऊ घातले आहे. यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
  • तरुण मंडळींच्या वाचनाच्या सवयी बदलल्या आहेत. १६ ते २५ वर्षे वयोगटातील युवक छापील माहिती वाचेनाशी झाली आहेत. बहुतेक वेळ ते मोबाईलवर घालवतात. 
  • माहिती मिळवण्याची स्थाने बदलत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर वृत्तपत्रांपेक्षा अधिक वेगाने बातम्या ‘शेअर’ केल्या जातात.
  • एकंदरच वार्ताहरांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उमटू लागले आहे. त्यांची जागा ब्लॉगर्स घेऊ लागले आहेत. 
  • कोणतीही खरेदी करण्याआधी ग्राहक गुगलवर सखोल माहिती संकलन करतात. जाहिरातींमधून मिळणाऱ्या मोहक आणि गोंडस संदेशांपेक्षा स्वतः विविध ब्लॉग्स आणि फोरम्सवर संशोधन करून जमा केलेल्या माहितीवर त्यांचा अधिक भरंवसा असतो. 
या सर्व कारणांमुळे प्रचलित जाहिरातमाध्यमे विफल ठरू लागली आहेत आणि त्यांना गूगल सर्च आणि सोशल मीडिया या नवीन माध्यमांशी सामना करावा लागत आहे. यातही गूगलवरून मिळवलेल्या माहितीची विश्वासार्हता सर्वाधिक मानली जाते. 

आता मार्केटिंग हे कंटेंट मार्केटिंग होत आहे:

वरील पार्श्वभूमीचा विचार केला तर सहजच लक्षात येईल कि कोणत्याही उत्पादनाला अथवा सेवेला बाजारपेठेत स्थान मिळवायचे अथवा टिकवायचे असेल तर त्यांना इंटरनेट माध्यमांद्वारे इत्थंभूत माहिती प्रसिद्ध करावी लागेल जेणेकरून त्यांच्या भावी आणि विद्यमान ग्राहकांना खरेदी करण्यासाठी पुरेशी ठोस कारणे मिळतील. थोडक्यात इथून पुढे जी कंपनी अधिकाधिक माहिती इंटरनेटवर प्रकाशित करेल, ग्राहकांच्या समस्या आणि प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध करेल तिच्या उत्पादनांची मागणी अधिक असेल.आजच्या स्पर्धात्मक जगात हा माहितीपुरवठा अविरत करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. या स्पर्धेतही ‘थांबला तो संपला' हा नियम थोडा अधिकच लागू होणार आहे. याचमुळे अनेक कंपन्या आपल्या मार्केटिंग तंत्रांमध्ये मजकूर निर्मितीला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. 

मजकूर लेखकांना सुसंधी:

जगभरात कोट्यवधी उत्पादने आणि सेवांमध्ये इंटरनेटवर वर्चस्व प्रस्तापित करण्याची अहमहमिका लागली आहे. त्यामुळे प्रभावी, सुस्पष्ट आणि मनोरंजक मजकूर लिहिणाऱ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हा मजकूर खालील प्रकारांचा असतो.
  • कंपन्यांचे ब्लॉग्स 
  • ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उत्पादनांची आकर्षक माहिती
  • महत्वाची तांत्रिक माहिती 
  • सोशल मिडियावर ग्राहकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणारा मजकूर 
  • ई-मेल आणि ई-वार्तापत्रांकरिता लागणारा मजकूर
  • युट्युब वाहिन्यांवर लागणारे आकर्षक पटकथा लेखन 
  • विविध स्लाईड सादरीकरणांसाठी लागणारा मजकूर 
  • इतर अनेक प्रकारचा उपयुक्त मजकूर  

मजकूर लेखन : भाषाप्रभूंना सहज करता येण्याजोगा आकर्षक व्यवसाय:

चांगल्या लेखकांची वानवा असल्याने सद्ध्या मजकूर लेखक म्हणून नोकरी मिळणे हे तुलनेने अधिक सुलभ आहे. अनुभवी व्यक्तींना अर्थातच प्राधान्य मिळते. याशिवाय हा व्यवसाय घरात एक चांगली इंटरनेट जोडणी, अद्ययावत संगणक आणि खालील कौशल्ये असलेल्या कोणालाही करता येईल. 
  • चौफेर वाचन 
  • इंटरनेट आणि संगणकाची मूलभूत माहिती 
  • नवीन विषयांचे चट्कन आकलन होण्याची क्षमता 
  • लिखाणाच्या विविध शैलींमध्ये सहज संचार करण्याची क्षमता 
  • ज्या भाषेत लिहिणार त्या भाषेच्या व्याकरणावर प्रभुत्व

विशेष महत्वाची गोष्ट अशी की इथून पुढे इंटरनेटवर प्रादेशिक भाषांमधील मजकुराची मागणी वाढणार आहे. अनेकांना इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याची खंत जाणवत असते अथवा काहीवेळा न्यूनगंडसुद्धा असतो. आता ही परिस्थिती बदलणार आहे. स्वभाषेमध्ये उत्तम लिखाण अथवा परकीय भाषेमधून स्वभाषेत माहितीचे रूपांतरण करू शकणाऱ्या प्रतिभावंतांना कदाचित थोडी अधिकच मागणी असणार आहे. मराठीपुरते बोलायचे झाले तर माउलींची खालील उक्ती नव्या संदर्भात आजही तितकीच सार्थ आहे. 

माझा मराठाचि बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
(ज्ञानेश्वरी – ६.१४)

आपण या व्यवसायाचा जरुर विचार आणि पाठपुरावा करावा.


- मयूरेश मुरलीधर गोडसे
संस्थापक संचालक 
Contentfactory Pte Ltd


- मयूरेश मुरलीधर गोडसे


1 टिप्पणी:

  1. Mr.मयूरेश, तुमचा लेख खूपच महितिपरक वाटला ,पण असले मजकूर लेखन मला नक्कीच लिहिन्यास आवडेल पण त्या करीता कुठेशोधावे ,कुणाला गाठावे हे मात्र उमजत नाही आहे,जर थोड़े सांगितल तर बरे होईल☺

    उत्तर द्याहटवा