महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

क्रीडा स्पर्धा - क्रिकेट

मंडळाने प्रथमच इन-डोर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. विजेत्या संघाला मंडळाची २०१६-१७ क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी देण्यात येणार होती. २३ जानेवारी २०१७ रोजी, ‘ द केज @ कलांग ‘ इथे क्रिकेटचे सामने रंगले. ३६ खेळाडूंच्या सहा संघांनी हि ट्रॉफी जिंकण्यासाठी शर्थ लावली. उत्तम दर्जाचे इंडोर क्रिकेट बघायला मिळाले. खेळाडूंना खूप मजा आली आणि असे सामने परत व्हावेत असा अभिप्राय त्यांनी दिला. मुख्य म्हणजे हवामानावर अवलंबून न राहता ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.

विजेता संघ - जयदीप नरगुंड (कप्तान), प्रशांत गर्ग, अश्विन कुमार, सारंग अनाजवाला, वाडिश शेट्टी आणि परशुरामम नूरानी.

उपविजेता संघ- केदार कुलकर्णी कुलकर्णी (कप्तान), अजेय कुलकर्णी, महेंद्र रायदुर्ग, मिलिंद सावंत, प्रशांत गोरेगावकर आणि विनय जोशी

ओंकार बापट आणि प्रसन्न पेठे यांचे स्कोर कीपिंग केल्याबद्दल विशेष आभार.

- विशाल पेंढारकर
























तुझे गीत गाण्यासाठी

दि.४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र मंडळ स्वरगंधने कविवर्य कै.मंगेश पाडगावकर यांनी रचलेल्या भावगीतांवर आधारित एक सुश्राव्य कार्यक्रम आयोजित केला होता जो स्थानिक कलाकारांनी केलेल्या दर्जेदार सादरीकरणामुळे खूप रंगला.

सामान्य माणसाला जीवनात अनुभवाला येणाऱ्या विविध प्रसंगांतील, विविध भावनांचा अचूक वेध घेणाऱ्या, पण साध्या सोप्या भाषा-शैलीने नटलेल्या त्यांच्या कविता आणि त्यांची झालेली अजरामर भावगीते कलाकारांनी सादर केली. हा कार्यक्रम म्हणजे पाडगांवकरांच्या काव्याचे एक छोटेसे विवेचन होते. सर्व कलाकारांनी ३ महिने अथक परिश्रम करून हा तीन तासाचा कार्यक्रम बसवला होता. सुमधुर गायन, वाद्यांची उत्तम साथ आणि पाडगांवकरांच्या कवितांचे उत्तम प्रभावी दर्शन घडवणारे निवेदन, या सर्वांनी हा कार्यक्रम नटला होता.

विशेष म्हणजे या संगीतमय विवेचनाद्वारे त्यांच्या वैविध्यपुर्ण प्रतिभावान लेखणीचे सारांशाने दर्शन घडवण्यासाठी आणि पाडगांवकरांना/ त्यांच्या लेखणीला, म.मं.सिं तर्फे सश्रद्ध “सलाम” करण्यासाठी श्री.संतोष अंबिके यांनी कार्यक्रमाच्या संहितेच्या रचनेबरोबरच एक कविता लिहिली आणि या कवितेला संगीतकार श्री. अक्षय अवधानी यांनी स्वर-बद्ध केले.

हा कार्यक्रम म.मं.सिं च्या सर्व रसिक सभासदांचे कौतुक संपादन करून तर गेलाच परंतू यात ओवलेले नावीन्य, पाडगांवकरांच्या व्यक्तिमत्वाचे पूर्वी अनेकांना कदाचित न झालेले समग्र दर्शन आणि कवितांचे मनावर खोल परिणाम करणारे वाचन या सर्व गोष्टींचा अनेकांनी आवर्जून गौरवास्पद उल्लेख केला.

कार्यक्रम यशस्वी करायला अनेकांनी योगदान दिले. याद्वारे मंडळाच्या सर्व सभासदांमध्ये रूजलेली संघटीत भावना अनुभवास आली! सर्वांचे अनेक आभार...!

- स्मिता अंबिके 



























संक्रांत हळदी कुंकू

महाराष्ट्रात संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना तिळगुळ देऊन "तिळगुळ घ्या गोड गोड बोला" असं म्हणण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने २१ जानेवारी २०१७ रोजी नावीन्यपूर्ण पद्धतीने हा सण साजरा केला. हेरिटेज बोर्ड सिंगापूरच्या खास विनंतीवरून ह्या वर्षीची संक्रांत इंडियन हेरिटेज सेंटर लिटील इंडिया येथे साजरी झाली. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रदर्शन करण्याची ही उत्तम संधी होती.

त्या निमित्ताने हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभाचे आयोजन केले गेले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आदिवासींचा चित्रकला प्रकार असलेल्या वारली चित्रकलेच्या कार्यशाळेचे आयोज़नही केले गेले. चारू आफळे आणि तिच्या विद्यार्थीनी आणि सख्यांनी मिळून ह्या उपक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्याकडे लहान मुलांचे बोरन्हाण या दरम्यान करतात. त्याचेही प्रात्यक्षिक दाखवले. वारली चित्रकलेचा नमुना असलेली एक फोटोफ्रेमही बनवली होती. आपण हा सण कसा साजरा करतो त्याची एक चित्रफीत सुद्धा बनवली होती. ती ह्या ठिकाणी प्रदर्शित होत होती. काही अभारतीयांचीही ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

- राजश्री लेले




















चिंगे परेड २०१७

सिंगापूरच्या संस्कृतीमध्ये सामील होण्याच्या हेतूने ह्या वर्षी पहिल्यांदाच ममसिंने चिंगे परेडसारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये भाग घेतला .

परेडच्या 'We Care Banners' ह्या विभागात ममसिंचे कलाकार श्रीरंग केळकर, आरती बारटक्के आणि अपर्णा पाटील ह्यांनी सुंदर बॅनर्स करून पाठवले. शुभेन फणसे, सदानंद राजवाडे व भूषण गोरे हे ममसिंच्या वतीने हे बॅनर्स घेऊन परेडमध्ये सामील झाले. तसेच ९ लहान मुलांसह ५० जणांच्या चमूने 'Rasa sayang' ह्या गाण्यावर पारंपरिक पोशाख व फेटे घालून नृत्य सादर केले. नमिता किंजवडेकर हिने नृत्य दिग्दर्शन केले होते. ममसिंच्या सहभागाचे सर्वांकडूनच भरपूर कौतुक करण्यात आले. 

ममसिंला सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष डॉ. टोनी तान यांच्याकडून त्यांच्या इस्ताना या निवासस्थानी कौतुक समारंभासाठी आमंत्रण आले ही ममसिंसाठी फार अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे.

- अस्मिता तडवळकर 



























वार्षिक सर्वसाधारण सभा

रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा GIIS Queenstown येथे आयोजित करण्यात आली होती. दुपारी १ वाजता सह्भोजनाने सुरु झालेला हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालला. मावळत्या कमिटीचे सेक्रेटरी विशाल पेंढारकर यांनी मागील वर्षाच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. नलिनी थिटे यांनी सभागृहासमोर २०१६ चा ताळेबंद ठेवला.अध्यक्ष अस्मिता तडवळकर ह्यांनी मावळत्या कार्यकारिणी समितीमधील सर्व सदस्यांचे तसेच मंडळाच्या सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

२०१७-१८ ह्या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड झाली. ह्या वर्षीदेखील अध्यक्ष हे पद अस्मिता तडवळकर ह्या भूषवणार आहेत. नूतन अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून नवीन वर्षात अनेक उत्तम कार्यक्रम करण्याचे आश्वासन दिले.

- श्यामल भाटे




आगामी कार्यक्रम


२ एप्रिल २०१७ - गुढी पाडवा

७ एप्रिल २०१७ – Indian Cultural Fiesta

८ एप्रिल २०१७ - SIFAS ला गाण्याचा कार्यक्रम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा