आयुर्वेदिक प्रथमोपचार

हल्ली आपल्याला सर्व वयोगटांमध्ये म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत Health consciousness दिसून येतो. आपण आजारी पडू नये, आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी सर्वांचीच धडपड चालू असते. या अनुषंगाने आपली आदर्श दिनचर्या कशी असावी?, दोषानुरुप आहारविहार, विरुध्द आहार, षड्रसयुक्त संतुलित आहार, स्थूलता, नेत्रांचे आरोग्य, स्वास्थ्य (health)म्हणजे नक्की काय?, Detoxification याचा आपण विस्ताराने विचार केलेलाच आहे. 

आहार,विहार आणि विचार याचं योग्य संतुलन राखून स्वस्थ (निरोगी) राहाण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही कधीतरी क्षुल्लक आजार किंवा शारीरिक दुखण्यांना आपल्याला तोंड द्यावचं लागतं, आणि त्यात जर लहान मुलं आजारी पडली तर सारं घरचं चिंताग्रस्त होतं. अशावेळी डाॅक्टरची appointment मिळून योग्य उपचार सुरु व्हायला थोडा वेळचं लागतो किंवा कधी कधी लक्षणं इतकी साधी असतात की काही घरगुती उपचारांनीही आपण त्यांवर सहज मात करु शकतो. तेव्हा डाॅक्टरकडे जाऊन योग्य उपचार सुरु होईपर्यंतचा काळ सुसह्य व्हावा म्हणून काही लक्षणांवरील घरगुती उपचार! 

१) सर्दी, खोकला (cold, cough) 

-गरम पाण्यात किंचीत मीठ व हळद घालून गुळण्या कराव्यात. 

- सितोपलादी चूर्ण, ज्येष्ठमध चूर्ण व वासा चूर्ण समप्रमाणात मधात एकत्र करुन वारंवार चाटवावे. 

- तुळशीची पाने (५-६)+ ज्येष्ठमधाची पावडर १ चमचा + हळद १/२ चमचा + सुंठ/आलं १/२ चमचा + मिरी ( ४-५ )यांत चार भांडी पाणी घालून एक भांड पाणी राहीपर्यंत उकळावे व नंतर गाळून हा काढा पिण्यास द्यावा. 

- भाजलेल्या लवंगाचे चूर्ण मधातून चाटवावे. 

- दूध + हळद किंवा गरम दुधात मिरपूड व खडीसाखर घालून दिवसातून दोनदा द्यावे. 

- लहान मुलांच्या छातीला तेल लावून शेकल्याने कफ पातळ व्हायला मदत होते.

२) आवाज बसणे (Hoarsness of voice) 

- दूध चांगले गरम करुन त्यात १/२ चमचा हळद घालून ते प्यावे.

- हळद, गूळ व किंचित मीठ एकत्र करुन त्याची गोळी तयार करावी व गरम पाण्याबरोबर दिवसातून ३ वेळा घ्यावी.

- काळ्या मनुका व खडीसाखर चघळावी.

- ज्येष्ठमधाचा काढा करुन तो कोमट असताना त्यात तूप घालून प्यावे.

३) बद्धकोष्टता (constipation) 

- भरपूर पाणी प्यावे.

- दूध + तूप एकत्र करुन रात्री घ्यावे. 

- ८/१० काळ्या मनुका दिवसा पाण्यात भिजत घालून रात्री चावून खाव्यात. 

- १ चमचा त्रिफळा चूर्ण किंवा १ चमचा इसबगोल रात्री गरम पाण्यातून घ्यावे. 

- जेवणात वरण, आमटी, पालेभाज्या , high fibre diet चा भरपूर समावेश करावा.

४) अतिसार/ जुलाब ( Diarrhoea)-

- लिंबाचा रस + साखर + जायफळ चूर्ण एकत्र करुन वारंवार चाखावे.

- मीठ व जिरेपूड घालून ताक प्यावे. 

- कोरी काॅफी प्यावी (kopi- o)

- सुंठ + सैंधा नमक + गूळ एकत्र करुन घ्यावे. 

- आवळ्याची पावडर + लिंबाचा रस चाटण घ्यावे. 

- जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होऊन dehydration होऊ नये म्हणून पाणी + मीठ + साखर यांचे मिश्रण (O.R.S) वारंवार घ्यावे. 

५) अपचन (Indigestion) -

- आलं किसून + लिंबू रस + किंचित साखर / मीठ हे पाचक वरचेवर घ्यावे.

- ताक हिंग व जिरेपूड घालून प्यावे. 

६) अंगावर पित्त उठणे (Urticaria) -

- पित्त उठत असेल तिथे आमसूल चोळावे किंवा आमसूलाचे पाणी लावावे. 

- १/४ चमचा ओवा गरमपाण्यातून दोनदा घ्यावा. 

- गुलकंद घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होते. 

७) डोकेदुखी ( Headache ) - 

- भरपूर पाणी प्यावे.

- डोक्याला तेल लावून हलक्या हाताने मालीश करावी. 

- वाफारा घ्यावा. 

- सुंठ किंवा दालचिनी पावडर आल्याच्या रसात पेस्ट करुन किंवा आलं किसून त्याचा लेप कपाळावर करावा.

- कलिंगडाचा रस (१ ग्लास) + साखर (१ चमचा) किंवा दुधात दालचिनी पावडर घालून प्यावे. 

८) तोंड येणे (Mouth ulcer) -

- तूळशीचं बी दुधातून किंवा आरारोट (तवकील) ची खीर घ्यावी. 

- तोंड आलेल्या ठिकाणी तूप/ दुधाची साय / आरारोट किंवा ग्लिसरीन लावावे. 

- आंबट ताकाच्या गुळण्या कराव्यात.

- तिळतेल तोंडात धरुन ठेवावे. (गंडूष) oil pulling 

बरेच वेळा याचे मुख्य कारण पोट साफ नसणे हे असते तेव्हा त्यासाठी वर दिलेले उपाय करावेत. 

९) डोळ्यांची आग होणे (Sore eyes)

- कोमट पाण्यानी किंवा त्रिफळा काढ्याने डोळे धूवावेत. 

- दुधाच्या किंवा गुलाब पाण्याच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

- धणे ठेचून रुमालात त्याची पुरचुंडी बांधावी व ही पुरचुंडी पाण्यात ठेवून वरचेवर डोळ्यावर ठेवावी. 

- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गुलकंद, मोरावळा, तुळशीचं बी, तवकीलाची खीर घ्यावी. तसेच पादाभ्यंग (तळपायाला मालीश) करावे.

१०) दातदुखी/ हिरड्यांमधून रक्तस्राव (Toothache/ bleeding gums) -

- मिठाच्या पाण्याने किंवा त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. 

- नीमच्या (कडूलिंब) पानांची पेस्ट करुन हिरड्या व दातांवर ५ मिनिटे लावून हलक्या हाताने मसाज करावा व नंतर १५ मिनीटांनी गरम पाण्याने तोंड धूवावे. 

- कोरफडीचा रस हिरड्यांवर लावून १५ मिनीटांनी पाण्याने गुळण्या कराव्या. 

- लवंग/ लवंगाचे तेल दात दुखत असेल तिथे लावावे. 

११) भाजणे (Minor bourn)- 

- भाजलेला भाग पाण्यानी धुवावा (Rinse)

- भाजलेल्या भागावर direct बर्फ लावू नये.

- कोरफडीचा रस/ चंदनाची पावडर तुपातून किंवा खोबरेल तेलात हळद (१ चमचा) + मोहरीचे तेल (१ चमचा) एकत्र करुन भाजलेल्या भागावर लावावे.

१२) खरचटणे (Bruises) -

- प्रथम cold pack व २/३ तासांनंतर hot pack लावावा.

- लसूण पेस्ट (३ चमचे ) + किसलेला कांदा (३ चमचे) + हळद (३ चमचे) + मोहरीचे तेल (३-४ मोठे चमचे) एकत्र करुन याचा लेप करावा ( पोटीस बांधावे).

-पालकाच्या पानांची पेस्ट २० मिनिटे खरचटलेल्या भागावर लावून नंतर पाण्याने धुवावे.

१३) लहान मुले gases मुळे पोट दुखून खूप रडतात. 

- तेलाने मालीश करुन पोट शेकावे. 

- पोटावर हिंगाचा लेप करावा. 

- ओवा + शोप + धणे + खडीसाखर याचा पाण्यात काढा करुन तो द्यावा.

१४) तारुण्यपिटीका (pimples) - 

- हळद व चंदनाच्या पावडरची गुलाबपाण्यात पेस्ट करुन त्याचा लेप लावावा. 

- कोरफडीचा रस पोटातून घ्यावा.

- नीम कॅपसूल किंवा चूर्ण अंशपोटी पाण्याबरोबर घ्यावी. 


वरील सर्व उपचार हे प्राथमिक स्वरुपाचे (प्रथमोपचार) आहेत. तेव्हा हे उपचार करुनही बरे न वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

- डाॅ. रुपाली गोंधळेकर
M.D. (A.M.) B.A.M.S

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा