स्वातंत्र्य - My Space

‘मॉम तू माझ्या कपाटाला का हात लावलास’?
मनूने आपल्या आईला विचारले. ‘अगं बाळा, असे काय करतेस? मी ते आवरून ठेवले. किती पसारा करून ठेवला होतास तो’ ?

‘काहीतरी काय, मी सगळे मला easily मिळेल असे ठेवले होते. मॉम तू माझ्या कपाटाला यापुढे हात लावत जाऊ नकोस. ती माझी space आहे, मला हवे तसे मी ठेवेन’. आईने कपाळाला हात लावला व ती आपल्या कामात गर्क झाली. मनात विचार आला कसली space हवी आहे सातवीतल्या आपल्या मुलीला? आपण आजही आपली स्पेस असा विचार करत नाही. पण खरंच आपल्यालाही असे कधीतरी वाटते का ?
असे छोटे छोटे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जीवनात येत असतातच. कधी ते मजेशीर असतात तर कधी ते गंभीर प्रश्न होतात.
स्वातंत्र्य म्हटले की प्रथम आठवतो तो आपला स्वातंत्र्य संग्राम, ज्याच्यासाठी लोकांनी आपल्या घरादाराची होळी केली. हे सगळे कुठल्याही स्वार्थासाठी नसून आपल्या देशाला आणि देशवासियांना पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी होते. आज आपल्याला त्या बलिदानाचे तितके महत्त्व राहिले आहे का? की आता ह्या कथा फक्त पाठ्य पुस्तकापर्यंतच मर्यादित राहिल्या आहेत?

बदलत्या काळानुसार स्वातंत्र्याचा अर्थही बदलत आहे. आज स्वातंत्र्य म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करणे. स्वातंत्र्याची व्याप्ती इतकी वाढली आहे की आई वडीलही मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना आपले मत द्यावे की न द्यावे याचा विचार करतात.

मुळात स्वातंत्र्य म्हणजे तरी काय तर आपल्याला जे करावेसे वाटते ते करता येणे. पण आपण एक विसरतो की त्या स्वातंत्र्याचा दुसऱ्याला त्रास होता काम नये हे सुद्धा महत्त्वाचे आहे, नाही का? आजकाल आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत खूप जागरूक झालो आहोत पण आपण आपल्याच घरातील कितीजणांना गृहीत धरतो याची आपल्याला जाणीवही नसते. अगदी आपल्या आईचेच उदाहरण घ्या ना. ती सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवून त्याप्रमाणे सगळे करत असते पण कित्येक वेळा घरातील कितीजणांना तिला काय आवडते हे माहीत असते? मग तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे काय? आज घरे मोठी झाली आहेत पण माणसे एकमेकांपासून दूर झाली आहेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा घरे लहान होती तेव्हा माणसे जवळ होती आणि आई वडीलच काय काका, मामा, शेजारी पाजारी घरात काम करणाऱ्या मावशीसुद्धा आपल्याला चार उपदेशाच्या गोष्टी सांगायचे आणि आपण त्याचे वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नसायचे.
आई वडील मुलांसाठी कितीतरी त्याग करतात. स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवतात पण तीच मुले मोठी झाल्यावर आपल्याला कोणाचे बंधन नको म्हणून या आई वडिलांना एकतर वृद्धाश्रमात तरी टाकतात किंवा दूर देशी भौतिक सुखामागे निघून जातात. खरंच या सगळ्याची गरज आहे का? की आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ शोधण्याची गरज आहे?

आज ग्लोबलायझेशन हा परवलीचा शब्द झाला आहे. आपण जगात कुठेही शिक्षणासाठी, नोकरीसाठी जाऊ लागलो आहोत. आपणच नाही का सिंगापूरला आलो आहोत.
म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार स्वातंत्र्याचा अर्थही बदलला आहे.
फक्त स्वातंत्र्य म्हणजे एकमेकांपासून लांब न जाता जवळ कसे येता येईल ते बघितले पाहिजे.

- अनुराधा मिलिंद साळोखे






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा