SG 50 - सिंगापूरचा राष्ट्रीय दिवस

९ ऑगस्ट १९६५ ला सिंगापूर मलेशियापासून वेगळं झालं आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून सिंगापूरची वाटचाल सुरु झाली. तेव्हापासून दरवर्षी ९ ऑगस्टला सिंगापूरचा राष्ट्रीय दिवस Padang किंवा नॅशनल स्टेडियममध्ये धूमधडाक्यात साजरा होतो.

१० वर्षांपूर्वी माझा मोठा मुलगा परेड बघून आला. पाठोपाठ धाकटया मुलानी पण हजेरी लावली. नंतर बरेच दिवस मुलं परेडचं उत्साहानं वर्णन करत असत. तेव्हापासून मला पण परेड बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. दर वर्षी प्रयत्न करायचे पण यश येईना. ह्या वर्षी तर सिंगापूरचा ५०वा वाढदिवस! नॅशनल डे परेड खूपच भव्य होणार अशी बातमी होती. तिकीट नाही याचं खूपच वाईट वाटत होतं आणि अचानक परेडच्या चार दिवस आधी एका मैत्रिणीचा फोन आला. दुसऱ्या दिवशी माझ्या हातात तिकीट आलं! मग काय? एवढी वर्षं प्रयत्न केला आणि ५०वी परेड बघायला मिळणार! खरंच वाटत नव्हतं. १०-१२ वर्षांची तपस्या पूर्ण झाली.

आणि एकदाचा परेडचा दिवस उजाडला. ४ वाजता MRT नी City Hall स्टेशनला पोचले. ही तोबा गर्दी! माझ्यासारखे हजारो उत्साही लोक Padang च्या दिशेने जात होते. लाल कपडे, हातात झेंडा, पिपाणी, banners… काहीतरी हातात होतंच. Padang ला आधी सेक्युरीटी चेक झाला. मग सगळ्यांना goody bag मिळाली. सिंगापूरची टोपी, स्कार्फ, पिण्यासाठी पाणी, थोडे snacks - बरंच काही होतं goody bag मध्ये. Padang च्या ग्राउंडवर बांधलेलं temporary स्टेडियम खचाखच भरलं होतं. Padang च्या एका बाजूला जुनं City Hall, High Court पण सिंगापूरच्या झेंड्यांनी सजवलं होतं. सगळीकडे उत्सवाचं वातावरण होतं.

परेड वेळेवर ५:३० ला सुरु झाली. पहिला कार्यक्रम होता Red Lions Parachutists. Parachutists नी उत्साही प्रेक्षकांच्या पुढ्यात उतरत दमदार एन्ट्री घेतली आणि celebrations ची सुरुवात तर जबरदस्त झाली. त्यानंतर या वर्षीच्या मार्चमध्ये दिवंगत झालेले सिंगापुरचे संस्थापक श्री ली क्वान यू यांना श्रद्धांजली. त्यांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा पडद्यावर दाखवण्यात आला. या लाल ठिपक्याला जगाच्या नकाशावर नेवून बसवणाऱ्या या महान नेत्यासाठी एका मिनिटाची शांतता पाळताना वातावरण गंभीर झालं. मग Majulah Singapura हे राष्ट्रगीत सादर झालं. त्यानंतर प्रेक्षकांनी Madam Haliman Yakub - Speaker यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. मग military band नी जोरकस परफॉर्मन्स दिला आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. तो तीन भागात होता.

पहिल्याचं नाव होतं Beginning.

त्यात सिंगापूर किंवा पूर्वी ते ज्या नावानं ओळखलं जायचं त्या Temasek चा इतिहास दाखवण्यात आला. ह्या बेटाचा शोध कसा लागला, ब्रिटिशांचं आगमन, ह्या बेटाचा बंदर आणि ब्रिटीश वसाहत म्हणून विकास या टप्प्यांचा वेध घेतला गेला. खूप रंगीबेरंगी असा हा कार्यक्रम होता. मग झाली Vintage Parade - पायोनियर जनरेशनने ह्या राष्ट्राच्या उभारणीसाठी केलेल्या कामाचा ऋणनिर्देश करण्यासाठी. त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ज्या स्ट्रीट परेड्स व्हायच्या त्यांच्यातले सैन्य, पोलीस, आणि सिविल डिफेन्स तसेच POS Bank, PUB, HDB, NTUC, SIA इत्यादी संस्थांचे पोशाख ह्या भागात सादर झालेल्या परेडमध्ये बघायला मिळाले. त्यापाठोपाठ Padang मध्ये पायोनियर जनरेशनची कवायत झाली - त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक होताना पाहून त्यांचे चेहरे अभिमानानं आणि आनंदानं उजळून आले!

दुसरा भाग होता Progress

सिंगापूरनं सैनिकी आणि सुरक्षा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा ह्या भागात घेतला गेला. सर्वप्रथम सिंगापूरच्या सैनिकी विभागांनी State Flag Flypast सादर केलं. मग Black Knights नी पंचतारांकित flypast tribute सादर केली. त्यामागोमाग सादर झाली "५०" ही रचना, आकाशातली बॉम्बस्फोट आणि हेलिकॉप्टर्सची बाणाची रचना, Black Knights ची जवळजवळ सरळ उभी भरारी, combat turn आणि flat burst रचना. ह्या सर्व आकाशातल्या धाडसी रचना सगळ्यांनी श्वास रोखून पाहिल्या आणि थक्क झाले. प्रत्येक सादरीकरणानंतर कौतुकाचा वर्षाव आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. सन्माननीय पाहुणेही परेड पहात आणि प्रेक्षकांना प्रोत्साहन देत गेले. अधूनमधून सिंगापूरचे स्थानिक कलाकार जुनी देशभक्तीपर गाणी सादर करत होते. किट चॅन, स्टेफनी सन ह्यांनी जुनी गाणी गाऊन आठवणींना उजाळा दिला. सगळे प्रेक्षकही त्यांच्याबरोबर उत्साहानी गात होते. जे. जे. अननी सादर केलेल्या ह्या वर्षीच्या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.

तिसरा भाग: आतिषबाजी

खाण्याशी सिंगापूरचं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं आहे. आइस-कचांग, चिली-क्रॅब हे तर जगप्रसिद्ध आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे त्यांची भली मोठी निऑन चित्रं आली. त्यापाठोपाठ आले "lah" आणि "leh" ज्याशिवाय एकही सिंग्लिश वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. प्रेक्षकांना ह्याची खूप गंमत वाटली. आता कार्यक्रम जवळजवळ संपत आला होता आणि सगळे आतिषबाजीची उत्सुकतेनं वाट पाहत होते आणि त्यांची निराशा झाली नाही. आतिषबाजी भव्य दिव्य होती. असं वाटत होतं की सिंगापूरला ५०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला लाखो तारा उतरून आल्या आहेत. ह्या नेत्रदीपक क्षणावर सिंगापूरची ५०वी NDP संपली. मी Padang मधनं बाहेर पडले तेव्हा एकच गोष्ट मनात होती - "माजुला सिंगापुरा. This is home."

- प्रियदर्शिनी म्हैसाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा