SG50

१३व्या शतकात वसवलेली तेमासेक किंवा सिंगापुरा ही बंदरवजा वसाहत हिंदी महासागर आणि दक्षिण चीनी समुद्र यांच्या मधील जलव्यापारासाठीची महत्त्वाची प्रादेशिक बाजारपेठ झाली होती. त्या आधी ह्या वसाहतीनं अनेक स्थानिक आणि युरोपीय वादांना तोंड दिलं आणि इंग्रजांनी इथे त्यांचं वास्तव्य केल्यावर मग ही बंदर वसाहत स्थापित झाली. प्रादेशिक व्यापारकेंद्र झाल्यामुळे व्यापार-उदीम, नोकरी-धंदा, आणि मग राहण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वाचे लोक त्याकडे आकर्षित झाले.

सिंगापूर मधल्या रहिवाशांची युद्धानंतरची पहिली जनगणना १९४७ साली करण्यात आली. त्यात ९,४०,८२४ लोकसंख्येची नोंद झाली. तिच्यात ७५.२% चीनी, १२.९% मलेशियन, ७.७% भारतीय, १.३% युरेशियन आणि २.९% युरोप आणि इतर ठिकाणचे लोक होते. हे वांशिक वैविध्य साधारण त्याच प्रमाणात आजच्या आधुनिक सिंगापुरातही दिसतं. अशा प्रकारची सांस्कृतिक व्यामिश्रता आणि वैविध्य असल्यामुळे सिंगापूर सामाजिक आणि वांशिक सलोख्यावर फार भर देते. त्यामुळेच इथे राष्ट्रीय ओळख आणि वैचारिक बैठक असण्याची गरज भासली. मग १९९१ मध्ये सिंगापूरच्या संसदेनी सर्व वांशिक, धार्मिक गटांना मान्य होतील अशी पाच विधानं समान मूल्ये म्हणून निवडली. या सामायिक मूल्यांना बैठक होती ती सिंगापूरच्या समुदयप्रधान मूल्यांच्या वारश्याची. ती मूल्यं अशी:

१. समुदायाआधी राष्ट्र आणि स्वत:आधी समाज
२. कुटुंब हा समाजाचा मुलभूत घटक
३. सामुदायिक सहकार्य आणि व्यक्तीचा आदर 
४. संघर्ष नव्हे, एकमत 
५. वांशिक आणि धार्मिक सुसंवाद 

१९६५ मध्ये सिंगापूर स्वतंत्र झालं तेव्हा त्याची लोकसंख्या १९,००,००० होती. २०१५ च्या मध्यवार्षिक आकडेवारीनुसार लोकसंख्या आता ५५,००,००० वर पोचली आहे - ५० वर्षात तिप्पट वाढ! सिंगापूरच्या लोकसंख्या वाढीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे या बेटावर वाढलेली स्थलांतरित लोकसंख्या. १९७० मध्ये ९७% लोक सिंगापूरचे रहिवासी होते. २०१४ मध्ये तो आकडा ७०% होता.

सिंगापूरच्या रहिवाश्यांबरोबरच या स्थलांतरित लोकांनीही सिंगापूरच्या आर्थिक भरभराटीला साहाय्य केलं आहे. दर डोई वार्षिक सकल उत्पन्नात झालेल्या वाढीतून सिंगापूरचं यश पाहता येतं. १९६५ मध्ये १६५ तर २०१३ मध्ये ५५,१८५ अमेरिकी डॉलर्स. ह्यामुळे सिंगापूर जगातल्या पहिल्या १० अर्थव्यवस्थांमध्ये जाऊन बसलं आहे आणि ते ही अवघ्या ५० वर्षात!

ही आर्थिक भरभराट सिंगापूरच्या रहिवाश्यांकरता संधी तसेच आव्हानंही घेऊन आली आहे. हा वाढीचा वेग राखायचा तर वाढीव मनुष्यबळ हवं किंवा उत्पादनक्षमतेत लक्षवेधी सुधारणा हवी. जानेवारी २०१३ मधील एका शोधनिबंधात सिंगापूरची लोकसंख्या २०३० पर्यंत ६९,००,००० वर जाईल असं भाकित केलेलं आहे. एकसंध समाज, चैतन्यवती अर्थव्यवस्था, उच्च दर्जाचे राहणीमान या तीन पायाभूत गोष्टींनी २०३० पर्यंतची लोकसंख्येमधली ही वाढ पेलता येईल. लोकसंख्याविषयक धोरणावरच्या शोधनिबंधानी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील कोंडी, परवडण्याजोगी घरे, पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, आणि राहणीमानाच्या दर्जातील घसरण अश्या महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्याच्या क्षमतेविषयी गंभीर वादविवाद सुरु केला.

५० वे स्वातंत्र्यवर्ष सिंगापूरकरता महत्त्वपूर्ण ठरू शकते. पुढच्या ५० वर्षात सिंगापूरमध्ये पाचात एक जण ६५ वर्षापेक्षा जास्त वयाचा असणार आहे. सर्वसाधारण आयुर्मान १९६५ पासून २० वर्षांनी वाढून २०१३ मध्ये ८२.५ वर पोचले आहे आणि ह्या पुढे ते वाढतच जाईल. सिंगापूरच्या लोकांच्या गरजा आजच्या पेक्षा खूप वेगळ्या असतील. सिंगापूर कसे बदलेल हे फक्त काळच सांगू शकेल.

- सतीश लेले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा