“The Matrix Revolutions”

१९९९ साली कीअॅनु रीव्जचा “The Matrix” चित्रपट प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला. या चित्रपटाच्या यशानंतर त्याचे लागोपाठ दोन सिक्वेल्स (द मॅट्रिक्स रीलोडेड आणि द मॅट्रिक्स रेवोल्युशन्स) २००३ साली प्रदर्शित झाले आणि अपेक्षेप्रमाणेच अनेक पुरस्कार पटकावून गेले.

चित्रपटाची रूपरेषा साधारणपणे अशी – Matrix या शब्दाचा अर्थ आहे “माया”! आपण ज्या जगात राहतो ते जगच मुळी भासमयी (hallucinatory) आहे. थॉमस अँडरसन उर्फ निओ (कीअॅनु रीव्ज) हा या भासमयी जगातला एक कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आहे. या जगात काहीतरी चुकीचे आहे याची त्याला जाणीव आहे; पण काय ते नक्की माहिती नाही. त्याची गाठ मॉरफियसशी पडते जो त्याला हे जग मृगजळ आहे हे विशद करतो. अगदी जन्मापासून आपण या काल्पनिक जगतामध्ये (programmed world) बद्ध होऊन पडलो आहोत, हे आभासी जग एक matrix आहे; या जगाचा भ्रम (mirage) दूर झाल्यास आपण या जगाचे भौतिक नियम (ज्यांच्यावर हे जग आधारलेले आहे) सहज झुगारून देऊ शकतो, हे सांगतो.

मॉरफियसची खात्री आहे की निओ हा The One आहे जो मशीन आणि माणसाच्या लढ्यातील मशीनचा हस्तक एजंट स्मिथवर मात करू शकेल. चित्रपटाच्या शेवटी निओला जगाच्या मुळाशी असणारा प्रोग्रॅम दिसतो आणि तो matrix चा ताबा घेतो. पुढील दोन सिक्वेल्समध्ये हीच रूपरेषा स्पेशल इफेक्ट्स वापरून अधिक ठळक करण्यात आली.

एव्हाना वाचकांना प्रश्न पडला असेल की बिचारा लेखक स्वतःच मायाजालात अडकून भरकटत चालला आहे की काय? अंकाचा विषय आणि चित्रपट यांचा काय संबंध?

या प्रश्नाचे उत्तर आहे “द मॅट्रिक्स रेवोल्युशन्स” या चित्रपटाचा साउंडट्रॅक. चित्रपटाच्या शेवटी निओ आणि ‘एजंट’ची तुंबळ मारामारी होते. या मारामारीदरम्यान कोरसमध्ये Neodämmerung नावाचा एक साउंडट्रॅक गायला जातो. अमेरिकन कंपोजर डॉन डेविस याने हा ऑर्केस्ट्रा कंपोझ केला आहे आणि जुनो रीअॅक्टर या ग्रुपने तो गायला आहे. हा साउंडट्रॅक अतिशय गाजला. या चित्रपटाच्या संगीतासाठी डॉन डेविसला २००४ सालचा बीएमआय फिल्म म्युझिक पुरस्कारदेखील मिळाला.

या जर्मन ऑर्केस्ट्राचे बोल आहेत “असतो मा सद्गमय....” काय वाचकहो, चकित झालात ना ! या श्लोकांबरोबर इशा, मुंडक आणि कथा उपनिषदांमधील काही श्लोकही गायले आहेत. तुमच्या माहितीसाठी पूर्ण गाणे खाली दिले आहे.

बृहदारण्यकोपनिषद् - श्लोक १.३.२८
असतो मा सद्गमय - Neodammerung (line 1)
असतो मा सद्गमय - Neodammerung (line 2)
तमसो मा ज्योतिर्गमय - Neodammerung (line 3)
मृत्योर्मामृतं गमय॥ - Neodammerung (line 4)

ईशोपनिषद् - श्लोक ११
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह - Neodammerung (line 5)
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥ - Neodammerung (line 6)

मुंडकोपनिषद् - श्लोक २.२.५
यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षमोतं - Neodammerung (line 7)
मनः सह प्राणैश्च सर्वैः - Neodammerung (line 8)
तमेवैकं जानथ आत्मानमन्या वाचो - Neodammerung (line 9)
विमुञ्चथामृतस्यैष सेतुः॥ - Neodammerung (line 10)

कठोपनिषद् - श्लोक ६.७
इन्द्रियेभ्यः परं मनो मनसः सत्त्वमुत्तमम् - Neodammerung (line 11)
सत्त्वादधि महानात्मा महतोऽव्यक्तमुत्तमम् - Neodammerung (line 12)

कठोपनिषद् - श्लोक ६.१०
यदा पञ्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह - Neodammerung (line 13)
बुद्धिश्च न विचेष्टते तामाहुः परमां गतिम्॥ - Neodammerung (line 14)

१५ व्या ओळीत या या या या यदा यदा यदा यदा असा आलाप आहे.

मुंडकोपनिषद् - श्लोक २.२.८
भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः - Neodammerung (line 16)
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे - Neodammerung (line 17)

(आपल्या अंतस्थ आत्म्याचे दर्शन झाल्यावर त्याचे सर्व संशय गळून पडले आहेत; आणि तो कर्मबंधनातून मुक्त झाला आहे) – इथे त्या मारामारीचा चरमोत्कर्ष येतो - ज्यात निओ त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करतो.

इतकेच नव्हे तर चित्रपट संपल्यावर श्रेयनामावली येते तेव्हा “नवरस” नावाचा एक ऑर्केस्ट्रा गायला जातो; त्यातही वरील सर्व श्लोक येतात आणि भारतीय रागदारी ऐकू येते (मी काही त्यातला तज्ञ नाही).

वाचकांच्या सोयीसाठी youtube ची लिंक खाली दिली आहे. या लिंकवर गाण्याचे शब्द देखील आहेत. हे गाणे जरूर पहा किंवा ऐका.

https://www.youtube.com/watch?v=HHN7DTFxQ50

अथवा खाली दिलेल्या लिंकवर गाण्यासहित शेवटची मारामारी बघता येईल पण यात गीत नाही.

https://www.youtube.com/watch?v=7li9SG7zebU

लिंक न उघडल्यास क्षमस्व. मग youtube वर “matrix Neodammerung with lyrics” अथवा “The Final Fight - Neo vs Smith - mix with Matrix Revolutions soundtrack's song 'Navras' असे टाईप करा.

पाश्चात्य दिग्दर्शकांना भारतीय तत्त्वज्ञानाची किती भुरळ पडली आहे याचे हा लेख म्हणजे एक छोटेसे उदाहरण समजावा !








राजीव खरे



४ टिप्पण्या:

  1. राजीव, भारतीय विचारधारा संपूर्ण सृष्टी म्हणजेच प्रकृति व पुरुष ह्यांना समावेश करून बनलेली आहे याची उकाल काही अंशी या तीन अंकी चित्रपट मालिकेत फारच कौतुकास्पदरित्या झाला आहे.
    तुमची पोस्ट छान जमली आहे.

    उत्तर द्याहटवा