आरोग्यम् धनसंपदा- “स्वास्थ्य”

“There is more to health than just fitness !”

आजकाल सगळीकडे फिटनेसची क्रेझ दिसून येते पण फिट म्हणजे नक्की काय? फिगर मेंटेन करणं ? BMI सांभाळणं की मॅरेथॉनमध्ये धावणं? बरं केवळ फिगर मेंटेन करुन वरचेवर आजारी पडत असू तर आपण फिट आहोत असं म्हणता येईल का?

WHO नी Health (स्वास्थ्य) ची व्याख्या अशी केली आहे, Health is a state of complete physical, mental and social well being and not merely the absence of disease or infirmity.

रोगाचा अभाव म्हणजे स्वास्थ्य (Health) नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या समाधान देणार, उत्साहित करणारे, हवेहवेसे वाटणारे जीवन म्हणजे स्वास्थ्य!

आपल्या इथे आयुर्वेदाने जवळजवळ ५००० वर्षांपूर्वीच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काही साधी सोपी लक्षणं सांगितली आहेत.

१. योग्य वेळी उत्तम भूक लागून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे.

२. मल, मूत्र प्रवृती योग्य वेळी योग्य स्वरुपात काहीही त्रास न होता होणे.

३. योग्य वेळी शांत, गाढ झोप लागून सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणे.

४. शरीरात आळस, सुस्ती न राहता उत्साह आणि हलकेपणा वाटणे.

५. शरीरबल वाढणे व शरीराचा वर्ण तेजस्वी असणे.

६. मनामध्ये रज-तम दोषांपासून उद्भवणारे दुर्विकार न येता मन प्रसन्न असणे.

अशाप्रकारे आयुर्वेदामध्ये आरोग्याचं मोजमाप हे केवळ इंच आणि किलोग्राम मध्ये न करता त्याच्या गुणवत्तेवर केलेलं आहे. आता तुम्हीच पडताळा करुन पहा की आपण ह्या सर्व वर्णनाप्रमाणे खरोखर स्वस्थ आहोत का?

Fit (स्वस्थ) राहाण्याचा साधा सोपा उपाय म्हणजे मागच्या लेखांमध्ये वर्णन केलेल्या आदर्श दिनचर्येचे (Ideal daily routine) तसेच दोषानुरुप आहाराचे पालन करावे.

आदर्श दिनचर्या

दोषानुरुप आहारविचार

BMI / फिटनेस/ वजन/ फिगर मेंटेन या सर्वांबद्दलची जाणीव इतकी वाढण्याचे कारण म्हणजे स्थूलता (obesity) आजकालचा आपला आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक रोगांना आमंत्रण दिलं जातं. अशा Lifestyle Diseases मधे गणला जाणारा महत्वाचा आणि सर्व वयोगटांमध्ये दिसून येणारा हा आजार/लक्षणं आहे.

स्थूलता (obesity)
आपलं शरीर हे सात धातूंनी बनलेलं असतं. (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) यांतील मेद धातू (fat) मध्यवर्ती धातू असल्याने आपल्या शरीराचं संतुलन सांभाळतो व पुढील अस्थि, मज्जा, शुक्र धातूंचे पोषण करतो. पण जेव्हा हा मेद धातू प्रमाणाबाहेर वाढतो तेव्हा इतर धातूंचे नीट पोषण होत नाही व पुढील लक्षणं दिसून येतात-

१. शरीरात जास्त प्रमाणात पोट, नितंब, मान, गळा, मांड्या इत्यादी अवयवांवर चरबी साठणे.

२. थोड्याश्या श्रमाने (थोडसं चाललं किंवा जीना चढला) धाप लागणे.

३. कोणतेही काम करण्यास उत्साह वाटत नाही, थकवा जाणवतो.

४. अति तहान व अति भूक लागणे.

५. अत्याधिक घाम येणे.

६. Blood pressure, Diabetes, Cholesterol, Heart Diseases, Arthritis अशा रोगांना आमंत्रण.

आपल्या सगळ्यांनाच BMI आणि waist hip ratio वरुन आपण स्थूल आहोत की नाही हे कसं ओळखायचं हे चांगलचं माहित आहे. पण वर दिलेली काही साधी सूचक लक्षणं.

स्थूलतेची कारणे-

१. अव्यायाम (व्यायाम न करणे) - आपली संपूर्ण जीवनशैलीच हल्ली बदलून गेली आहे. (Sedentary lifestyle) पूर्वी दैनंदिन व्यवहारात आपोआपच व्यायाम होत असे (उदा. धुणी-भांडी, केर काढणं, मैदानी खेळ, सायकल चालवणे किंवा चालत जाणे) परंतु हल्ली याची जागा आता यंत्रांनी, video games नी आणि वाहनांनी घेतली आहे. त्यामुळे मुद्दामून उठून Gym मध्ये किंवा jogging ला जावं लागतं.

२. दिवास्वाप - दिवसा झोपणे किंवा दुपारी जेवणानंतर झोपणे यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही व toxins ची निर्मिती होऊन मेदवृद्धि होते.

३. आहार- पचायला जड पदार्थ, गोड पदार्थ, तेलकट-तूपकट पदार्थ, पिष्टमय पदार्थ यांचे अतिमात्रेत सेवन तसेच गरजेपेक्षा अतिप्रमाणात अन्नसेवन व आवश्यकतेनुसार जास्त calories चे सेवन.

४. शारीरिक व मानसिक आजार (Hypothyroidism, PCOS, cushing’s syndrome, depression, stress )

५. काही औषधांच्या सेवनाने (steroids, anti depressant, hormonal tablets, गर्भनिरोधक गोळ्या)

६. स्त्रीयांमध्ये - गरोदरपणात , बाळांतपणानंतर, गर्भाशय निर्हरणाची शस्त्रक्रिया (Hysterectomy), रजोनिवृत्ती (menopause)

७. अनुवंशिक

स्थूलतेवर उपाय
खरतरं स्थूल लोकांनी आपली संपूर्ण जीवनशैलीच बदलणे गरजेचे आहे, वर सांगितलेली कारणे कटाक्षाने टाळावीत.

वर्ज्य / अपथ्य
खालील पदार्थांचे प्रमाणाबाहेर सेवन टाळावे.

१. अतिगोड, अतिखारट, अति तेलकट- तूपकट पदार्थ

२. पिष्टमय पदार्थ व चरबीयुक्त पदार्थ ( पिझ्झा, पास्ता, चीझ, बटर, पनीर, मांसाहार)

३. जंकफूड, फास्टफूड, कॅन्ड-पॅक्ट, प्रिझरवेटीव्हस घातलेले पदार्थ

४. अतिप्रमाणात चहा, कॉफी, शीतपेय (soft drinks)

५. दही, चॉकलेट, केक, पेस्ट्रीज, आइस्क्रीम व शीत पदार्थ

६. मैदा, ब्रेड, बिस्कीट, कुकीज, फरसाण, शेव, चीप्स, मॅगी, कुरकुरे

७. मद्यपान, धूम्रपान

८. आवश्यकतेपेक्षा अधिक calories व अधिक मात्रेत आहाराचे सेवन

९.  जेवणानंतर भरपूर पाणी पिणे

१०. दिवसा झोपणे

११. sedentary lifestyle - एका जागी बसून काम करणे ( sitting is the new smoking! )

पथ्य
१. सतत गरम पाणी प्यावे, जेवणापूर्वी पाणी प्यावे तसेच सकाळी मध कोमट पाण्यातून घ्यावा.

२. आहारात खालील पदार्थांचा समावेश करावा

३. कडू, तिखट व तुरट रसयुक्त पदार्थ

४. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जव, कुळीथ, मसूर, मूग

५. हिरव्या पालेभाज्या तसेच कोबी, फ्लॉवर, भेंडी, दूधी, कारले, मेथी, काकडी, गाजर, अश्या भाज्या भरपूर खाव्यात.

६. कलिंगड, संत्री, मोसंबी, पपई, पीच, पेअर्स अशी फळे

७. मोड आलेली कडधान्य, सलाड्स, मिश्र पिठांचे थालीपीठ, धीरडी, भरपूर कोशिंबीरी, भाज्यांचे सूप, ताक


७. तेल, मीठ व साखर याचा कमीत कमी वापर

८. आठवड्यातून एकदा लंघन / उपवास / केवळ फलाहार

९. पोटभर खाण्याऐवजी दोन घास कमी खावेत तसेच संध्याकाळी अल्पभोजन करावे.

१०. पुरेशी झोप तसेच मानसिक संतुलन

११. नियमित व्यायाम- आपल्या क्षमतेनुसार चालणे, धावणे, पोहणे, जोरबैठका, दोरीच्या उड्या, पुशप्स असा व्यायाम करावा व हळूहळू तो वाढत न्यावा.

१२. सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांगसुंदर व्यायाम. त्याचबरोबर योगासन, प्राणायाम नित्य करावे.




- डॉ. रुपाली गोंधळेकर
M.D. (A.M.), B.A.M.S.
दूरध्वनी: 81800984




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा