जिमनॅस्ट जोहाना

Image result for johanna quaas gymnast"When there is movement there is life". साधं सरळ आणि अतिशय सोपं तत्वज्ञान. हाच मंत्र त्यांनी जपला आणि आयुष्याची वाटचाल केली त्यांचं खेळाबद्दलचं प्रेम , जिद्द ,कष्ट आणि तंदुरुस्त असाल तर काहीही करू शकता यावर असलेल्या विश्वासावर त्यांनी गिनिज बुक्स ऑफ रेकॉर्ड पर्यंत मजल मारली. जगातील सर्वात वयस्क महिला जिमनॅस्ट म्हणून गिनीज बुक मध्ये त्यांच्या नावाची नोंद घेतली गेली आहे.

मिस जोहाना क़उअस, वय वर्ष ब्याण्णव. जगातील सर्वात वयस्क जिमनॅस्ट. खेळावरचं प्रेम आणि आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आजही त्या वेगवेगळ्या जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि पदकं मिळवितात. जिम्नॅस्टिक बार वरील त्यांच्या लयबध्द हालचाली एखाद्या तरुण खेळाडूलाही लाजवतील अशा असतात. दोन्ही हातांवर आपलं शरीर ,जिम्नॅस्टिक बारला समांतर तोलून धरण्याचं प्रात्यक्षिक त्या लीलया करतात. आज वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्या जगभर जेष्ठ नागरिकांसाठी प्रात्यक्षिकं करतात आणि मोलाचा सल्ला देतात, व्यायाम करा तंदुरुस्त रहा. दोन वर्षांपूर्वी राणी एलिझाबेथच्या नव्वदाव्या वाढदिवसाप्रित्यर्थ, त्यांनी विमानातून उडी मारण्याचा पराक्रमही केला. आव्हानात्मक आयुष्य जगायला त्यांना अतिशय आवडते.

जोहानांचा जन्म पूर्व जर्मनीत झाला. शाळेतल्या लहान वयातच त्यांना जिम्नॅस्टिकची आवड निर्माण झाली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी प्रथमच स्पर्धेत भाग घेतला आणि पदक पटकावलं. परंतू नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांना त्यांचं प्रशिक्षण थांबवावं लागलं आणि त्या देशाच्या बाजूने राष्ट्रलढ्यात उतरल्या. काही काळ त्यांनी शेती आणि तत्सम कामेही केली. युद्धानंतर पूर्व जर्मनीत जिम्नॅस्टिक खेळावर बंदी घातली गेली. तेव्हा त्यांनी हॅण्डबॉल सारखा सांघिक खेळ खेळायला सुरवात केली आणि त्यातही संघाला पदक मिळवून दिले. 

Related imageकालांतराने त्यांना जिम्नॅस्टिक मधील आपल्या सहकाऱ्याशी लग्न केले. आता त्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षक म्हणून काम करू लागल्या. पुन्हा आयुष्याने वळण घेतले ते वर्ष होते १९८२. वयाच्या सातावन्नाव्या वर्षी, त्यांनी आपल्या दोन जिम्नॅस्टिक सहकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा प्रशिक्षणाला सुरवात केली. तिघेही जवळपास सारख्याच वयाचे. तिघांनीही पुन्हा स्पर्धेत भाग घेतला आणि प्रादेशिक पातळीवर पदक मिळविले. आज ते दोन्ही सहकारी हयात नाहीत. मागच्याच वर्षी त्यांच्या नवऱ्याचेही निधन झाले. आयुष्यातील अभिमानास्पद क्षण सांगताना त्या म्हणतात, वयाच्या सत्याऐंशी व्या वर्षी त्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांच्या विरुद्ध खेळायला त्यांच्या वयाचा एकही प्रतिस्पर्धी खेळाडू नव्हता म्हणून त्यांना त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या स्पर्धकांबरोबर खेळावे लागले. त्याही स्पर्धेत त्यांनी पदक पटकाविले तो क्षण.

दोन नातवंडांची आजी आणि एकाची पणजी असलेल्या जोहाना ह्याही वयात दरोरोज एक तास सराव करतात. आजपर्यंत तरी त्यांनी कुठलीही औषधं किंवा पूरक जीवनसत्वे घेतलेली नाहीत. निरोगी आयुष्यासाठी दरोरोज सहा तास झोप आणि भरपूर भाज्या आणि फळे असलेला आहार त्या घेतात. जिम्नॅस्टिक व्यतिरिक्त त्यांना पोहणे, गिर्यारोहण, नृत्याची ही आवड आहे. जेष्ठ नागरिकांसाठी संदेश देताना त्या म्हणतात, तंदुरुस्त रहा हालचाल करत रहा. त्यांचा मंत्र अगदी सोपा आहे When there is movement there is life.


-अनिता पांडकर














जोहाना: फोटो सौजन्य : इंटरनेट



   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा