स्वातंत्र्य Toxins पासून ( Detoxification)

आयुर्वेदिक पंचकर्म

“आरोग्यम् धनसंपदा” च्या लेखनमालेत आत्तापर्यंत आपण रोग होऊ नयेत (prevention) म्हणून काय उपाययोजना करावी याचा विचार केला.

आजकालची आपली बदलती जीवनशैली, अयोग्य व अनियमित आहारविहार, विरुद्ध आहार, भेसळयुक्त पदार्थ, प्रदूषित हवा अशा तात्कालिक किंवा दिर्घकालीन कारणांमुळे शरीरातील दोषांचे संतुलन बिघडते, शरीरात त्याची बाधा पोहोचते व अनेक विषारी तत्व (आमदोष/toxins) निर्माण होतात. अशावेळी ही विषारी तत्वे शरीराबाहेर काढून शरीराची आतून बाहेरुन शुद्धी करणे अतिशय गरजेचे असते. यालाच Detoxification असे म्हणतात. 

हल्ली शरीरातील toxins बाहेर काढून आरोग्य प्राप्ती करण्यासाठी Detoxification बद्दल जागरुकता सगळीकडेच दिसून येते. “मला detox करायचे आहे” किंवा “मला पंचकर्म करायचे आहे” असं अनेकवेळा ऐकू येतं. पण detox किंवा पंचकर्म म्हणजे नक्की काय?

पंचकर्म ही आयुर्वेदातील शरीर शुद्धीची महत्वाची शोधन चिकित्सा (Detoxification Therapy) आहे.

पंचकर्म म्हणजे शरीरातील दोष अधिक प्रमाणात वाढले असता व केवळ औषोधोपचाराने (शमन चिकित्सा) त्यात फरक पडण्यासारखी अवस्था नसेल अशावेळी शरीरात खोलवर रुतलेले toxins (आम) बाहेर काढून दोषांमध्ये साम्यावस्था निर्माण करणे. 

शरीरातील रोगांचा समूळ नाश करण्याच्या या क्रियेला शोधन चिकित्सा किंवा पंचकर्म चिकित्सा म्हणतात. 

पंचकर्मांमध्ये पाच कर्मांचा (therapies) समावेश होतो. --- वमन, विरेचन, बस्ति, नस्य व रक्तमोक्षण. 

पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहन व स्वेदन ही दोन पूर्वकर्म करणे अतिशय महत्त्वाचे असते. 

स्नेहन म्हणजे शरीरात स्निग्ध गुण उत्पन्न करणे. यात दोन प्रकार आहेत…

१) अाभ्यंतर स्नेह- औषधीयुक्त तूप किंवा तेल वर्धमान मात्रेत (increasing quantity) ३,५ किंवा ७ दिवस सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घेतले जाते.

२) बाह्य स्नेह- शरीराला बाहेरुन तेल लावणे. ढोबळमानाने याचा अर्थ अभ्यंग किंवा मालीश असा होतो. 

स्नेहनानंतर स्वेदन म्हणजे पाण्याच्या वाफेद्वारे संपूर्ण शरीराला घाम आणला जातो. स्टीम बाथ, सौना, पोटली स्वेद यांचा यात समावेश होतो.

स्नेहन व स्वेदन ह्या पूर्वकर्मांद्वारे शरीरात खोलवर रुजलेले toxins पातळ होऊन पोटात आणले जातात व पंचकर्माद्वारे हे कोष्ठात (पोटात) आणलेला toxins शरीराबाहेर काढले जातात. 

पंचकर्म

रोग्याची प्रकृति (Body constitution), बल, रोगाची लक्षणं, दोषांमधील असंतुलन, ऋतु, अग्नि ( Digestive fire) ह्या सर्वांचा सारासार विचार करुन पंचकर्मांमधील कोणत्या कर्मांची (therapies) रोग्याला गरज आहे हे ठरवले जाते.

१) वमन (Emetic Therapy)

वमन म्हणजे औषधी द्रव्य देऊन मुद्दाम उलटी करवणे. प्रकुपित दोषांना मुखावाटे बाहेर काढले जाते. कफप्रधान रोगांसाठी तसेच काही पित्तज रोगांमध्ये याचा उपयोग होतो.

सर्वसाधारणपणे ज्यांना वारंवार सर्दी, खोकला, दमा, ताप, दीर्घकालीन अॅलर्जी, sinusitis, उलटी, भूक न लागणे, आवाज बसणे, स्थौल्य, काही त्वचा विकार, कफप्रकृतीच्या व्यक्तिंमध्ये व वसंत ऋतुत वमनाचा फायदा होतो. 

२) विरेचन (purgation therapy) 

दोषांना अधोमार्गाने म्हणजे मलमार्गाने रेचक औषधांचा वापर करुन बाहेर काढणे (जुलाब करवणे) म्हणजे विरेचन. पित्तप्रधान रोगांमध्ये याचा विशेष फायदा होतो.

अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात जळजळ व लाली असते, पित्ताची डोकेदुखी, constipation,acidity, आम्लपित्त, पचनसंस्थेचे आजार, मधुमेह, स्रीरोग, gout, पित्तप्रकृतीच्या व्यक्तिंना व शरद ऋतुत विरेचन केले जाते.

३) बस्ति (A type of enema)

बस्ति ही वातदोषावरील अत्यंत गुणकारी व तात्काळ फळ देणारी चिकित्सा आहे. यांत औषधी काढे किंवा तेल गुदद्वारातून मोठ्या आतड्यात सोडले जातात (enema)

अनेक वातव्याधी (सांधेदुखी, कंबरदुखी, sciatica, Parkinson, cervical/lumbar spondylosis, paralysis) हाडांचे रोग, आतड्यांचे विकार (IBS, GERD) अर्श, गर्भाशय विकार, वंधत्व, वातप्रधान प्रकृती तसेच वर्षाऋतुत बस्तिचा विशेष फायदा होतो.

४) नस्य (Inhalation therapy )

नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे. 

मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, vertigo, migraine, अर्दीत (facial palsy) Nasal allergies, Nasal polyp, निद्रानाश, अकाली केस पिकणे किंवा गळणे, Tinnitus अशा रोगांमध्ये तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या व हायपरपिग्मेंटेशनमध्ये याचा चांगला उपयोग होतो. 

५) रक्तमोक्षण (Blood letting therapy)

रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील दुषित रक्त बाहेर काढणे.यात जळवा (लीच) लावून किंवा सिरींजद्वारे शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढले जाते. दिर्घकालीन त्वचाविकारांमध्ये याचा उपयोग होतो. 

वरील पंचकर्म केल्यावर पूर्वकर्माप्रमाणे पश्चातकर्म (संसर्जन क्रम) ही अतिशय महत्वाचे आहे.

संसर्जन क्रम म्हणजे लघू आहारापासून (पचायला हलका) गुरु आहारापर्यंत (नियमित) आहार क्रमाक्रमाने वाढवत जाणे. पंचकर्म चिकित्सेत अग्नि मंद (Low digestive fire) झालेला असतो. तो पूर्ववत आणण्यासाठी, आधी द्रवपदार्थ देऊन मग हळूहळू घनपदार्थ वाढवलेला आहार दिला जातो. (Liquid to solid diet)

ह्या संपूर्ण चिकित्सेमध्ये आहार विहाराची पथ्ये पाळावी लागतात.

पंचकर्माचे फायदे

पंचकर्माने रोग शरीरातून समूळ नष्ट होतात, त्याचबरोबर पचनशक्ति सुधारते. इंद्रिये प्रसन्न होतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. मन व बुद्धिची कार्य व्यवस्थित होतात, स्टॅमिना वाढतो, दिर्घायुष्य लाभते. शरीराचा वर्ण व कांती उजळते तसेच बरे झालेले रोग पुन्हा उद्भवत नाहीत व त्याचे परिणाम तात्कालिक न राहाता कायमस्वरुपी बनतात. 

आम (toxins) रुपी शत्रूचा कायमचा पाडाव करुन पंचक्रमेंद्रिय व पंचज्ञानेंद्रियास शाश्वत स्वातंत्र्य देणारा असा हा ‘रामबाण’ पंचकर्म उपचार !!


-डाॅ. रुपाली गोंधळेकर
M.D. (A.M.) B.A.M.S.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा