अध्यक्षांचे मनोगत


सप्रेम नमस्कार !!


प्रतिवर्षी वासंतिक बहराने सुरू होणाऱ्या आणि वर्षभर फुलत राहणार्‍या आपल्या "ऋतुगंध"च्या सर्व कार्यकर्त्याना, वाचकांना आणि जाहिरातदारांना शुभेच्छा.

या वर्षी मंडळाच्या कार्यकारिणीत मला अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी दिलीत, तसंच कार्यकारिणीच्या सदस्यत्वात नव्या-जुन्याचा संगम साधणं शक्य झालं या दोन्ही गोष्टींचा आनंद होतो आहे. कार्यकारिणीच्या वतीने सर्व सभासदांचे मन:पूर्वक आभार.

स्वयंसेवक ही आपली मोठी शक्ती आहे. तेव्हां गेल्या अनेक वर्षांप्रमाणे या वर्षी देखील आपण विविध कार्यक्रमांसाठी मदतीचा हात पुढे करत राहाल ही आशा करते.

गेल्या १९ वर्षात अनेक प्रकल्प सुरू झाले, त्यातील काही 'कायम स्वरूपाचे' झाले आहेत, उदा. गुढी पाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, नाटक, सुगम संगीत, खेळांच्या स्पर्धा इ.. त्याखेरीज काही नवीन कार्यक्रम सादर करण्याचा विचार आहे. त्यापैकी दोनच गोष्टींचा ठळक उल्लेख करते. मुलांसाठी 'आर्ट वर्क शॉप' व स्त्रियांसाठी नव्हे तर सर्वांसाठीच, परंतु स्त्रियांनी नावारूपास आणलेल्या 'विविधा', 'मंथन', 'सखी', प्रेरणा' अशा अनेक स्वयंप्रेरित मंचातील सभासदांना मंडळाच्या मंचावरून एक खास कार्यक्रम सादर करण्याचं आवाहन करणार आहोत.

सिंगापुरात महाराष्ट्रीय संस्कृतीवर प्रेम असणारे किमान ४०००-५००० लोक आहेत. तेव्हां विद्यमान सभासदांबरोबरच नवीन व्यक्तींना मंडळाचे सभासद करून घेण्यासाठी आपणा सर्वांचीच मदत मोलाची ठरणार आहे. प्रत्येकाने "आपण या वर्षी मंडळाला एक तरी नवीन सभासद मिळवून देऊया" असं ठरवलं तरी केवढा फरक पडेल !

या प्रयत्नाला जोड म्हणून दोन गोष्टी करण्याचा विचार आहे. () सिंगापुराच्या निरनिराळ्या भागातील काही व्यक्तींना मंडळाचे 'प्रचारक' बनविणे आणि () वाचनालयात येणाऱ्या लोकांशी बोलून त्यांच्यातर्फे सभासदत्वात भर घालण्याचा प्रयत्न करणे. नवीन सभासदांबरोबर नवीन कल्पना, नवीन जाहिरातदार असं सारंच मंडळाला हितकारक होईल ही आशा करते. एक विनंती. आपलं संकेत स्थळ www.maharashtra-mandal-singapore.org/ आणि आपलं फेसबुक पान Maharashtra Mandal Singapore हे दोन्ही सातत्याने पहात रहा आणि feedback@mmsingapore .org -पत्त्यावर आम्हाला साद द्या आणि कल्पना, सूचना अशा मार्गाने सतत संपर्कात रहा.

राजश्री लेले

अध्यक्ष २०१३-१४
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा