चांगले vs चालणारे

आज ३५ वर्षांच्या कारकीर्दीनंतरही त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढतेच आहे. पुणे-मुंबई असो वा सिंगापूर-आॅस्ट्रेलिया, आजही त्यांच्या नाटकाला हाउसफुलचे बोर्ड लागतात. केशव पाटणकर ह्यांनी घेतलेली प्रशांत दामले ह्या रंगमंच-जीनियस ची मुलाखत: 

प्र: खाण्याची आवड लहानपणापासून?
उ: हो. मला अगदी लहानपणापासून खायला आवडतं. सगळं आवडतं. बटाटे वडा, मिसळ, भात-आमटी, पोळी-भाजी. पण मला साधं जेवण जास्त आवडतं.

प्र: लहान मुलांना ब्राह्मण म्हणून जेवायला बोलावतात त्याच्या काही आठवणी?
उ: आपण लहान असताना आई-बाबा नेतील तिथे जात असतो. मला ब्राह्मण म्हणून बोलावल्याचं काही आठवत नाही. आणि आपण जेवायला बहुतेक वेळा नातेवाइकांकडेच जातो. तर जेवायला बोलावलं की मी जायचोच.

प्र: ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि ‘आज काय स्पेशल’ हे कार्यक्रम कसे काय चालू झाले?
उ: जेवण बनवणं हे तसं रुक्ष काम आहे - फोडणी द्या, हळद-मोहरी घाला. जेव्हा मी ‘खवय्ये’ स्वीकारलं, तेव्हा जे कार्यक्रम चालू होते त्यात काही लाइव्हलीनेस नव्हता. तर मी ह्या कार्यक्रमाकडे एक आव्हान म्हणून पाहिलं. म्हटलं, आपला रंगमंचावरचा अनुभव, लोकांना हसवता येणं, बोलतं करणं ह्याचा वापर करून स्वयंपाक करणं हे रंजक बनवता येतं का बघुया. शब्दांची मांडणी, त्यांचा वापर हे फार महत्त्वाचं असतं. पहा, शरद उपाध्ये ह्यांनी ‘राशीचक्र’ कसं एका रुक्ष विषयाला अतिशय रंजक करून सादर केलं होतं.

प्र: तुमचा उत्स्फूर्तपणा, स्पाॅंटेनिटी हे ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे... 
उ: ‘खवय्ये’ काय किंवा ‘आज काय स्पेशल’, दोन्ही कार्यक्रमात कट्स फार कमी आहेत. म्हणजे एकदा ओळख करून दिली की तिथ पासून प्राथमिक माहिती वगैरे घेत “आजचा पदार्थ काय”, असं आम्ही म्हणेपर्यंत… म्हणजे पाहुण्यांची एन्ट्री झाल्यापासून ते किचनमधे जाईपर्यंत एकही कट नसतो. मग ही पाच-सात मिनिटं फक्त माझी असतात. तो एक अखंड शाॅट असतो. त्यावेळी मी अबोल पाहुण्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतो; सासू-सून एकत्र आले असतील तर त्यांचं भांडण लावून द्यायला बघतो; कुणाची कधी विकेट काढायला बघतो. पण काही पाहुणे फार हुशार असतात आणि माझीच विकेट काढतात. मी ते कबूलही करतो लगेच. तर अशा गमती होत असतात. पण हीच तर त्या कार्यक्रमाची मजा आहे माझ्या लेखी.

प्र: कार्यक्रमातील लक्षात राहिलेला (विक्षिप्त) पाहुणा/णी, एखादा वेगळाच पदार्थ. 
उ: असं एकच व्यक्ति आठवून सांगणं अवघड आहे. पदार्थांचही तेच. माझा प्राॅब्लेम हा आहे की मला सगळेच पदार्थ आवडतात. 
आणखीन एक गोष्ट म्हणजे तिथे बनवलेले पदार्थ आम्ही खात नसतो. पाहुणे तो पदार्थ घरूनच बनवून आणतात. म्हणजे, तिथेही आम्ही पदार्थ बनवतोच… ह्यात समस्या एकच आहे: ते घरून आणलेले पदार्थ थंड होतात खाइपर्यंत (हसत)!

प्र: टीव्हीवर दिसत राहिल्याने तुमच्या नाटकांना काही फायदा होतो का? 
उ: अजिबात नाही. तुम्ही नाटकात जे नाव कमवाल त्या जोरावर तुम्हाला सीरियल वगैरे मिळू शकेल पण टीव्हीवर नाव झालं म्हणून नाटकात तुम्हाला काम मिळेलच असं नाही. हो, एखाद्या नाटकाला तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतील. तुम्ही विचार करा ना. असं नसतं तर ‘चला हवा येऊ द्या’ यातली सगळीच नाटकं प्रसिद्ध झाली असती की!

प्र: पुन्हा जेवणाकडे वळत… तुम्ही खूप फिरता तर कुठल्या प्रांतातलं, देशातलं आवडीचं रेस्टाॅरंट किंवा व्यंजन?
उ: सगळ्या प्रांतांचं आपलं वैशिष्ट्य, आपल्या चवी असतात. आता काळ्या वाटाण्याची उसळ ही कोकणात वेगळी लागते, देशावर वेगळी. मी परभणीला गेलो की तिथे शेवभाजी पण आवडीने खातो. आणि मला काही पंचतारांकितच जेवण लागतं असं काही नाही. मला अगदी ‘काटाकिर्र’ मधली मिसळ पण आवडते. काटाकिर्र हे पुण्यातलं छोटसं दुकान आहे. त्यांच्याकडे १, २ व ३ नंबरची मिसळ मिळते. १ नंबर म्हणजे तोंडातून वाफा यायलाच पाहिजेत अशी तिखट.

प्र: पण दामल्यांना आवडणारं असं एक रेस्टाॅरंट…
उ: नाही. असं खरच नाही. खूप ठिकाणी खूप चांगलं-चुंगलं खायला मिळतं. मी अमुकच ठिकाणी खाईन असं काही नाही.
पुन्हा दौऱ्यावर असताना मी साधा आहार घ्यायचा प्रयत्न करतो. आपलं भात भाजी पोळी आमटी. दौऱ्यावर तुमची काळजी घ्यायला कुणी नसतं आणि तुमच्यामुळे दौऱ्याचं नुक्सान झालं तरी ते वाईट. म्हणजे मी इथे, सिंगापुरात, आलोय कशाला? तर नाटकाचा प्रयोग करायला. खायला-प्यायला नाही. दौऱ्यावर नाही उगाच, खा चिकन, खा मटण… “चला, आज हे खाऊन बघुया”, असले उद्योग करत नाही.
आता बघा ना, संकर्षणला आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या दोन दिवस आधी डेंग्यू झाला होता. एक दिवस हाॅस्पिटलमधे राहून तो तसाच निघाला आमच्याबरोबर. म्हणून आपली आपणच काळजी घ्यावी. 

प्र: मग सुट्टीवर… ?
उ: सुट्टीवर असताना खातो की मी सगळं. आता नाटकाचा प्रयोग झाला की मी आहेच सुट्टीवर. आणि तरीही मी आता सगळं कमीच करत आणलं आहे. जरा साधच खातो मी. हल्ली जरा बॅकफुटवर आहे मी खाण्याच्याबाबतीत.

प्र: खाण्याच्या काही विशिष्ट सवई? जेवल्यानंतर चहा किंवा ताक-भात…
उ: अशा माझ्या काही नेमक्या सवई नाहीत पण जेवल्यानंतर मला थंड ताक मिळालं ना, थोडं मीठ घालून, तर मला बरं वाटतं. चहा मला जेवल्यानंतर नाही पण दिवसभर लागतो थोडा थोडा.

प्र: लिमका बुकात तुमच्या चार विक्रमांची नोंद आहे. त्यातला एकाच दिवसात पाच प्रयोगांचा विक्रम करताना तुम्ही आहार कसा सांभाळलात?
उ: लिक्विड डायट. तो दिवस मी फक्त नारळ पाण्यावर होतो. फार काही खाऊन दिवसभर परफाॅर्म करणं कठीण झालं असतं. तो ठरवून केलेला रेकाॅर्ड होता. म्हणून तशी तयारीच केली होती. पहिले दोन रेकाॅर्ड, एका वर्षात ४५० हून अधिक प्रयोग, ते झाले, जमून आले. ठरवून केले नव्हते.

प्र: मग ठरवून रेकाॅर्ड करायचं कारण?
उ: २००२-३ साली टीव्ही चॅनल्सची संख्या खूप वाढली होती आणि लोकांचं लक्ष नाटकापासून किंवा एकंदरच परफाॅर्मिंग आर्टपासून दूर जातय का असं वाटू लागलं होतं. तर म्हटलं, काहीतरी वेगळं करुया जेणेकरून लोकं पुन्हा नाटकाकडे वळतील. तरुण पिढीला काहीतरी वेगळं दिसलं की ते लगेच आकर्षित होतात. तर एकाच दिवसात एका कलाकाराचे, म्हणजे ते माझेच असायला हवे होते असं नाही, पाच प्रयोग होऊ शकतात आणि हौसफुल होऊ शकतात हा संदेश जाणं गरजेचं होतं. ह्याने असं दिसलं की मराठी नाटक म्हणजे काहीतरी विशेष आहे.

प्र: आता पुढचा रेकाॅर्ड?
उ: नाही. आता अजून काही नाही. आता शांतपणे काम करायचं. माझ्या नाटकाचे १३,००० हून अधिक प्रयोग झाले आहेत. 

प्र: तुम्ही फार आधी चित्रपट न करण्याचा निर्णय घेतलात. फार धाडसी निर्णय, नाही का?
उ: मी १९८६ ते १९९२ पर्यंत बरेच चित्रपट केले. पण जेव्हा ‘गेला माधव कुणीकडे’ गाजलं तेव्हा मी ठरवलं की दोन-तीन डगरींवर पाय ठेऊन चालणार नाही. काहीतरी सोडायला हवं. बरं, मला आन्सरेबल, जबाबदार, रहायला आवडतं. चित्रपटात दिग्दर्शक जबाबदार असतो. नाटकात मी स्वत: जबाबदार असतो. तर मी कलाकार झालो तेव्हापासून मला असं वाटायच की मी जे काही करतोय ते यशस्वीपणे करावं आणि त्यासाठी लागेल ती मेहनत मी केली. नुसतं पैशाच्या पाकिटासाठी काम करावसं मला वाटत नाही. 

प्र: माझं प्रत्येक नाटक, प्रत्येक शो हे एक प्रोडक्ट आहे असं तुम्ही म्हणता…
उ: ह्यात एक महत्त्वाची बाब आहे: चांगल नाटक व चालणारं नाटक ह्यात फरक आहे. माझी भले सगळी नाटकं चालतील पण कलाकार म्हणून मला माहित असतं त्यातली किती चांगली आहेत. तर आज निर्माता व कलाकार ह्या दोन्ही भूमिका साकार कराताना मला ह्या चालणाऱ्या व चांगल्या नाटकातला सुवर्णमध्य साधायचा असतो. जेव्हा एखादं नाटक चालणार नाही असं मला वाटतं तेव्हा माझ्यातला निर्माता मला सांगतो की पैसे परत मिळव आणि बंद कर हे. मग माझ्यातला निर्माता ‘चालणाऱ्या’ काही गोष्टी त्या चांगल्या नाटकात घालायला बघतो आणि कलावंत त्या चांगल्या नाटकातल्या गोष्टी जपायला बघतो. काही नाटकं मी अगदी ६० प्रयोगांनंतरही बंद केली आहेत. 

प्र: तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ह्यांना आपले गुरू म्हटलं आहे…
उ: हो ना. तसं मी मानतो माझे बरेच गुरू आहेत. लक्ष्मीकांत हा नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस. ‘तू नवीन आहेस म्हणून तुला काय भाव द्यायचा’, असं नाही. अशोक सराफ ह्याचे बहुतेक चित्रपट शून्यातून उभे राहिले आहेत. त्याला मिळालेल्या सगळ्याच स्क्रिप्ट्स चांगल्या नव्हत्या. पण त्याने ते चित्रपट स्वत:च्या कष्टाने, कलेने घडवले. त्याने कधीच शस्त्र टाकली नाहीत.  तर अशी अनेक लोकं आहेत आणि सगळ्यांचा मला घडवण्यात काही वाटा आहे. 

प्र: पण तुम्ही स्वत: मराठीतल्या काॅमेडीला एक वेगळं वळण दिलं आहे, एक दर्जा दिला आहे.
उ: काही लोकं आपलं बोट धरून आपल्याला चालायला शिकवतात. त्यांना तुम्ही विसरू शकत नाही. ज्या लोकांबरोबर मी सुरुवातीच्या काळात काम केलं त्यांचाही वाटा आहे त्यात. राजा गोसावी हे फक्त लुक्स वापरून लोकांना हसायचे. सुधीर जोशी हे रिएॅक्शनवर लाफ्टर काढायचे. 
तर मी खूप शिकलो ह्यांच्याकडून. माझ्यात काय कमी आहे ते मला माहित आहे. मग ते झाकून, चांगले गूण कसे बाहेर काढायचे हे ह्या सर्व मंडळींनी न बोलता शिकवले. 

प्र: आज तुम्ही ही एक अभिनय शाळा चालू केली आहे. इथे शिकायला येणाऱ्या मुला-मुलींच्यात नाटकात काम करायची इच्छा असते का फक्त रुपेरी पडद्यावरच?
उ: मी त्यांना नाटकातच काम करायला प्रवृत्त करतो. पण त्यांना जर एखादी टीव्हीवरील मालिका मिळाली तर त्यांनी करावी की. कसं आहे, सुरुवातीच्या काळात मिळेल ते काम करावं लागतं. 

प्र: … आणि हल्ली जे सर्रास सगळी मुलं सिक्स-पॅक व मसल्स दाखवत फिरतात ते?
उ: त्याची अजून तरी नाटकात गरज नाही. म्हणजे नाटकात असं होत नाही की कुणीतरी उगाच शर्ट काढून इकडुन इकडे तिकडे फिरतोय. पण कलाकाराची तब्येत सुदृढ हवीच. कामाचा ताण, प्रवास हे सगळं झेपलं पाहिजे आणि एक व्यक्तिमत्त्व वाटलं पाहिजे मंचावर. एवढच. एखाद्या रोलची मागणी असेल तर नक्कीच तसं शरीर कमवावं पण नाही तर बेटकुळ्या, सिक्स-पॅक वगैरे तुमच्या आवडीचा प्रश्न आहे.

प्र: गेल्या दोन दशकात भारताची जी आर्थिक प्रगती झाली आहे त्याचा नाटकांना फायदा झाला आहे का?
उ: झाला असेल. फायनान्स घेऊन नाटकं बनवणारी अनेक लोकं आहेत. मी नाटक करतो तेव्हा माझे स्वत:चे पैसे वापरतो. जे लोकं फायनान्स घेऊन नाटकं करतात त्यांना त्या नाटकाविषयी तेवढी ओढ नसते. ते नाटक यशस्वी करायची इच्छा नसते. त्यांचा स्वत:चा पैसा लागलेला नसतो. ह्याने नाटकाचा दर्जा खालावतो. 

प्र: म्हणजे नाटकांना चांगले दिवस आलेत का नाटकाचे दिवस गेलेच नव्हते असं तुम्ही म्हणाल?
उ: दर वर्षी काही नाटकं चालतातच की. तुम्ही पन्नास नाटकं उभी केलीत आणि त्यातली दोनच चालली तर नाटकाचे दिवस वाईट असं नाही म्हणू शकत तुम्ही. पन्नास शर्टस् समोर ठेवले तरी ग्राहक एक किंवा दोनच शर्ट घेत असतो. नाटकांची संख्या खूप आहे पण त्याला महत्त्व नाही.
विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे. जर प्रेक्षक म्हणून एका कलाकारावर माझा विश्वास असेल की हा माझे पैसे वाया जाऊ देणार नाही तर मी तीनशे रुपायांचं तिकिट काढून नाटक बघेन. नाहीतर बहुतेक प्रेक्षक काॅफीशाॅपला हजार रुपये झटकन खर्च करतील पण नाटकाचं तिकिट काढताना बराच विचार करतील. हा झाला प्रेक्षकांचा भाग. 

आता आमचा, म्हणजे कलाकारांचा. इतर सर्व्हिस इंडस्ट्रीजपेक्षा आम्ही पुढे आहोत. तुम्ही इडली खायला गेलात तर आधी इडली खाता मग पैसे देता. आम्ही मात्र आधी पैसे घेतो आणि मग आमची इडली दाखवतो. त्यामुळे आमची जबाबदारी वाढते. 

मला शेवटी एक सांगावसं वाटतं की प्रशांत दामले हा एकटा काहीही करू शकत नाही. हे सगळं टीम वर्क असतं. माझ्यासाठी जितका माझा डायरेक्टर महत्त्वाचा आहे तितकाच माझा ड्रायव्हर, लाइट वाला, केटरर, स्टेज उभा करणारा आणि अर्थातच माझे सहकलाकार.
- केशव पाटणकर


२ टिप्पण्या:

  1. खुपच चविष्ट ! प्रशांत दामले यांचा मोकळेपणा आणि केशव पाणकरांची आवडत्या विषयाला हलकेच हात घालण्याची शैली यामुळे मुलाखत खुमासदार !!

    उत्तर द्याहटवा